6 Jun
6 Jun
6 Jun

शिवराज्याभिषेक 

शालिवाहन शके 1596,ज्येष्ठ शुद्ध 13 शनिवार

शिवराज्याभिषेक 

 

 

 

5/6/2021,

उषःकाल झाला. तोरणागडाच्या मागे पूर्वा उजळू लागली. सूर्योदयास तीन घटका उरल्या. महाराज सिंहासनाच्या समोर आले. त्यांनी आपला उजवा गुडघा भूमीवर टेकविला व मस्तक लववून सिंहासनास वंदन केले. नंतर ते पूर्वाभिमुख उभी राहिले. नगारे, चौघडे ,शिंगे, करणे ,हलग्या, शहाजणे,कालसनया ,ताशे , इत्यादी तमाम वाद्यांचे ताफे आणि तोफाबंदुका कान टवकारून सुसज्ज झाल्या. सर्वांचे डोळे महाराजांच्या मूर्तीवर खिळले.

हिंदवी स्वराज्याचा तो सुवर्णाचा, अमृताचा,कौस्तुभाचा ,परमोच्य सौभाग्य क्षण उगवला. मुहूर्ताची घटका बुडाली. गागाभट्टांनी व इतर पंडितांनी परमोच्य स्वरात वेदमंत्र म्हणण्यास प्रारंभ केला अन त्या प्रचंड वेदघोषात महाराज सिंहासनाला पदस्पर्श न होऊ देता सिंहासनावर स्थानापन्न झाले! आणि एकच महा कल्लोळ उडाला! चौघडे ,ताशे,नौबती इत्यादी तमाम वाद्यांनी एकच धुमधडाका उडविला. तोफा -बंदुकांनी दाही दिशा एकदम दणाणून सोडल्या.

महाराष्ट्र
महाराष्ट्र

राजसभेतील सहस्त्रावधी सभाजनांनी सोन्यारूप्यांच्या फुलांची, सुगंधी फुलांची ,अक्षतांची, लाह्यांची, महाराजांवर अविरत वृष्टी केली. हजारो कंठातून एकच एक गर्जना उठली, शिवाजी महाराज की जय! शिवाजी महाराज की जय! शिवाजी महाराज की जय, तोफा -बंदुकांची सरबत्ती सतत चालू राहिली.

स्वराज्यातील सर्व किल्लोकिल्ली याच वेळी तोफांचा दणदणाट सुरू झाला .सारे स्वराज्य आनंदाने धुंद झाले .त्या जयजयकाराने दिल्लीच्या कानठळ्या बसल्या. विजापूर बधीर झाले. फिरंग्याची झोप उडाली! राजसभा देहभान विसरली .कोणत्या शब्दात सांगू हे सारे? आनंदनाम संवत्सरे, शालिवाहन शके 1596,ज्येष्ठ शुद्ध 13 शनिवारी ,ऊषःकाली पाच वाजता महाराज शिवाजीराजे सिंहासनाधीश्वर झाले !

सोळा सुवासिनी व सोळा कुमारीका हातात पंचारत्यांची ताटे घेऊन सिंहासनापाशी आल्या.त्यांनी महाराजांना कुंकुमतिलक लावून ओवाळले . सुवासिनीच्या व कुमारिकांच्या रूपाने जणू अवघ्या स्त्री जातीने महाराजांना ओवाळले व आपला आदर, प्रेम ,कौतुक, कृतज्ञता आणि आशीर्वाद व्यक्त केला.

महाराष्ट्र
महाराष्ट्र

मोत्याची झालर लावलेले, रत्नजडित राजछत्र गागाभट्टांनी हातात घेतले व महाराजांच्या मस्तकावर धरले !आणि गागाभट्टांनी उच्च स्वरात घोषणा केली की , महाराज शिवाजीराजे आज छत्रपती झाले ! छत्रपती ! राजा शिवछत्रपती! क्षत्रियकुलावतंस महाराज सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की जय! जय !जय !

चार पातशाह्या उरावर भाले रोवून उभ्या असतानाही त्यांना पराभूत करून मराठा राजा छत्रपती झाला! आई साहेबांच्या इच्छांची परिपूर्ती झाली. त्यांचा शिवबा क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराज राजा शिवछत्रपति झाला. एवढेच बघायचे होते. साधायचे होते. याच साठी केला होता अट्टाहास.आईसाहेबांच्या संसारातील कौतुकाचे हे सुवर्णक्षण होते.

महाराष्ट्रात पुन्हा अयोद्धा अवतरली. न्यायाचे,सुसंस्कृतीचे छत्र सिंहासन पुन्हा प्रकटले. साडेतीनशे वर्षाचे सुतक फिटले .नैराश्य, दुःख लयाला गेले .साऱ्या जखमा बुजल्या. सारे आपमान धुवून निघाले .सर्वत्र आनंदीआनंद उडाला. नव्या जीवनाचा साक्षात्कार सर्वांना झाला. सर्व संशय व भये पळाली .न्यायासाठी, संरक्षणासाठी ,सुखदुःखे सांगण्यासाठी, हवे ते हक्काने मागण्यासाठी ममतेचे, संमतेचे ,उदार आणि बलाढ्य सिंहासन निर्माण झाले.

सावलीसाठी विशाल छत्र उघडले गेले. मुलाबाळास, लेकीसुनास, शेतकऱ्यास हक्काने रूसावयास जागा निर्माण झाली.अवघ्यांना आजोळ माहेर लाभले. महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला .सृष्टी डोलू लागली. सह्याद्रीला हर्षवायू झाला. समुद्रमंथनातून देवांनाही मिळाले नाही असे अपूर्व रत्न महाराष्ट्राला मिळाले. समुद्र तळापासून उचंबळला. सह्याद्रिचे सारे जिवलग आनंदाने हिंदोळले. छत्रपती शिवाजी महाराज की जय.

लेखन 
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
इतिहास अभ्यासक 

More Stories
www.postboxindia.com
१ फेब्रुवारी छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथे कैद व म्हाळोजीबाबा घोरपडे यांचे वीरमरण.
error: Content is protected !!