aandal
aandal
aandal

aandal – मार्गशीर्ष, आण्डाल आणि पावैनोम्बू

aandal - मार्गशीर्ष म्हणजे – संवत्सरातील सर्व महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे – मासानां मार्गशीर्षोऽहम् |

aandal – मार्गशीर्ष, आण्डाल आणि पावैनोम्बू

aandal – मार्गशीर्ष म्हणजे – संवत्सरातील सर्व महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे – मासानां मार्गशीर्षोऽहम् |

 

 

भारतीय धर्मशास्त्रानुसार, तीर्थस्नानाचे – एखाद्या पवित्र तीर्थस्थळी जाऊन विधीपूर्वक स्नान करण्याचे महत्त्व खूप आहे, धर्मशास्त्राचे विवेचन करणाऱ्या अनेक जुन्या ग्रंथांत तसे वारंवार नमूद केले आहे. शरीराच्या शुद्धीसाठी, ताजेतवाने वाटण्यासाठी स्नान करतात, हे तर आपल्याला माहित आहेच. तीर्थस्नान हे मनाच्या शुद्धीसाठी, आत्म्याच्या उन्नतीसाठी सांगितले आहे. यानुसार, एखाद्या विशेष तिथीला, विशिष्ट स्थळी स्नान केले की पुण्य मिळते, विशेष लाभ होतात, भवसागर पार होतो, अशी कल्पना आपल्या धर्मशास्त्रात प्रसृत केली आहे. म्हणून तर जुन्या काळातले लोक आवर्जून नद्यांच्या संगमांना भेटी देत, निरनिराळ्या पवित्र नद्यांच्या घाटांवर एखाद्या विशिष्ट तिथीला किंवा खास पर्वसमयी जात, किंवा नदी आणि समुद्र जेथे एकत्र होतात, अशा संगमांवर देखील जात. सगळ्यांना काही अशा लांबच्या तीर्थयात्रांना जाणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी त्यांनी त्यांच्या गावाजवळची एखादी नदी, तलाव यांत स्नान करणे देखील ग्रंथांनी मान्य केले आहे. तीर्थस्नानाच्या या संकल्पनेत तिथी, वार, नक्षत्र यांसोबत काही महिन्यांचे देखील खास महत्त्व असल्याचे दिसून येते. या स्नानासोबतच दान- जप- पूजेचे विधीही जोडले गेले आहेत.

मार्गशीर्ष म्हणजे – संवत्सरातील सर्व महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे – मासानां मार्गशीर्षोऽहम् | असं स्वतः भगवंतांनी ज्या महिन्याबद्दल सांगून ठेवलंय असा महिना. भगवान श्रीकृष्णांचा विशेष अंश ज्या महिन्याला लाभला आहे, असा महिना. हेमंत ऋतूतील या महिन्याला, थंड, आल्हाददायक हवा, चहूबाजूंनी भरात आलेलं पिकपाणी,ओसंडून वाहणारे नदीनाले यामुळे एक आगळी शोभा प्राप्त झालेली असते.

काही पुराणांत नमूद केल्याप्रमाणे – या महिन्यात, व्रजभूमीतल्या तरुण अविवाहित मुली कात्यायनी व्रताचे पालन करीत असत. या महिन्यातले सर्व दिवस प्रातःकाळी लवकर उठून यमुनेच्या किनारी जाऊन, तिच्या पवित्र पाण्याने स्नान करीत. नदीकिनारीच्या वाळूने तयार केलेल्या कात्यायनी देवीच्या मूर्तीची विधिवत पूजा-अर्चा करून, व्रतस्थ राहून नंदकुमार श्रीकृष्ण हाच पती म्हणून मिळावा              (किंवा श्रीकृष्णासारखा अन्य सुयोग्य कोणी) यासाठी देवीकडे मागणे मागत असत.

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

तामिळ प्रांतात, असाच विधी, या महिन्यात आजही केला जातो, त्याला पावै नोन्बू – पावै = कुमारिका, नोन्बू – व्रत – ‘कुमारिकांनी करावयाचे व्रत’ असे म्हणतात किंवा ‘मार्गळीव्रत’ – मार्गशीर्ष व्रत म्हणूनही हे व्रत ओळखले जाते. गोदा किंवा aandal आण्डाळ या श्रेष्ठ आल्वार- संतस्त्रीसोबत हे व्रत जोडलेले आहे. आल्वार संत म्हणजे भगवंतांच्या- श्रीविष्णूंच्या अनवरत नामस्मरणात दंगलेले भक्तशिरोमणी. आल्वारांनी भगवंताला कधी आपले मूल म्हणून पाहिले तर कधी सखा म्हणून त्याच्याशी हितगुज साधले. कधी त्याला आपला राजा मानले तर कधी मालक. देवाची एक माणूस म्हणून कल्पना करत, निरनिराळ्या नातेसंबंधांच्या माध्यमातून त्याला समजून घेण्याचा, त्याच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न या सर्व संतसज्जनांनी केला. भक्तीमार्गाचे समग्र तत्त्वज्ञान त्यांनी आपल्या रसाळ रचनांच्या माध्यमांतून समाजात पसरविले. तमिळ परंपरा १२ आल्वार संतांना मानते, त्या १२ जणांमध्ये एकच स्त्री संत होऊन गेली व ती म्हणजे कोदै किंवा गोदा म्हणजेच aandal आण्डाळ. श्रीविलीपुत्तुर (जिल्हा – तिरुनेलवेली) नावाच्या गावी एक वटपत्रशायीचे  – श्रीविष्णूचे देवालय होते. त्या देवालयाचे पुजारी होते विष्णुचित्त. नावाप्रमाणे आपले सारे ध्यान श्रीविष्णूंच्या पायी वाहिलेल्या या अनन्य भक्ताला,एक दिवस,  देवळाच्या बागेतल्या तुळशीच्या बनात एक छोटीशी बालिका आढळली. विष्णूचित्तांनी प्रत्यक्ष देवाचा प्रसाद समजून त्या कन्येला आपल्या घरी आणलं आणि तिचा प्रतिपाळ मोठ्या मायेने सुरु केला. ही कन्या म्हणजेच कोदै (सुकेशिनी) किंवा गोदा , त्या विष्णुभक्ताच्या घरी दिसामासी वाढू लागली. स्वतः विष्णुचित्त श्रेष्ठ भक्त होते, रचनाकार होते. वैष्णव परंपरेत त्यांना पेरियाळवार म्हणूनही सन्मानाने ओळखले जाते. आजूबाजूचे भक्तीपूर्ण वातावरण लहानग्या गोदेच्या मनीमानसी झिरपू लागले. तिच्या जाणीवांची त्याच पठडीत जडणघडण होऊ लागली. हळूहळू ती श्रीविष्णूला स्वतःच्या प्रियकराच्या रूपात पाहू लागली. लग्न करीन तर भगवंताशीच, असे तिने मनाशी घेतले. इतर कोणी मर्त्य जीव आपले पाणिग्रहण करेल ही कल्पना देखील तिला सहन होईना. असं म्हणतात की,परमेश्वराला गोदेच्या मनातली अपार ओढ कळली. ईश्वरीय संकेतानुसार,श्रीरंगम् येथील रंगनाथाच्या देवळात गोदेचा विवाह प्रत्यक्ष देवाशी होणार होता.त्या समयी, वधुवेषात नटलेल्या गोदेला देवाधिदेव विष्णूने आपल्यात सामावून घेतले, अशी समजूत आहे. देवाला आपला प्रियतम मानणारी गोदा, त्याची वाट बघत झुरणारी गोदा, अखेर त्याच्यात विलीन झाली. मागे उरल्या त्या तिची ईश्वराबद्दलची प्रेमभावना, त्याचा तिला झालेला जीवघेणा विरह, त्याच्या मिलनाची तिला असलेली अपार आस – या तिच्या साऱ्या उत्कट  भावना ज्यांत प्रतिबिंबित झाल्या आहेत, अशा काही रचना. गोदेने आपल्या मनातील भावनांना काही कवनांमधून व्यक्त केल्या आहेत. तिरुप्पावै आणि नाच्चियारतिरुमोळी या त्या दोन रचना होत. या दोन्ही रचनांना मिळून ‘गोदासूक्ते’ असेही म्हणतात. तिरुप्पावै हे तीस पाशुरांचे – कवनांचे छोटेखानी काव्य आहे. त्यात व्रजभूमीतल्या गोपकुमारिका मार्गशीर्ष महिन्यातले प्रातःस्नानाचे व्रत करत आहेत आणि,या निमित्ताने कृष्णाच्या लीलांचे स्मरण करत आहेत , त्याच्या विविध अवतारांना आठवत आहेत, अशी पार्श्वभूमी आहे.

स्नानव्रताचं निमित्त करून गोदेने गोकुळातल्या छोट्याश्या गोपजमातीचं साधंसुधं आयुष्य रंगविलं आहे. साध्या सरळ गरजा असणारी ही देवभोळी मंडळी. त्यांचं सगळं आयुष्य श्रीकृष्णाच्या युगंधर अस्तित्त्वाचा परिसस्पर्श झाल्याने उजळून निघालेलं ! या गावातल्या  किशोरवयीन  मुली मार्गशीर्षातल्या पहाटे एकत्र मिळून, एकमेकांना हाकारत, कधी एकमेकींची थट्टा करत , तर कधी एखादीला लवकर न उठल्याने रागे भरत यमुनेवर स्नानाला जायची तयारी करतात. सगळ्या मिळून मार्गळी व्रताचं पालन करतात. या काव्यात गोदा स्वतः एक अनाम गोपकन्या म्हणून वावरते आहे. तिने गोपसमाजाचं निसर्गासोबत असणारं घट्ट नातं फार सुरेख रंगवलंय. ती म्हणते, “आम्ही हे व्रत करतो म्हणून तर भरपूर पाउस पडतो, धरती हिरवीगार होते, गव्हाला, तांदळाला लोंब्या धरतात, काईल मासे स्वच्छ पाण्यात गिरक्या घेऊ लागतात, फुलांमधला मध पिऊन मधमाशा तृप्त होतात, गाईंचा पान्हा ओसंडून वाहू लागतो.” (पाशुर – ३) या निमित्ताने, गोदेने मार्गशीर्ष व्रताचे भौतिक लाभ सांगितले आहेत. निसर्गाशी एकतानता साधत पार पाडलेल्या या व्रतांमुळे पंचमहाभूते आंतर्बाह्य संतुष्ट होतात, मानवाला आपल्या देणग्या भरभरून देऊ लागतात. अशा प्रकारे निसर्ग आणि मानव यांचं नातं परस्परपूरक असतं, असायला हवं, हे यातून आपण लक्षात घेतलं पाहिजे. शिवाय, व्रतवैकल्यांमागची मूळ कल्पना,निसर्गाशी एकरूप होणं, त्याच्याकडून लाभलेल्या गोष्टी त्यालाच अर्पून त्यासोबत समृद्ध, कृतज्ञ नातं प्रस्थापित करणं अशी आहे, हेही जाणून घेतलं पाहिजे. या काव्यातून एखाद्या जनसमुदायाचे आपसातले नातेसंबंध किती सहज, अकृत्रिम आणि घट्ट असतात, हेही कळून येतं. एका पाशुरेत (पाशुर-१४) व्रतासाठी निघणाऱ्या गोपकुमारिका आपल्या एका मैत्रिणीला रागे भरत आहेत  – “मी सगळ्यात अगोदर उठून तुम्हाला सगळ्यांना उठवायला येईन, असं म्हणाली होतीस ना, काय गं बोलघेवडे, आता दिवस उजाडला, कमळं उमलायला लागली, देउळ सुद्धा उघडेल आता, उठ की आता, कशाला झोपून राहतेस ?” किंवा, व्रतासाठी निघायची वेळ झाली तरी अंथरुणातून न उठलेल्या एका मैत्रीणीच्या आईला साद घातली आहे, “अहो मामी, तुम्ही तरी उठवा की आपल्या लेकीला” (पाशुर-९) हे असे आपल्या अवतीभवती दिसणारे प्रसंग अतिशय सुरेख रंगविले आहेत. आपल्या रोजच्या आयुष्यात आढळून येणाऱ्या भावभावनांनी, त्यांच्या मनोहर क्षणचित्रांनी हे काव्य नटलं आहे. काव्य जरी गोकुळाच्या पार्श्वभूमीवर असलं तरी या अशा नेहमीच्या परिचित भावभावनांमुळे वाचकाच्या डोळ्यांसमोर श्रीविलीपुत्तुरच्या गल्ल्यांमध्ये वावरणारी, वटपत्रशायी देवाला हक्काने आणि मोठ्या विश्वासाने आपल्या गळ्यातला हार पाठवणारी गोदा आपसूकच उभी राहते.मार्गळी व्रत निष्ठेने आणि हौसेने पार पाडणाऱ्या तिच्या सख्या आपल्या डोळ्यांसमोर दिसू लागतात. या काव्यात गोदेने परमेश्वराच्या अनेक लीलांचे स्मरण केले आहे, त्याची अनेक अवतारकृत्ये आठवली आहेत. एका पाशुरेत ती म्हणते (पाशुर -२४)-“त्रिभुवने आक्रांत करणारी तुझी चरणकमले धन्य होत, लंका जिंकणारे तुझे बाहू धन्य होत, शकटासुर, वत्सासुर,कपित्थासुर यांचा नायनाट करणाऱ्या भगवंता तुझा जयजयकार असो.”

कोदैने या काव्यात अनेक प्रतीकांच्या साहाय्याने सामान्य भक्ताचा मनोव्यापार प्रकट केला आहे. ईश्वराला प्राप्त करण्याच्या मार्गातले अनेक अडथळे दर्शविले आहेत.तसेच,या काव्यातून भक्ताला भगवंताच्या सान्निध्याची किती आस लागलेली असते, हे देखील दर्शविले आहे. पहिल्या पाच कडव्यांतून गोदेचे आपल्या सख्यांना व्रतपूर्तीसाठी बोलविणे दिसून येते, तसेच या व्रतात कोणत्या गोष्टी पाळाव्या लागतात याची माहिती मिळते, पुढच्या कडव्यांतून (६ ते १५ ) अजूनही झोपेतून न उठलेल्या व्रताचरणासाठी तयार न झालेल्या आपल्या मैत्रिणींना चिडवणारी,त्यांनी  आळशीपणा सोडावा यासाठी रागवणारी गोदा पहायला मिळते. यानंतर, (१६ ते २०) साऱ्या गोपकन्या मिळून नंदगोपाच्या महाली जातात , तिथे नंदाला, यशोदेला , कृष्णाच्या पत्नीला नीलेला जागे करतात, तसेच कृष्णाचे वारंवार स्तवन करून त्याला जागे करतात. शेवटच्या दहा कडव्यांत सर्व गोपकन्यांच्या मनीचा मी-तूपणा गळून पडतो, साक्षात कृष्ण त्यांच्यासमोर उभा ठाकतो, त्यांचे व्रत सफल होते.

वैष्णव मंडळींच्या नित्यापाठात हे रसाळ काव्य आजदेखील आहे,मार्गशीर्ष महिन्याच्या प्रात:स्नानाच्या व्रतात ही गीते आवर्जून गायिली जातात. काळाच्या कसोटीवर खरं उतरलेलं,गावरान गोडवा असणारं तरीही गहन-गंभीर तत्त्वज्ञानाने  परिपूर्ण असणारं हे काव्य हे काव्य तमिळ भाषेत आहे आणि अनुवादात मूळ भाषेचा, त्यातल्या सहज उत्स्फूर्त भावनांचा गोडवा सांभाळणं कठीण असलं तरी ते समजून घ्यायचा प्रयत्न आपण करायला हवा. गोदेच्या समग्र अस्तित्त्वाला वेढून उरलेला भक्तीभाव उमगण्यासाठी एवढं करायला हवंच.

 

 

Postbox संस्कृता

 

Advertisement

More Stories
samvad घोटाळे आताच नाही, पूर्वीपासून होत असत - संजय आवटे
samvad – संवाद आणि संस्कार – संजय आवटे
error: Content is protected !!
%d bloggers like this: