राज्याभिषेक
राज्याभिषेक
राज्याभिषेक

शिवराज्याभिषेका नंतरचा दिवस 7 जून 

7 जून

शिवराज्याभिषेका नंतरचा दिवस 7 जून 

 

 

 

 

6/6/2021,

राज्याभिषेकानंतर सर्वांनी महाराजांना नजराणे केले व मुजरे वाहिले. या सर्वांना महाराजांनी मानाची वस्त्र, भूषणे दिली. राजसभेतील आहेर- नजराने संपले.यानंतर देवदर्शनासाठी महाराजांची स्वारी हत्तीवरून मिरवणूकीने जाणार होती. या मिरवणुकीची सर्व सिद्धता आधीच केलेली होती. हत्ती, घोडदळ ,पायदळ, नगारखाना, कोतवाल ,धोडे,लगी, सांडणीस्वार ,वाजंत्रीचे ताफे वगैरे झाडून सारी जय्यत तयारी होत होती. कोठेही बोभाटा नाही की गोंधळ नाही. प्रत्येक गोष्ट अत्यंत शिस्तीने व चोक होत होती. राजसभा मिरवणूकीत सामील झाली होती.

सोन्याच्या अलंकारांनी शृंगारलेला देखना घोडा महाराजां पुढे आणण्यात आला होता.महाराज त्यावर आरूढ होऊन निघाले व राजांगणात आले .तेथे एक अति सुंदर, शुभलक्षणी हत्ती शृंगारसाज करून सज्ज होता.महाराज त्या हत्तीवर अंबारीत बसले .माहूत म्हणून हत्ती चालवण्यासाठी सरसेनापती अंकुश घेऊन बसले.महाराजांच्या मागे पुढे राजदुंदुभी झडू लागली.शिंगाच्या ललकार्या उठू लागल्या.ताशे ,मर्फे ,तडाडू लागले. भगवा झेंडा फडफडू लागला.भगव्या झेंड्याचा दिमाख आणि मान आज गगनाला पोहोचला होता.

राजबिधीवरून मिरवणूक निघाली.महाराजांच्या हत्तीभोवती खासे खासे पायदळाचे हशम मागे प्रधानमंडळ आणि इतर सर्व लवाजमा चालत होता .केवढे वैभव ते! सुवर्णदंड घेऊन खासबारदार आघाडीला चालत होते व महाराजांच्या नावाच्या ललकार्या ठोकीत होते. मिरवणूक संथ गजगतीने मोठ्या दिमाखात चालली होती. राजमार्गावरील लोकांनी आपली घरे व रस्ते सजिवले होते. घराच्या दारात उभे राहून स्त्रिया मिरवणूकीची वाट पाहत होत्या.महाराजांवर अक्षता टाकून पंचारत्या ओवाळीत होत्या.

गडावरील देवदेवतांची दर्शन घेऊन, महाराज परत मिरवणुकीने सभाद्वारी आले. तेथून मग महाराज राजमंदिरात गेले. दरवाजावर स्त्रियांनी महाराजांवरून लिंबलोन उतरून टाकले.नंतर महाराज महालात गेले. कुलदैवतांना नमस्कार करून मग महाराज आईसाहेबांपाशी आले .त्यांनी आईसाहेबांना नमस्कार केला.येथे राजस्रियांनी महाराजांना ओवाळले.त्यांना या वेळी महाराजांनी बहुमोल वस्रालंकार दिले.आईसाहेबांच्या संसारातील कौतुकाचे हे सुवर्णक्षण होते.

त्यानंतर दुपारी सर्वांसह महाराजांनी भोजन केले आणि तदनंतर महाराज आईसाहेबांपाशी येऊन बसले. त्यांनी आप्तेष्टांस व राजसेवकांस निरोपाचे विडे दिले.अन स्वःत आईसाहेबांपाशी बसून राहिले.खरे सुख त्यांचे तेथेच होते. आईसाहेबांशी महाराज बोलत बसले.ते आईसाहेबांना भारावलेल्या शब्दात म्हणाले,
” आपले आशीर्वाद मनोरथ सिद्धीस गेले !”
आणि मग महाराजांनी आई साहेबांचे आशिर्वाद घेतले. आईसाहेबांना खरोखरच धन्य धन्य वाटले.अशी मायलेकरे ! आणि अशी आई कुठे सापडायची नाही. आणि असा पुत्र कुठेच दिसायचाच नाही .

राज्याभिषेकोत्तर इतर समारंभ व विधी चालूच होते. छत्रपतींची महासभा भरत होती.सार्वभौम,स्वत्व,व स्वाभिमान व्यक्त करण्यासाठी हा सोहळा होता. महाराजांनी या अलौकिक महत्त्वाच्या सोहळ्याचे स्मरण अखंडपणे युगानुयुगे रहावे म्हणून ‘राज्याभिषेक शक, सुरू केला.या शकाला त्यांनी स्वतःचे नाव दिले नाही. राज्याभिषेकाचे नाव दिले. राज्यकारभारात रूढ झालेले शेकडो फार्शी शब्द काढून टाकून त्यांना संस्कृत प्रतिशब्दांचा एक ‘राजव्यवहारकोश ‘सिध्द केला.

राजांनी आपल्या मुद्रेची सुवर्णाची व तांब्याची नाणी पाडण्यास प्रारंभ केला. या नाण्यावर ‘राजाशिवछत्रपती,अशी अक्षरे घातली. स्वराज्याचा ध्वज भगवा ठेवला . संस्कृत भाषेत स्वत्वाची बिजे आहेत.हे महाराजांनी ओळखून संस्कृत भाषेचा व भाषा पंडितांचा फार मोठा आदर केला. अशा विविध गोष्टी सोहळ्याच्या निमित्ताने करण्यात आल्या. या समारंभाच्या मागे काही एक उदात्त तात्विक व ऐतिहासिक भूमिका होती.

प्रत्येकास दानधर्म करून कवी, भाट, कलावंत व गुणीजन यांना संतुष्ट करण्यात आले. राजदूत ,सरदार, पदाधिकारी ,मुत्सद्दी ,आप्त ,सेवक जन ,अष्टप्रधानमंडळ यास वस्त्रे, हत्ती, घोडे, पालख्या, ढाली, तलवारी ,शिक्के- कट्यारी द्रव्य वगैरे ज्याच्या त्याच्या मायन्याप्रमाणे देण्यात आले. समारंभासाठी आलेल्या सर्व स्रियांचा व मुला-मुलींचा देखील राजाने सन्मान केला.कोणालाही वगळले नाही आणि राजे कोणाला विसरले नाहीत.

सर्वांना महाराजांनी खूप खूप दिले.सर्व संतुष्ट झाले.कोणाला काही द्यावयाचे राहिले नाही. असा राजा परत होणे नाही.

लेखन 
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

More Stories
Chhatrapati's fair! Play with Marathas! - Dnyanesh Maharao
छत्रपतींचा मेळा ! मराठ्यांशी खेळा ! ज्ञानेश महाराव
error: Content is protected !!