ajit pawar brand
ajit pawar brand
ajit pawar brand

Ajit Pawar -`अजितदादा`- ब्रँड अजितदादा पवार !

Ajit Pawar - कामाच्या बळावर `अजितदादा` या नावाने महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वाधिक प्रतिष्ठित ब्रँड

Ajit Pawar –`अजितदादा`– ब्रँड अजितदादा पवार !

 

Ajit Pawar – कामाच्या बळावर `अजितदादा` या नावाने महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वाधिक प्रतिष्ठित ब्रँड

 

 

 

 

 

22/7/2021

ब्रँड अजितदादा !

विजय चोरमारे

शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून अजित पवार यांचं राजकारणात पदार्पण झालं.१९९१ मध्ये त्यांना लोकसभेसाठी उभं करून दिल्लीला पाठवण्यात आलं.

पण एका विशिष्ट परिस्थितीत शरद पवार यांना दिल्लीला जावं लागलं आणि काही महिन्यांत अजित पवार Ajit Pawar दिल्ली सोडून राज्यात आले.

तेव्हापासून विधानसभेच्या सगळ्या निवडणुका विक्रमी बहुमतानं ते जिंकत आलेत. शरद पवार यांचा पुतण्या म्हणून प्रारंभीच्या काळात ओळखले जाणारे

अजित पवार आज आपल्या कामाच्या बळावर `अजितदादा` या नावाने महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वाधिक प्रतिष्ठित ब्रँड म्हणून उभे आहेत.

अजित पवार यांच्या राजकीय प्रवासाकडं बघताना अनेक वादग्रस्त घटनांची मालिका दिसते. पहाटेचा शपथविधी हा त्याचा परमोच्चबिंदू. अर्थात राजकीय आयुष्यात चढउतार असतात तसेच योग्य-अयोग्य निर्णयांची मालिकाही असते. अजित पवार यांच्या आयुष्यात अशा घडलेल्या, न घडलेल्या आणि मुद्दाम वादग्रस्त बनवलेल्या घटनांची रेलचेल आहे. एका राजकीय नेत्याच्या आयुष्यातल्या घटना म्हणून त्याकडं तटस्थपणे पाहिल्यानंतर लक्षात येतं की, त्यांच्यासंदर्भातील कितीही नकारात्मक घटनांची उजळणी केली तरी त्या मागे टाकून अजित पवार नावाचा एक चांगला माणूस, कर्तृत्ववान आणि कर्तबगार नेता अधिक ठळकपणे समोर उभा राहतो.

अजितदादांच्या कामाच्या झपाट्याची तुलना करायची झाली तर ती फक्त शरद पवार यांच्याशीच करता येऊ शकते.

अजितदादांचा Ajit Pawar दिवस सकाळी सात वाजता सुरू होतो. सोमवार ते गुरुवार सकाळी सात ते साधारण पावणे नऊ पर्यंत ते मुंबईत बंगल्यावर

लोकांच्या गाठीभेटी घेत असतात. त्यानंतर मंत्रालयात नऊ वाजता पोहोचून त्यांचं तिथलं काम सुरू होतं, ते संध्याकाळपर्यंत. शुक्रवार,

शनिवार पुण्यात हाच झपाटा सुरू असतो. कोविडच्या अगदी सुरुवातीच्या काळात लोक आपापल्या घरात सुरक्षित होते, तेव्हा

अजितदादा न चुकता नियमित मंत्रालयात जाऊन सरकारी कामं मार्गी लावणारे बहुदा एकमेव मंत्री होते. राज्यसरकारपुढं आर्थिक

पातळीवरच्या अनेक अडचणी असताना त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत होते. आरोग्य विभागाच्या कामात कुठं अडथळा येणार नाही

यावर बारीक लक्ष ठेवून होते. कोविड काळात असेल किंवा एरव्हीही त्यांनी ज्या झपाट्यानं आणि झपाटल्यासारखं काम केलं ते थक्क करणारं होतं.

ते काम नीट लोकांपर्यंत पोहोचवलं असतं म्हणजे नुसताच सवंग प्रचार नव्हे, तर आजच्या भाषेत बोलायचं तर त्याचं नीट जाणतेपणाने मार्केटिंग झाले असतं

तर त्यांच्या कामाचा राष्ट्रीय पातळीवर गवगवा झाला असता.

अजितदादांचं आज जे व्यक्तिमत्त्व आहे, ते सुरुवातीपासून तसंच आहे आणि ते आपल्या पद्धतीनं विकसित होत आलंय.

चार भावंडांमध्ये ते दुस-या क्रमांकाचे. भावंडांमध्ये मोठे नसले तरी घरात आवाज त्यांचाच मोठा असायचा. आता पक्षात आणि मंत्रिमंडळात असतो तसाच.

स्वच्छता आणि टापटिप ही त्यांची वैशिष्ट्यं अगदी लहानपणापासूनची. चारही भावंडांमध्ये एकच कपाट असलं तरी अजितदादांचा ड्रॉवर सगळ्यात नीटनेटका असायचा.

सगळं जिथल्या तिथं. कुठलीही गोष्ट इकडं तिकडं झालेली दिसणार नाही. त्यांची सायकलही सदैव लखलखीत. तिच्यावर कधी धुळीचा कण दिसायचा नाही.

आज अजितदादा बासष्ट वर्षांचे आहेत, म्हणजे पन्नास वर्षांत काळ खूप बदलला. अजितदादा सुद्धा बदललेत.

परंतु त्यांची टापटिप आणि नीटनेटकेपणाची सवय बदललेली नाही. आजही त्यांच्या घरात, कार्यालयात वृत्तपत्रं किंवा कागदपत्रं अस्ताव्यस्त पडलेली दिसत नाहीत.

पवारांच्यात शेतीची आवड परंपरेनंच चालत आली आहे. अजितदादाही त्याला अपवाद नाहीत. अगदी लहानपणापासून ते शेतात खूप राबलेत.

शेतीतली सगळी कामं त्यांनी केलीत. खडकावर बियाणं रुजवण्याची जिद्द बाळगून ते काम करतात. अंगणात असो किंवा बांधावर – रोप लावलं तर ते जगलंच पाहिजे

यासाठी वाट्टेल ते करायची त्यांची तयारी असते. कामाचा झपाटा एवढा की चार चार स्वीय सहाय्यकांची दमछाक होते. अनेकदा अनेकांवर रागावतात,

पण ते विसरून पुढं जातात. पूर्वी बारामती मतदारसंघातल्या वाडीवस्तीवरच्या लोकांना त्यांचा आधार वाटायचा,

आता महाराष्ट्रातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला त्यांचा आधार वाटतो. राज्याच्या कुठल्याही भागातलं विधायक काम घेऊन कोणत्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी

त्यांच्याकडं गेला तरी ते कामाच्या गुणवत्तेवर ते करून देतात. वावगं काम घेऊन गेलेल्याचा जाहीर पाणउताराही ठरलेला असतो.

त्यांच्या प्रशासकीय वर्तुळातल्या एकानं सांगितलेला एक किस्सा मोठा रंजक आहे. त्यांच्या पक्षाचा एक पदाधिकारी गावाकडच्या कसल्यातरी

कामासाठी गावक-यांचं शिष्टमंडळ घेऊन त्यांच्याकडं गेला. ते काम होऊ शकणारं नव्हतं, परंतु लोकांच्या आग्रहास्तव त्याला जावं लागलं.

भेटायला गेल्यावर त्यानं आधी चिठ्ठी दिली. चिठ्ठी वाचून अजितदादांनी कपाळावर हात मारून घेतला. संबंधित व्यक्तिनं चिठ्ठीवर नाव लिहिलंच होतं,

पण त्यापुढं लिहिलं होतं की, `आदरणीय दादा, मी जे काम घेऊन आलोय ते होण्यासारखं नाही हे मला माहिती आहे. पण लोकांच्या आग्रहामुळं मला यावं लागलं

आहे. तरी कृपया सर्वांसमक्ष माझा पाणउतारा करू नये…`

अजितदादांचा दरारा आहे तो असा. अर्थात त्याकडं बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो.

अजितदादा Ajit Pawar हे काही आर. आर. पाटील किंवा धनंजय मुंडे यांच्यासारखे प्रभावी वक्ते नव्हेत किंवा जयंत पाटलांसारखे लयबद्धपणे

मुद्देसूद मांडणी करण्याचे कौशल्यही त्यांच्याकडे नव्हते. सभेत भाषणासाठी हळुहळू तयार होत गेले. जाहीर सभांमधून ते स्थानिक नेत्यांचे पाणउतारे करू लागले,

त्याला दाद मिळू लागली. सत्तेतली त्यांची ताकद वाढू लागली तेव्हा त्यांच्या विनोदावर हशा-टाळ्या पडायला लागल्या. सत्तेतल्या सगळ्यांनाच तसा अनुभव येतो.

सुमार कोट्या आणि विनोदांना दाद मिळायला लागली की वक्त्याला चेव येतो. आणि मग विनोद करायच्या नादात कधीकधी मोठी गफलत होते.

त्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड उठते. नेता अडचणीत आल्यावर मग आधी परखडपणाचे कौतुक करणारे लोक त्याच फटकळपणाला मग्रूरी किंवा

सत्तेची मस्ती म्हणू लागतात. हितसंबध दुखावलेली मंडळी, राजकीय विरोधक तसाच अपप्रचार करत राहतात. अर्थात त्याचा अनुभव अजितदादांइतका दुस-या कुणी घेतला नसेल.

माणूस सत्तेत एका विशिष्ट उंचीवर पोहोचला की कुणाचं ऐकण्याच्या मनस्थितीत राहात नाही. आपण करतो ती पूर्व आणि तेच अंतिम असा समज वाढत जातो.

१९९० नंतरच्या काळात एकत्रित काँग्रेस असताना शरद पवारही असेच अमर्याद सत्ताधीश बनले होते आणि त्याची परिणती सत्तेतून बाहेर जाण्यात झाली होती.

ते शरद पवार असल्यामुळे परिस्थितीवर मात कशी करायची ते त्यांना ठाऊक होते आणि त्यांनी ते करून दाखवलेही.

राजकारणात राहून अंगी येणारे दुर्गुण झटकण्यासाठी किंवा दुर्गुणांचा, अहंकाराचा वारा शिवू नये म्हणून आजसुद्धा यशवंतराव चव्हाण मार्ग दाखवू शकतात,

हे अजित पवार Ajit Pawar यांनीच नव्हे तर नव्या पिढीतल्या सगळ्या राजकीय नेत्यांनी समजून घ्यायला पाहिजे. शरद पवार हे मार्ग दाखवणाऱ्यांपैकी नाहीत.

त्यांचं बारकाईनं अवलोकन करायचं असतं. त्यांच्या चाली टिपून घ्यायच्या असतात आणि कधीतरी उपयोग करण्यासाठी राखीव ठेवायच्या असतात.

यशवंतरावांचं तसं नाही. संभ्रमात असलेल्या कुणाही राजकीय नेत्याची कोंडी होते, तेव्हा त्याला यशवंतरावच मार्ग दाखवू शकतात.

यशवंतरावांनी एके ठिकाणी लिहिलंय –

‘राजकारणामध्ये यशस्वी होणे एक कष्टसाध्य काम आहे. संघटनेतील कार्यकर्त्यांमध्ये स्नेहाचे जाळे विणावे लागते, माणसे सांभाळावी लागतात,

वाढवावी लागतात व त्यासाठी असंख्यांच्या मनाची जपणूक वर्षानुवर्ष करावी लागते. पण त्यांतले काही थोडे, पण मोठे लोक त्यांच्या महत्त्वाकांक्षेला

किंचितसा ओरखडा जाताच वैरभावाचा फणा उभारतात.`

अजित पवारांनी Ajit Pawar त्याचा अनुभव पुरेपूर घेतला आहे. राजकारणातील अनेक चढउतारांचा सामना करीत ते आजच्या स्थानी पोहोचले आहेत.

आज ते महाविकास आघाडीच्या सरकारमधले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधलेही दुस-या क्रमांकाचे नेते आहेत. त्यांची सध्याची कार्यशैली या

दुस-या क्रमांकासाठी योग्य असेलही. परंतु अजित पवार यांची क्षमता आणि योग्यता मोठी आहे. दोन्ही ठिकाणी पहिल्या क्रमांकावर काम

करण्यासाठी त्यांना केवळ सध्याची कार्यशैली उपयोगी ठरणार नाही. आताच्यातल्या काही गोष्टी टाकून देऊन अनेक नव्या गोष्टी त्यांना आत्मसात कराव्या लागतील.

इथेही पुन्हा यशवंतरावच त्यांच्या मदतीला धावून येतील.

यशवंतरावांनी म्हटलंय, ‘नेता असणाऱ्याला, नेतृत्व करणाऱ्याला सर्वांच्या अग्रभागी, शिरोभागी राहावे लागते,  पण ते श्रेणीने – सर्वांच्या शिरोभागी म्हणजे

प्रत्यक्ष डोक्यावर नव्हे. तसा तो डोक्यावर बसून राहिला, तर त्याला ज्यांचे नेतृत्व करावयाचे आहे, त्यांच्या भावना, आशा-आकांक्षा स्वभावतःच तो पायदळी तुडवू लागतो.

असे घडले, म्हणजे त्या नेत्याबद्दलचा, नेतृत्वाबद्दलचा आदर संपुष्टात येतो. इतकेच नव्हे, तर ते नेतृत्वही संपुष्टात येते. ज्याला नेतृत्व करावयाचे आहे,

त्याने अशी काही पथ्ये पाळली पाहिजेत.`

अजितदादांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
prithvi raj chouhan
prithvi raj chouhan – पृथ्वीराज चौहान – चूको मत चौहान
error: Content is protected !!
%d bloggers like this: