chancellor of university
chancellor of university
chancellor of university

chancellor of university – माजी कुलगुरू,डॉ. स्नेहलता देशमुख

chancellor of university - माजी कुलगुरू, आदरणीय डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी जागवलेल्या आठवणी..!

chancellor of university – माजी कुलगुरू,डॉ. स्नेहलता देशमुख

 

 

chancellor of university – माजी कुलगुरू, आदरणीय डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त

पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी जागवलेल्या आठवणी..!

 

 

 

सेवितो आकंठ तरीही, मी भुकेला राहताहे..

न हि ज्ञानेन सदृशम्, पवित्रम् इह विद्यते |

ज्ञानाइतकी जगात दुसरी कुठलीही पवित्र आणि सुंदर गोष्ट नाही. हा श्लोक गुणगुणताना मला सर्वप्रथम न चुकता कोणाची जर आठवण येत असेल, तर ती ‘ज्ञानमूर्ती’ म्हणजे साक्षात् – डॉ स्नेहलताबाई देशमुख!

सुहास्यवदना, सर्वांवर सदैव आपल्या प्रसन्नतेचा शिडकावा करून वातावरण आनंदी करणारी, वाग्विलासिनी, स्नेहमयी – स्नेहलता बाई..!
आज ८२ व्या वर्षीही बाईंचा षोडशेचा उत्साह आणि प्रखर बुद्धिमत्तेचे जे तेज त्यांच्या चेहर्‍यावर विलसत आहे, त्याला तोडच नाही. असे जरी असले, तरी त्यांचे पाय आजही धरतीवरच आहेत. सूर्याचे तेज आणि चंद्राची शीतलता म्हणजे डॉ. स्नेहलता !

बाईंना निसर्ग खूप जवळचा वाटतो आणि निसर्गातलं संगीतही भुलवतं. इतरांच्या ‘दिलात’ (हृदयात) रुबाबाने विराजमान होणारी ही छोटी मुलगी, वडिलांच्या (प्रख्यात सर्जन आणि KEM चे माजी डीन, डॉ. जोगळेकरांच्या) प्रोत्साहनामुळे एकेकाळी दिलरूबा शिकत असे.

मलाही स्नेहलता बाईंनी अनेक वर्षे खूप प्रोत्साहन दिलंय. आमचे परमप्रिय शेजारी, सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन, डॉ. रविन थत्तेंनी ‘ज्ञानेश्वरी’ जेव्हा इंग्रजीत लिहिली, तेंव्हा बाईंच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन सायन हॉस्पिटलमध्ये झालं. या कार्यक्रमाची सुरुवात मी पसायदानाने केली. त्यावेळी बाईंचं भाषण, नेहमीप्रमाणेच सुंदर झालं. भाषणात बाईंनी माझं भरभरून केलेलं कौतुक ऐकून मला कोण आनंद झाला होता! बाईंची वाणी म्हणजे साखरच जणू! कौतुक करायचे तर कुठेही कंजूषी नाही! पण बाईंना व्यक्तीही, अगदी एक्सरे केल्यासारख्या उमगतात बरे! त्यामुळे कुणालाही न दुखवता केलेल्या, त्यांच्या (sugar coated) स्पष्टवक्तेपणामुळे, त्यांच्याविषयी जनमानसात सर्वांना प्रेम, आदर आणि ‘दरारा’ही तितकाच वाटतो!

बाईंना त्यांच्या आईविषयी वाटणार्‍या अपार प्रेमामुळे त्यांनी ‘आई’ हे पुस्तक संपादित केलं. त्यात डॉ. विजया वाड बाईंसारख्या समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी आपले आईबद्दलचे सुंदर अनुभव लिहिले. त्या पुस्तक प्रकाशनावेळी स्नेहलता बाईंनी माझा संपूर्ण कार्यक्रम आयोजित केला, हा फार मोठा आनंद आणि मान होता माझ्यासाठी!

सुप्रसिद्ध spine स्पेशालिस्ट, डॉ. प्रेमानंद रामाणींच्या ‘ताठ कणा’ या पुस्तक प्रकाशन समारंभीही त्यांचे भाषण केवळ अप्रतिमच नव्हे, तर सर्वोत्कृष्ट झाले होते. अशी त्यांची अनेक भाषणे मी प्रचंड भारावून जाऊन ऐकली आहेत. त्या बोलतात की गातात हेच कळत नाही. “बोलावे कसे, गावे जसे.. आणि गावे कसे, बोलावे जसे..” म्हणूनच ‘या लताबाईंचे’ असे गायनही नेहमीच मंत्रमुग्ध करणारे ठरते!

काही वर्षांपूर्वी आदरणीय डॉ. वेळूकर (माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ) यांना, ते नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू असताना, बाईंनी माझे नाव, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या कविता रेकॉर्ड करण्यासाठी सुचवले. या थोर क्रांतिकारक, समाजसुधारक सावित्रीबाईंच्या सुंदर कविता मला गायला मिळणे, हाही बहुमान मला बाईंमुळेच मिळाला!

दरवर्षी मी आणि माझे पती सुनील न चुकता, बाईंच्या प्रेमळ आग्रहामुळे गणेशोत्सवात दर्शनाला त्यांच्या घरी पार्ल्याला जातो. मी प्रार्थना म्हणताना माझ्या गाण्याने, देवाला काय वाटते माहीत नाही.. पण बाईंच्या नजरेत इतकं ममत्व भरून आलेलं असतं, की ‘पाहता श्रीमुख सुखावले सुख…’ अशीच त्यांची भावना असावी.
या वर्षी बाईंनी गणेश दर्शन ऑनलाईन ठेवले आणि त्याबरोबर व्हिडिओ मध्ये प्रेमाने माझी ‘जय जय जय सुत महेश’ ही गणेश वंदना जोडायलाही त्या विसरल्या नाहीत, याचा मला खूप आनंद झाला..

त्यांच्या माहेरचे आणि माझ्या सासरचे आडनाव ही जोगळेकरच. म्हणून आमच्यातला प्रेमाचा रेशमी धागा नातं घट्ट करतो, असंही आम्ही गमतीनं म्हणतो.
“Whenever a female appreciates a female, it is from the bottom the heart!” हे बाईंचं वाक्य मला तंतोतंत पटतं. खरंतर, बाईंच्या जिव्हेवर साक्षात् सरस्वती वसली आहे. मराठी, इंग्रजी, संस्कृत या भाषांवरच काय, तर कुठल्याही विषयावर आणि विचारांवर त्यांचे प्रभुत्व आहे. जागोजागी सुयोग्य ठिकाणी पेरलेली संस्कृत सुभाषिते, काव्याची जबरदस्त जाण, दांडगी स्मरणशक्ती आणि तल्लख विनोदबुद्धी अशा अनेक गोष्टींमुळे त्यांचे भाषण हे विद्वत्ताप्रचुर असूनही सहजसुंदर आणि रंजक होते.

एक प्रख्यात आणि यशस्वी Pediatric सर्जन म्हणून त्यांचे अनुभव ऐकताना आणि समाजाविषयी कळकळ पाहताना, दिव्यांगांची सहवेदना जाणणारी, सतत सर्वांना मदतीचा हात पुढे करणारी ही संवेदनशील स्त्री, समाजाची आईच आहे असं मला वाटतं.

सुदृढ बाळ जन्मण्यासाठी गर्भवती स्त्रीचा आणि बाळंतिणीचा आहार कसा पोषक असावा, गर्भात असताना सातव्या महिन्यापासून संगीताच्या सान्निध्यात, बाळाचे वजन rhythm मुळे कसे वाढवावे, बाळामधे जर काही व्यंग असेल तर आईची मनोवस्था कशी सुधारावी, एक दिवसाच्या तान्ह्या बाळाचेही आज यशस्वीपणे ऑपरेशन करता येते, याची आईला जाण करून देऊन, तिचा आत्मविश्वास वाढवून बालकांची आयुष्ये, ऑपरेशन नंतर जणू पुनर्जन्मच देऊन बाईंनी उजळवली आहेत. बाळाच्या आईचे हसू पाहताना त्यांना आयुष्याचे सार्थकच झाल्याचे जाणवत असेल!

कुठल्याही कठीण परिस्थितीत काय करावे, कसे वागावे, सकारात्मकता कशी जागी करावी, याची ‘सर्जन’शीलताच त्यांच्या ठायी दिसून येते. अशा वेळी मला आदरणीय माजी पंतप्रधान अटलजींच्या ओळी आठवतात,
‘हार नहीं मानूँगा, रार नई ठानूँगा,
काल के कपाल पर, लिखता मिटाता हूँ
गीत गाता हूँ..’
अशीच काळाच्या भाळावर लिहिण्याची आणि पुसूनसुद्धा टाकण्याची क्षमता असणार्‍या डॉ. स्नेहलताबाईंना आपल्या गव्हर्नर साहेबांनी मुंबई विद्यापीठाच्या chancellor of university ‘कुलगुरू’ पदी नेमून, कुलगुरू पदाला एक वेगळी प्रतिष्ठाच मिळवून दिली!

आपल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता बाळगणारी आणि शिष्यांवर माया करणारी, साधेपणा व माणुसकी जपणारी देशप्रेमी, चैतन्याचा झरा असलेली chancellor of university डॉ. स्नेहलता ताई, ही स्त्री शक्तीचे समाजातील एक मोठे उदाहरणच आहे. प्रेमळपणा आणि कणखरपणा याचे त्या अद्भुत रसायनच आहेत. किचन सायन्ससारख्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमधे शास्त्रीय दृष्टिकोन पाहण्याची वृत्ती, त्यांच्यामधे असल्याने, त्यांनी नातवंडांमधे रमून, त्यांच्यासाठी कॉम्प्युटरसह नव्या युगाच्या सगळ्या यच्चयावत गोष्टी शिकण्याचा ध्यास घेतलाय. नवनवीन गोष्टी शिकण्याची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही.

आज ८२ व्या वर्षीही बाईंच्या या वृत्तीला पाहून म्हणावेसे वाटते,
“मी भुकेला सर्वदाचा, भूक माझी फार मोठी
मंदिरी या बैसलो मी , घेऊनिया ताटवाटी.. 
ज्ञानमेवा रोज खातो, भूक माझी वाढताहे,
सेवितो आकंठ तरिही, मी भुकेला राहताहे..”

सेवेच्या कार्यातच परमेश्वर पाहणार्‍या, आपल्या सर्वांच्या लाडक्या स्नेहलताबाईंना यापुढेही उत्तम आयुरारोग्य लाभो ही प्रार्थना..!

 

 

पद्मजा फेणाणी जोगळेकर.

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
break the chain
break the chain – सत्तासंघर्षाची ब्रेक द चेन
error: Content is protected !!
%d bloggers like this: