Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIASANSKRITISANSKRITI DHARA

Diwali 2022 – दिवाळी बलिप्रतिपदा

1 Mins read
  • Diwali 2022 - दिवाळी बलिप्रतिपदा

Diwali 2022 – दिवाळी बलिप्रतिपदा

Diwali 2022 – बळीराजाचा वंशज अन् शेतकरी

 

 

बळी ! सात काळजाच्या आत जपून ठेवावा, असा निरागस माणूस. आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ सम्यक रीतीने विभागून देणारा संविभागी नेता!! भारतीयांचे वास्तव आणि विधायक पूर्वसंचित असलेला कृती, प्रकृती आणि संस्कृती यांचा तजेलदार मोहर!!!
बळी- हिरण्यकश्यपूचा पणतू, प्रल्हादाचा नातू, विरोचनाचा पुत्र, कपिलाचा पुतण्या, आणि बाणाचा पिता. भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व! सुमारे साडेतीन ते पाच हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेला भारतीय बहुजन समाजाचा एक महानायक, एक महान सम्राट, एक महान तत्ववेत्ता!
या बळीचा वंश, तो बळीवंश या बळीवंशातील माणसे-आपली माणसे, आपल्या रक्तामांसाची माणसे आणि मुख्य म्हणजे आपल्या विचारांची माणसे! ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण गमावणे पत्करले, पण तत्वांशी द्रोह केला नाही, आपल्या श्वासोच्छवासांवर दडपणे लादून घेणे मान्य केले नाही, अशी माणसे.
आपण मात्र असे धन्य, की आपण आपल्या डोळ्यादेखत त्यांच्या स्मृतीना खुशाल करपू- कोमेजू दिले; त्यांना आपल्या हृदयापासून सात तटांच्या आणि मस्तकापासून सात उंबरठ्याच्या बाहेरच रोखून धरले. या सगळ्याला थोडे अपवाद असतील, पण इतरांपैकी काही जणांनी त्यांना विसरून जाण्यात आपले सुख शोधले आणि काही जणांनी तर त्यांची निंदा करण्यात पुण्याचा मार्ग पाहिला. या लोकांना आज ना उद्या आपल्या अंतर्यामी असलेले त्यांचे अस्तित्व जाणवेल आणि त्या जाणीवेने त्यांचा स्व अक्षरशः मोहरून बहरून येईल, असा विश्वास आहे. ज्यांनी त्यांचे महात्म्य आधीच ओळखले आहे, त्यांच्यापुढे मात्र आपण नतमस्तक व्हायलाच हवे.

बळी हा कुळस्वामीः महात्मा फुले

महात्मा फुले यांनी ‘दस्यूचा पोवाडा’ म्हणून जो पोवाडा लिहिला आहे, त्याच्या तिसऱ्या कडव्याची सुरुवातच त्यांनी ‘बळी राज्यादि कुलस्वामीला’ या शब्दांनी केली आहे. येथे ‘राज्यादि’ हा शब्द ‘राजादि’ या अर्थाने आलेला आहे. कारण, बळीच्या राज्याला कुळस्वामी म्हणणे, हे आशयाच्या दृष्टीने जुळत नाही. याउलट, बळीराजाचा तसा निर्देश करणे हे मात्र पूर्णपणे सुसंगत ठरते. महात्मा फुले बळीराजाला कुलस्वामी मानतात याचाच अर्थ ते त्याला आपला अत्यंत आदरणीय पूर्वज मानतात, या उल्लेखाद्वारे ते एक प्रकारे बळीराजा बरोबरचे आणि पर्यायाने बळीवंशाबरोबरचे आपले नातेच सांगून टाकतात. कुळस्वामीकडे हल्ली देवता म्हणून पाहिले जात असले तरी, कुळस्वामी म्हणजे मूळ पुरुष, हाच खराखुरा अर्थ आहे, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे.(पृष्ठ १३)

महाराष्ट्रामध्ये शेतकर्‍याला बळीराजा म्हणतात

सिंधू संस्कृतीमध्ये धान्याची कोठारे होती. याचा अर्थ सिंधु संस्कृतीचे निर्माते फार उत्तम दर्जाची शेती करत होते. असुरांकडे शेती करण्याचे विलक्षण कौशल्य होते. हे आपण पाहिले आहेच. बळीच्या राज्यात उत्तम शेती होत होती, याचे उल्लेखही आपण पाहिले आहेच. पाणी अडवून वापरण्याचे त्यांचे कौशल्य तर वैदिक वाङ्मयात स्पष्ट झाले आहेच. या सगळ्या घटकांचा समन्वय केला असता, बळी आणि त्याच्या वंशातील इतर लोक यांचा शेतीबरोबर असलेला घनिष्ठ संबंध ध्यानात येतो. महाराष्ट्रातील बहुजन समाजाने हा संबंध पिढ्या-न्-पिढ्या आपल्या काळजाच्या आत अगदी अलगदपणे आणि तरीही अतूटपणे जपून ठेवला आहे. याचा एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा म्हणजे महाराष्ट्रात शेतकर्‍याचा निर्देश ‘बळीराजा’ या शब्दाने केला जातो. शेतकऱ्याला हा शब्द वापरणे ही बाब सामान्य नाही. ती गांभीर्याने न घेता उपेक्षेने मारावी, अशी तर नाहीच नाही. शेतकऱ्याला उद्देशून जेव्हा जेव्हा हा शब्द वापरला जातो तेव्हा तेव्हा त्या शेतकऱ्याचे अपार कष्ट, त्याची आपल्या शेतावरची विलक्षण श्रद्धा, त्याचे निष्कपट आचरण आणि त्याच्या मनाचा उमदेपणा अशा कितीतरी गोष्टींचे या शब्दातून दर्शन घडत असते. हे सगळे सद्गुण बळीराजाच्या व्यक्तिमत्त्वामध्ये होते आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनातही असतात, हा त्या दोघांना जोडणारा एक बळकट दुवा आहे.
केरळमधील ओणमचे स्वरूप समजावून घेतानाही हा धागा ध्यानात घेणे आवश्यक आहे. ओणम हा सण केरळमध्ये सुगीच्या हंगामाशी जोडलेला आहे. ओणमकडे बळीच्या स्मृती बरोबरच हार्वेस्ट फेस्टिवल म्हणूनही पाहतात. महाराष्ट्र आणि केरळ या दोन्ही राज्यांनी बळीराजाचे शेतीबरोबरचे नाते कृतज्ञतापूर्वक स्मरणात ठेवले आहे, असा याचा अर्थ होतो. पूर्वी ओणम कर्नाटक आणि तामिळनाडू या प्रदेशांमधूनही साजरा होत होता. हे पाहता सर्व दक्षिण भारतात बळीराजाचे शेतीबरोबरचे नाते काळजीपूर्वक जपण्यात आले आहे असे म्हणता येते.

संत तुकारामांनी बळीची बाजू घेऊन विष्णूला दोष दिला.
संत तुकारामांनी आपल्या एका विख्यात अभंगात बळीराजाची बाजू जोरदारपणे मांडली आहे. ती मांडताना त्यांनी त्यांच्या लाडक्या ईश्वराबरोबर भांडणच केले आहे असे म्हटले, तर अतिशयोक्ती होणार नाही. ते म्हणतात,
हरि तूं निष्ठुर निर्गुण।
नाही माया बहु कठीण।
नव्हे ते करीसी आन।
कवणें नाही केले ते।।१।।
बळी सर्वस्वे उदार।
जेणे उभारीला कर।
करुनी काहार।
तो पातळी घातला।।६।।
तुकारामांनी येथे विष्णूला म्हणजेच पर्यायाने ईश्वराला निष्ठुर, निर्गुण, दयामाया नसलेला आणि फार कठीण मनाचा अशी विशेषणे लावली आहेत. जी निर्दय कर्मे दुसर्‍या कोणीही केली नाहीत,ती विष्णूने केल्याचा गंभीर ठपका तुकारामांनी त्याच्यावर ठेवला आहे. याचा अर्थ ईश्वराची ही कृत्ये इतकी अनैतिक आहेत, की दुसर्‍या कोणीही आपल्या कर्मांद्वारे व्यक्त केलेली नाही. ईश्वराने हरिश्चंद्र, नळ,शिबी आणि कर्ण यांचा छळ केल्याची आणि त्यांची फसवणूक केल्याची तक्रारही तुकारामांनी याच अभंगात केली आहे. त्यानंतर त्यांनी बळीवर करण्यात आलेल्या अन्यायावर बोट ठेवले आहे. बळी सर्व प्रकारे उदार होता, त्याने दान देण्यासाठी हात वर केलेला होता, परंतु विष्णूने कहर करून त्याला पाताळात घातले, असे म्हणून तुकारामांनी आपल्या मनातील क्षोभ व्यक्त केला आहे. (पृष्ठ.३३६-३७)

साभारः

बळीवंश

-डॉ.आ.ह.साळुंखे

संकलनः अनुज हुलके

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: