८ एप्रिल १657 ला छत्रपती शिवाजी महाराज
व काशिबाई राणीसाहेब यांचा विवाह 

 

 

छत्रपती शिवाजीराजे यांचा सहावा विवाह काशीबाई जाधवराव यांच्याशी वैशाख शुद्ध पंचमीला        ( ८ एप्रिल -१६५७ ) रोजी राजगडावर जिजाऊसाहेबांच्या उपस्थितीत पार पडला. काशीबाई साहेबांचा जन्म सन १६४८ मध्ये जाधवराव घराण्यात झाला. काशीबाईसाहेब या संताजी जाधवराव यांच्या कन्या होत.संताजी जाधवराव म्हणजे जिजाऊसाहेबांचे भाऊ अचलोजी यांचे द्वितीय सुपुत्र.संताजी उर्फ सुजनसिंह यांच्या कन्या म्हणजे काशीबाईसाहेब.

जिजाऊंचे वडील लखुजी जाधवराव हे निजामशाहीतील मातब्बर व पराक्रमी सरदार होते. १६२९ मध्ये देवगिरीच्या किल्ल्यात बुरा निजामशहा तिसरा ह्याने केवळ संशयावरून लखुजीराव जाधवराव त्यांचे पुत्र रघुजी व अचलोजी आणि लखुजींचे नातू यशवंतराव यांची हत्या केली. जिजाऊंचे जन्मदाते व दोन भाऊ ,भाचा ठार झाले .बंद झालेले माहेर पुढे संपूर्ण उध्वस्त झाले. जिजाऊ व शिवाजीराजे पुढे दोन वर्षांनी सिंदखेडला आले. लखुजीराजे यांच्या मृत्यूनंतर जाधव घराण्यातील वीर पुरुष व स्त्रियांनी अत्यंत मोलाचे कार्य पुढे स्वराज्यासाठी केले.

जिजाऊंचे ज्येष्ठ पुत्र व छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेष्ठ बंधु संभाजीराजे यांच्या बरोबर कनकगिरीच्या लढाईत लखुजीराजे यांचे नातु सृजनसिंह ऊर्फ संताजी जाधव ठार झाले होते. कारण स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मदत म्हणून जाधवांकडील लोकांना जिजाऊसाहेबांनी आपल्या सोबत आणले होते.

संताजी जाधवांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा शंभूसिंह जाधवराव, दत्ताजी जाधवरावांचा मुलगा ठाकूरजी यांना जिजाऊंनी आपल्याबरोबर राजगडावर आणले होते. मोठ्या प्रेमाने आऊसाहेबांनी त्यांचा सांभाळ केला होता. शंभूसिंह जाधवराव स्वराज्यनिर्मीतीच्या कामासाठी छ. शिवाजीराजांच्या बरोबर होते .त्यांनी राजांबरोबर अत्यंत मोलाचे कार्य केले. अफजलखानाच्या वधाच्या वेळी महाराजांच्या सोबत शंभूसिंह जाधवराव होते.

सिद्दी जौहरने पन्हाळा किल्ल्याला वेढा दिला तेव्हा महाराजांना विशालगडावर पोहचण्याचे अत्यंत जिकीरीचे काम शंभूसिंह जाधवरावांनी केले होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या रक्षणाकरता गजापूरच्या खिंडीत शंभूसिंह जाधवराव प्राणपणाने लढले होते. याच लढाईत शंभूसिंह जाधवराव ठार झाले होते.त्यानंतर त्यांचाच मुलगा धनाजी जाधवराव यांनी छत्रपती संभाजी महाराजांनंतर मराठ्यांचा स्वतंत्र लढा लढविला व आपले स्वराज्य वाचवले होते. संताजी जाधव यांचे पुत्र शंभूसिंह जाधवराव यांनी आपले बलिदान देऊन स्वराज्यासाठी अत्यंत मोलाचे कार्य केले होते.

अचलोजींच्या पत्नी आपले पुत्र संताजी यांच्यासह जिजाऊंच्या आश्रयाला आल्या होत्या. वडील लखुजी जाधवराव व बंधू अचलोजी जाधवराव या दोघांनी जाधवराव घराण्याला सतराव्या शतकाच्या आरंभी मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती. दौलताबाद व सिंदखेड राजा मुलुख इत्यादी भागात त्यांचा मोठा दरारा होता.

परंतु दौलताबादेस निजामशहाकडून विश्वासघाताने लखुजी जाधवराव व त्यांचे दोघे पुत्र अचलोजी, रघुजी आणि नातू यशवंतराव हे सर्व पुरुष एकाच वेळी मारले गेले. या प्रकारानंतर अचलोजींचा अल्पवयीन मुलगा संताजी जाधवराव यांना रायगडावर आणून त्यांचे पालन-पोषण जिजाऊसाहेबांनीच राजगडावर केले होते.संताजी लहानपणापासून राजगडावरच राहिले होते. सुजनसिंह,उर्फ संताजी यांना दोन मुले होती. पुत्र शंभुसिंह आणि कन्या काशिबाई साहेब. काशिबाई साहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांचा विवाह मोठ्या थाटामाटात राजगडावर करून जिजाऊंनी जाधव-राजेभोसले संबंध परत एकदा जवळ केले.

काशीबाईसाहेबाचे वडिल आणि शहाजीराजे यांचे जेष्ठ पुत्र संभाजीराजे,हे समवयस्क होते. सुजनसिंह हे कनकगिरीच्या युध्दात शहिद झाले ,आणि काशीबाईसाहेब यांचे बंधु शंभुसिंह हे पावनखिंडीत शहीद झाले . काशीबाई साहेबांना अपत्य नव्हते. त्यांचा मृत्यु १६ मार्च १६७४ मध्ये झाला. काशिबाई राणीसाहेब यांची समाधी पाचाड येथे कुशावर्त तलावाच्या जवळ आहे.

 
लेखन 
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर
संदर्भ 
शिवपत्नी महाराणी सईबाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here