Tararani – करवीर वासिनी ताराराणी भोसले साहेब

Tararani – करवीर वासिनी ताराराणी भोसले साहेब Tararani – ताराराणी भोसले साहेब 11/10/2021, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब बादशहा महाराष्ट्रात आला. तो २७ वर्षे येथेच राहिला.छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम यांच्या मृत्यूनंतर इ.स.१७०० सालापासून महाराणी ताराराणींनी औरंगजेबाशी सात वर्षे शौर्यशाली लढत दिली.शूर सेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाकट्या सुन म्हणजेच राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई या अत्यंत तेजस्वी व तडफदार होत्या. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर वैधव्याचे दुःख गिळून मराठी राज्यासाठी घोड्यावर स्वार The post Tararani – करवीर वासिनी ताराराणी भोसले साहेब appeared first on Postbox India. postboxindia Postbox India - Anytime Everything
 
Tararani – करवीर वासिनी ताराराणी भोसले साहेब

Tararani – करवीर वासिनी ताराराणी भोसले साहेब

Tararani – ताराराणी भोसले साहेब

 

 

 

11/10/2021,

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब बादशहा महाराष्ट्रात आला.
तो २७ वर्षे येथेच राहिला.छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती राजाराम यांच्या मृत्यूनंतर इ.स.१७०० सालापासून महाराणी ताराराणींनी औरंगजेबाशी सात वर्षे शौर्यशाली लढत दिली.शूर सेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाकट्या सुन म्हणजेच राजाराम महाराजांच्या पत्नी महाराणी ताराबाई या अत्यंत तेजस्वी व तडफदार होत्या.
छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर वैधव्याचे दुःख गिळून मराठी राज्यासाठी घोड्यावर स्वार होऊन त्यांनी पदर खोचला,आणि हाती तलवार घेऊन औरंगजेबाचे लष्करी आव्हान स्वीकारले. इतिहासातील या असामान्य स्त्री बद्दल सर्व मराठी जनतेला अभिमान व स्फूर्ती वाटायला हवी .

ताराराणींचे संपूर्ण आयुष्य सुखदुःखाने भरलेले व मराठी मनाला मोहविणारे होते. हिंदुस्थानभर सत्ता असणार्या बादशहा औरंगजेबाशी त्यांनी समर्थपणे दिलेला लढा महाराष्ट्र कधिही विसरणार नाही.

जगातील सर्वश्रेष्ठ लढव्वयी,झुंजार व कर्तबगार स्री म्हणून Tararani ताराराणींची ओळख आहे .

ज्या औरंगजेबाची मान कधीच झुकली नाही ,त्या दिल्लीच्या तख्ताला ताराराणी यांनी नाकी नऊ आणले.
एक स्री असूनदेखील छत्रपतींच्या विचाराल‍ा ,स्वराज्याला जपले , वाढवले पण त्या कोणाही पुढे झुकल्या नाहीत. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यू नंतर ताराराणी यांनी मराठी राज्याची सर्व जबाबदारी आपल्यावरंच आहे, हे ओळखून त्यांनी राज्यकारभाराची सर्व सूत्रे लगेचच आपल्या हाती घेतली.
ताराराणी यांनी मोगलांशी लढत असताना सर्व मराठ्यांना आपल्या धाकात ठेवून त्यांना स्वराज्यासाठी लढण्याची प्रेरणा दिली. मराठ्यांच्या अंगी असणार्या शौर्य ,पराक्रमादी गुणांना त्यांनी उत्तेजन व वाव दिला.मराठ्यांना मोगल मुलखात धाडून तेथे धामधूम माजवून .दिल्लीतील मोगलांची राज्यकारभार यंत्रणा उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली.
त्यामुळे दिल्लीकराचे नीतिधैर्य खचले.या ऊलट मराठी राज्यकर्त्यांचे व लष्कराचे नीतिधैर्य वाढले होते. ताराराणींनी औरंगजेबासारख्या हिकमती व बलशाली सम्राटाशी सामना देण्यात अपूर्व शौर्य दाखविले .

औरंगजेबाबरोबर सतत लढा देऊन किंवा गनिमीकाव्याने युध्द करुन त्यांना जीव नकोसा करून सोडला होता.दिल्लीच्या मोगलांना खडे चारून ताराराणी यांनी मराठी सत्तेचे संरक्षण केले .
ताराराणींनी मोठे अवघड व जिकिरीचे काम केले. म्हणूनच महाराष्ट्रात औरंगजेबाला पाय रोवता आले नाहीत. पुढे मोगलांना मराठी मुलखात सत्ता वाढवता आली नाही . Tararani ताराराणी अतिशय कर्तृत्ववान, करारी , कडवी ,राज्यकारभार करण्यास अतिशय समर्थ अशा राणी होत्या. म्हणूनच मोगलांना अनेक वेळा त्यांनी अडचणीत आणले.
ताराराणी यांनी मोगलांपासून स्वराज्याचे रक्षण केले.अवघ्या पंचवीस वर्षांच्या एका विधवा स्रीने औरंगजेबासारख्या सम्राटाला जेरीस आणले , ही आपल्या इतिहासातील एक असामान्य घटना, सर्व मराठी लोकांना अभिमानाची व स्फूर्तीदायक वाटायला हवी.ज्या महाराष्ट्राला संपवून सर्वत्र मोगलांचे राज्य करण्यासाठी औरंगजेब दक्षिणेत धावून आला होता.
औरंगजेब तब्बल २७ वर्षे महाराष्ट्रात राहिला,त्यास एकही निर्णायक विजय मराठ्यांनी मिळू दिला नाही.औरंगजेबाचा मृत्यू महाराष्ट्रातच अहमदनगर येथे इ.स.१७०७ मधे झाला.
ताराराणी अतिशय बुध्दिमान होत्या. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार याबाबतीत छत्रपती राजाराम महाराजांच्या हयातीतच त्यांचा फार मोठा लौकिक होता. ताराराणींनी आपले पुत्र शिवाजी (दुसरे) यांना गादीवर बसवून राज्याची सर्व सूत्रे हाती घेतली.
मराठे औरंगजेबाशी युद्ध खेळत होते, पण औरंगजेबाचे प्रचंड सामर्थ्य येथे अपुरे पडत होते. राजाराम महाराजांच्या मृत्यूने मराठ्यांची बाजू कमजोर झाली असे बादशहास वाटले पण ताराराणींनी धैर्याने व हुशारीने बाजू सावरली. एका विधवा तरुण राणीने औरंगजेबासारख्या मुरब्बी सम्राटाशी युद्ध खेळून अपराजित राहणे म्हणजे केवढे हे त्यांचे कर्तुत्व .
औरंगजेबाचे लष्करी व राजकीय सामर्थ्य प्रचंड होते. औरंगजेब बादशहासारखा लाखो फौज घेऊन आलेला शत्रु अशा मोठ्या साम्राज्याशी महाराष्ट्र टक्कर घेत होता. लष्करी युद्धव्यवस्था , पैसा इत्यादी बाबतीत मराठे मोगलांशी बरोबरी करु शकत नव्हते, तरीदेखील त्यांनी मुघलांचे जगणे नकोसे करून टाकले.
मुघल- मराठा संघर्षात मोगली नेतृत्वात कोणताही बदल झाला नाही. उलट मराठ्यांच्या नेतृत्वात तीन वेळा बदल झाला. संभाजीराजे, राजाराम महाराज व ताराबाई ह्या नेतृत्वाच्या तीन पिढ्या महाराष्ट्राने बघितल्या. ताराराणीसाहेब ह्या मराठ्यांच्या नाममात्र राज्यकर्त्या नव्हत्या तर मराठ्यांच्या राज्याची सर्व सूत्रे त्यांच्या हाती होती. याशिवाय लष्करी मोहिमांची आखणीही त्या करीत होत्या. त्यांचा राज्यकारभार, लष्करी, सैन्याच्या नेतृत्वाचे आणि मोहिमांचे व्यवस्थेचे गुण प्रकर्षाने प्रकट होत होते. त्यामुळे मराठ्यांचे आक्रमण आणि त्यांची धामधूम दिवसेंदिवस वाढतच गेली.
सरदारांच्या नेमणुका,त्यांच्या बदल्या,राज्याचा कारभार,बादशाही मुलुखांवरील हल्ले या सर्व गोष्टी तिच्या तंत्राने चालू लागल्या. ताराराणींनी आपल्या सैन्याची योजना अशी केली की सिरोंज,मंदसोर,माळवा या प्रांताच्या सरहद्दीपर्यंत धामधूम उडविली.
बादशहाने आपली अर्धी हयात मोहिमा करणे व किल्ले घेणे यात घालविली. Tararani ताराराणींशी तो शेवटपर्यंत लढला पण मराठ्यांचे बळ व बंड ही देवसेंदिवस वाढत गेले.
महाराष्ट्रातील जनतेला युद्धाबद्दल आत्मीयता नसती आणि त्यात भाग
घेतला नसता तर हे मराठ्यांचे राज्य यावनी झाले असते. मराठ्यांनी खूप मोठा लढा देउन स्वतःचे राज्य राखले.
तत्कालीन कवी कविंद्र यांनी लिहिले
” दिल्ली झाली दीनवानी |
दिल्लीशाचे झाले पाणी ||
ताराबाई रामराणी !
भद्रकाली कोपली !!
रामराणी भद्रकाली !
रण रंगी क्रुद्ध झाली !!
प्रलयाची वेळ आली !
मुघलहो सांभाळा !!
अशा या शूर व धाडसी राणीसाहेबांचे ता.१० डिसेंबर १७६१ रोजी सातारा येथे त्यांचे निधन झाले.

अशा थोर करवीर वासिनी महाराणी ताराराणी भोसले साहेब यांना मानाचा मुजरा !!

 

Also Visit : https://www.postboxlive.com

 

Postbox India

The post Tararani – करवीर वासिनी ताराराणी भोसले साहेब appeared first on Postbox India.
postboxindia
Postbox India - Anytime Everything