कांताबाई सातारकर 
कांताबाई सातारकर 
कांताबाई सातारकर 

लोककलेच्या साजातला खणाणता सुरमयी घुंगरू ओघळला.

कांताईला भावपूर्ण श्रध्दांजली

दगडफोड मजूराची मुलगी ते महाराष्ट्राची लावणी सम्राट.

मी पाहिलेल्या कांताबाई सातारकर    

27/5/2021,
अकलूजच्या कै.मा.शंकरराव मोहिते पाटील स्मृतीचषक पारंपारिक लावणी महोत्सव स्पर्धेसाठी मी जवळ जवळ १५ वर्षे परीक्षक म्हणून जात होते. या दरम्यान सुरुवातीच्या कालखंडात कांताबाई सातारकर यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते, त्या क्षणाची मी साक्षीदार होते. त्यादरम्यान यमुनाबाई वाईकर लक्ष्मीबाई कोल्हापूरकर ,गुलाबबाई संगमनेरकर विठाबाई नारायणगावकर अक्काताई कराडकर रोशन सातारकर ,अशा अनेक जेष्ठ कलावंताचे लावणी सादरीकरण मी परीक्षक म्हणून जवळून पाहिले होते. अकलूजच्या नियोजनबद्ध कार्यक्रमात कांताबाई सातारकरांचा कलाविष्कार पाहून अनेक रसिक श्रोत्यांबरोबर मीही त्यांच्या नृत्याच्या आणि आदाकारीच्या प्रेमात पडले होते.

मी पाहिलेल्या कांताबाई सातारकर 

आज सकाळी जेंव्हा कांताबाई सातारकर यांच्या मृत्यूची बातमी वाचली त्यावेळेस त्यांच्या आठवणीने मन गलबलून गेले,ते एकाच गोष्टीने की ,असे कलाकार आता होणे नाही. त्यांच्या स्मृतीसाठी दोन शब्द श्रद्धांजलीपर लिहावेसे वाटले . एका दगडफोडणार्या आई वडिलांच्या पोटी १९३९ मध्ये कांताबाई यांचा जन्म झाला .त्यांच्या कुटुंअं गुजरात मधून पुढे त्यांचे आई-वडील सातारा या मूळ गावी आले. कोणतेही नृत्य कलेचे शिक्षण त्यांना मिळाले नव्हते. तरीही त्यांनी आवड म्हणून कला जोपासली. तमाशात काम करताना कांताबाई सातारकर हे नाव रसिक प्रेक्षकांच्या कानावर पडायला सुरुवात झाली .पारंपारीक तमाशा कलेसाठी जीवन वेचणाऱ्या दर्जेदार कलावंताकडे कोणाचेच फारसे लक्ष जात नव्हते , त्यावेळी कांताबाईनी आपल्या कलेने रसिक कलावंतांना आपलेसे करून घेतले.

मी पाहिलेल्या कांताबाई सातारकर 

पारंपारिक व ओल्या मातीचा गंध असणाऱ्या लावण्या काळाबरोबर लोप पावू लागल्या होत्या ,त्यावेळी लावणीची परंपरा जपण्याचे कार्य कांताबाईनी आपल्या नृत्य अविष्कारातून रसिक प्रेक्षकांना घडवले. पारंपारिक लावणी कांताबाईनी आपल्या साजश्रुंगारासह पूर्वीपेक्षा अधिक जोमदारपणे रसिक प्रेक्षकां समोर सादर केली. तमाशात केवळ शृंगारिक लावण्याचाच समावेश असतो हा समज चुकीचा आहे. लावणी जीवनातील सर्व अंगांना तितक्याच उत्कटतेने चित्रित करण्याचा प्रयत्न करते .लावणीत येणारी आदर्शवादी, निवृत्तीपर विचारसरणी ,भक्ति महिमा, अद्वैत विचारसरणी, अध्यात्मिक कुटाची रचना ,संतांच्या वा इतर कवींच्या स्फुट लौकिक रचनेतून लावणी साकार होते. हे कांताबाई यांनी रसिक प्रेक्षकांना दाखऊन दिले.

मी पाहिलेल्या कांताबाई सातारकर 

कांताबाईच्या अति उत्कृष्ट अदाकारीने रसिक प्रेक्षक बेहोष होऊन जात. कांताबाईच्या नृत्यातील चपळता, सूर ,लय ,ताल यांचा संगम वाखाणण्याजोगा होता. कांताबाईनी पारंपारिक लावण्यांचे ताकतीने केलेल्या सादरीकरणामुळे रसिकांच्या मनावर अनेक वर्षे त्यांनी राज्य केले. लावणीत फक्त उत्तानश्रृंगार ग्राम्यता, व अश्लीलताच असते ,अशाच प्रकारची टीका व आरोप केले गेले.परंतु कांताबाईनी या सर्व प्रकाराला छेद देऊन अंधश्रद्धा निर्मूलन ,लोक शिक्षणातून जनजागृती क्रांतिसिंह नाना पाटील, ऐतिहासिक वगनाट्य व कोर्टाच्या दारी फुटला चुडा , माणूस का झाला सैतान, असे पुढारी आमचे वैरी ही ,सामाजिक वगनाट्य सादर केली. कोंढाण्यावर स्वारी या वगनाट्यात त्यांनी साकारलेली जिजामातेची भूमिका अनेक वर्षे रसिकांच्या स्मरणात घर करून राहिली. कांताबाई नृत्य, अभिनय ,गायन यामध्येही पारंगत होत्या.लोककलेची महाराणी म्हणून त्या रसिकांना परिचित होत्या.

मी पाहिलेल्या कांताबाई सातारकर 

खेडेकर यांच्या तमाशात काम करता-करता त्यांच्यातील कलाकार घडत गेला. खेडकर आणि कांताबाई या जोडीला अमाप लोकप्रियता मिळाली .पुढे खऱ्या आयुष्यातही ही जोडी एकत्र आली. अनेक धार्मिक, पौराणिक ,सामाजिक आशय असलेल्या वगनाट्यातुनही ही जोडी ग्रामीण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. मुंबईतले गिरणी कामगार तर या जोडीचा अभिनय बघण्यासाठी हनुमान थियटरला परत परत जावुन कार्यक्रम पहात. १९६४ मध्ये तमाशा सुरू असताना अचानक तुकाराम खेडकर यांची तब्येत बिघडली व खेडकर यांचे निधन झाले. त्यांना पतीच्या तमाशातून बाहेर पडावे लागले. तमाशाच्या बोर्डावर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपतीं संभाजी महाराज या पुरुषी भूमिका रंगवणाऱ्या कांताबाई या खऱ्या आयुष्यातही तशाच धाडसी होत्या. त्यांनी अवघ्या चार-पाच वर्षात जिद्दीने काही रक्कम जमा केली. त्यावेळी तमाशा क्षेत्रातील सर्व मंडळी तुकाराम खेडकर यांना मानणारी होती .

मी पाहिलेल्या कांताबाई सातारकर 

या सर्वांनी कांताबाईंना मदत केली. या मदतीमुळे कांताबाई सातारकर यांनी मास्टर रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळ सुरु केले. एक उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका, उत्तम दिग्दर्शिका ,उत्तम व्यवस्थापक अशा विविध भूमिका निभावताना कांताबाई तमाशा क्षेत्रात स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. कांताबाईची पारंपारिक लावणी, अति उत्कृष्ट काव्यरचना, विविध रागावरील संगीत आदाकारी , पारंपारिक शास्त्रीय नृत्य रसिक प्रेक्षकांच्या मनाला मोहिनी घालत असत. कांताबाईंच्या दिलखेचक नृत्यावर व आदाकारीवर रसिक बेहोश होत,तर त्यांच्या लावणी मुळे आर्जवाची व तगमगिची भावना रसिकांच्या काळजाचा ठाव घेत . कांताबाईंच्या पारंपारिक कलाप्रकाराला रसिक प्रेक्षक तितक्यात उत्स्फूर्तपणे दाद देत होते. नृत्यातील चपळता सूर, लय ,ताल यांचा संगम अभिनय कौशल्य व ताकदीने केलेले सादरीकरण यामुळे कांताबाई रसिक मनावर कित्येक वर्ष राज्य केले.

मी पाहिलेल्या कांताबाई सातारकर 

मराठी रंगभूमीवर पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिका केल्याची अनेक उदाहरणे आहेत, मात्र स्त्रीने पुरुषी भूमिका केल्याची उदाहरणे क्वचितच आढळतात. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका इतक्या हुबेहूब वटवल्या की पुरुष कलाकारांना त्या भूमिकांची नक्कल करावी वाटली. सुमारे दहा वर्ष तमाशा फड चालवल्यानंतर पुन्हा कांताबाई सातारकर यांना आर्थिक अडचणीना तोंड द्यावे लागले. तमाशा फड बंद पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण याही वेळी कांताबाई खचून गेल्या नाहीत. त्यांनी थेट तत्कालीन मुख्यमंत्री श्री.शरद पवार साहेब यांची भेट घेऊन त्यांना आपली अडचण सांगण्याचे ठरवले. सोबत दोन तीन कलाकार घेऊन त्या मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटून आपली अडचण सांगितली. आश्चर्य म्हणजे पवार साहेबांनी व्यक्तिगत पातळीवर कांताबाईं यांना पंधरा हजार रुपये मदत केली. संगमनेरचे तत्कालीन प्रांताधिकारी व पुढे सिक्कीमचे राज्यपाल झालेले श्रीनिवास पाटील साहेब यांनी एका राष्ट्रीयीकृत बँकेतून त्यांना कर्ज मिळवून द्यायला मदत केली.

 

गरीबीचे परिस्थितीचे अनेक चटके सोसूनही एखाद्या सम्राज्ञीचा रुबाबात जगलेल्या या तमाशासम्राज्ञीची फारच फरपट झाली. महाराष्ट्र सरकारने २००५ मध्ये त्यांना पहिला विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले .दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा प्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सादर करण्याचा बहुमान मिळाला होता.

अशा या लावणी सम्राज्ञीला विनम्र अभिवादन व भावपूर्ण आदरांजली 

लेखन 
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर

Your email address will not be published. Required fields are marked *

More Stories
www.postboxindia.com
छत्रपती राजाराम महाराज यांना जन्मदिनानिमीत्त विनम्र अभिवादन 
error: Content is protected !!