Kenya help for india & help Lesson for India.
Kenya help for india & help Lesson for India.
Kenya help for india & help Lesson for India.

केनियाच्या मदतीची गोष्ट.

विजय चोरमारे

दान किती आणि काय आहे यापेक्षा दानत्व देणाऱ्या व्यक्ती समूहाची त्यामागची भावना काय असते हे महत्वाचं. रावण दानशूर होता, कर्ण आणि त्याचे दानत्व याबद्दल आपण ऐकून आहोत, भारतीय संस्कृती सभ्यतेत दानत्व त्याचे महत्व असणाऱ्या अनेक कथा, बोध कथा आपल्या वाचनात असतील पण विजय चोरमारे यांनी भाषांतरीत केलेल्या या कथेवरून बघा काय बोध घेता येतो ते.

3/6/2021,

केनियाच्या मदतीची गोष्ट. 

केनियानं पाठवलेल्या बारा टन खाद्य सामुग्रीवरून अनेकजण टिंगल टवाळी करताहेत. सोशल मीडियावर केनियाला भिकारी, भिकमागे, दरिद्री वगैरे विशेषणे लावली जात आहेत.

एक छोटीशी घटना आहे.

तुम्ही अमेरिकेचं नाव ऐकलं असेल. मॅनहटन, वर्ल्ड ट्रेड सेंटर, ओसामा बिन लादेन वगैरे नावंही ऐकली असतील.

बहुतेक लोकांनी ऐकलं नसेल ते ‘इनोसाईन’ गावाचं नाव. हे गाव आहे केनिया आणि टांझानियाच्या बॉर्डरवर. इथल्या स्थानिक जमातीचं नाव आहे, मसाई!

अमेरिकेतल्या 9/11 च्या हल्ल्याची बातमी इथल्या लोकांच्या कानावर जायला कित्येक महिने लोटावे लागले होते.

या गावाशेजारच्या गावात राहणारी किमेली नाओमा नावाची मुलगी स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीत मेडिकलला होती. ती सुट्टीसाठी गावी आल्यावर तिनं या मसाई लोकांना 9/11 च्या घटनेचं आंखो देखा वर्णन सांगितलं.
तेव्हा दुःखावेगानं सगळे रडायला लागले.

एखादी इमारत इतकी उंच असू शकते, की ज्यावरून पडून जीव जाऊ शकतो ही गोष्ट झोपडीत राहणाऱ्या मसाई लोकांसाठी अविश्वसनीय होती. तरीही त्यांनी अमेरिकन लोकांचे दुःख समजून घेतलं आणि त्या मेडिकलच्या विद्यार्थिनीमार्फत केनियाची राजधानी नैरोबी येथील अमेरिकन दूतावासाचे उपमुख्य अधिकारी विल्यम ब्रांगिक
यांना एक पत्र पाठवलं. ते पत्र वाचून ब्रांगिक यांनी आधी विमानानं प्रवास केला, त्यानंतर अनेक मैल कच्च्या रस्त्याने खडतर प्रवास करून मसाई जमातीच्या इनोसाईन गावात पोहोचले.

ते तिथं पोहोचल्यावर मसाई लोक एकत्र जमले आणि एका रांगेत चौदा गाई घेऊन त्यांच्याजवळ गेले.
त्यांच्यातल्या ज्येष्ठ माणसानं गायी बांधलेली दोरी त्यांच्या हातात सोपवतानाच एका पाटीकडं त्यांचं लक्ष वेधलं. त्या पाटीवर काय लिहिलं होतं माहीत आहे ?
त्यावर लिहिलं होतं : या दुःखाच्या प्रसंगी अमेरिकेतील लोकांच्या मदतीसाठी आम्ही या गायी दान करीत आहोत.

त्यांच्या पत्रातल्या तशाच भावना वाचून अमेरिकेसारख्या शक्तिमान देशाचे राजदूत चौदा गायी घेण्यासाठी शेकडो मैल खडतर प्रवास करून तिथपर्यंत आले होते.

गाईंची वाहतूक करण्यातील तसेच अन्य काही कायदेशीर अडचणींमुळे गायी अमेरिकेला जाऊ शकल्या नाहीत. मात्र त्या गायी विकून एक मसाई अलंकार खरेदी करून 9/11 म्युझियममध्ये ठेवण्याची शिफारस करण्यात आली.

ही गोष्ट सामान्य अमेरिकन नागरिकांच्या कानावर गेली तेव्हा काय घडलं माहीत आहे ?
लोकांनी अलंकाराऐवजी गायी आणण्याची मागणी केली.
आम्हाला अलंकार नको गायी पाहिजेत, अशा ऑनलाईन याचिकांची मोहीम राबवली गेली.
प्रशासनाला ईमेल पाठवले.
नेत्यांकडे तशी मागणी केली.
लाखो अमेरिकन लोकांनी मसाई लोकांच्या अभूतपूर्व प्रेमाबद्दल त्यांना धन्यवाद दिले.

बारा टन खाद्य समुग्रीचा आनंदाने स्वीकार करा. ( टिंगल करायची असेल, दोष द्यायचा असेल तर, ज्या निष्क्रिय आणि बेजबाबदार माणसामुळं देशावर ही परिस्थिती ओढवली आहे त्याला दोष द्या.)
दान नव्हे, तर ते देणाऱ्याची त्यामागची भावना समजून घ्या.
धूळ नव्हे, तर ती आणून सेतू बांधण्यासाठी योगदान देणाऱ्या खारुटीची श्रद्धा बघा !

(फेसबुक आणि ट्विटरवर हिंदीतील ही पोस्ट गेले दोन दिवस प्रचंड व्हायरल झाली आहे. वेगवेगळ्या लोकांनी निरनिराळ्या लोकांचे संदर्भ दिलेत, त्यामुळं ती पोस्ट मूळ कुणाची आहे समजत नाही. परंतु ती एवढी थोर वाटली, की तिचं भाषांतर करण्याचा मोह आवरता आला नाही.)

 

 

– विजय चोरमारे

Your email address will not be published. Required fields are marked *

More Stories
कॉ.तारा रेड्डी यांचा आज स्मृतीदिन
error: Content is protected !!