Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

kumbh ka mela – कुंभमेळा साधुंचा कि संधी साधुंचा

1 Mins read

kumbh ka mela – कुंभमेळा साधुंचा कि संधी साधुंचा

 

kumbh ka mela – हरिद्वार येथे न भुतो न भविष्यती असा

एक धार्मिक उत्सव कुंभमेळयाच्या रूपाने भरलेला

 

डॉ. नितीन शिंदे

 

 

सध्या कोरोनाने भारतीय जनता प्रचंड प्रमाणात त्रस्त आहे.
रेमडेसिवीर, ऑक्सिजन, बेड या शब्दांची प्रसारमाध्यमांमध्ये प्रचंड रेलचेल सुरू आहे.
तरूणाई बेरोजगारीचे चटके सहन करत आहे, शेतकरी आपल्या प्रश्नासाठी आंदोलन करत आहेत, तर उद्योगधंदे आचके देत आहेत.
अशावेळी भारताच्या एका टोकाकडील राज्यांच्या निवडणूकांमध्ये राजकीय धुरिण आपली प्रतिष्ठा पणाला लावत भिंगरीसारखे सभा मागून सभा घेत आहेत.
तसेच दुसऱ्या टोकाला श्रध्देच्या बुरख्याखाली हरिद्वार येथे न भुतो न भविष्यती असा एक धार्मिक उत्सव kumbh ka mela कुंभमेळयाच्या रूपाने भरलेला आहे.
यानिमित्ताने गंगेच्या किनारी शाही (नग्न)स्नान करण्यासाठी आणि ते पाहण्यासाठी झालेली गर्दी आपणाला अभिमानस्पद वाटेल की विचार करायला लावेल! हे काळच ठरवेल.

कुंभमेळयाची kumbh ka mela अख्यायीका तर फारच मनोरंजक आहे.
फार फार वर्षापूर्वी देवांनी समुद्रमंथन सुरू केले.
समुद्रमंथनासाठी वासूकी नागाचा आणि मंथनदंड म्हणून पर्वताचा वापर करण्यात आला.
समुद्रमंथनासाठी, दानव(राक्षस) आपआपसातील मतभेद बाजूला ठेवून देवांंच्या मदतीला आले.
एका बाजूला देव तर दुसऱ्या बाजूला दानव समुद्रमंथनासाठी उभे होते.
बराच काळ मंथन झाल्यावर अमृत बाहेर आले.
दोघाच्या प्रयत्नातून अमृत मिळाले त्यामुळे ते दानवांनाही द्यावे लागणार हे लक्षात आल्यावर देवांनी एक युक्ती केली.
त्यांनी इंद्राचा पुत्र जयंत याला अमृतकुंभ घेऊन स्वर्गाच्या दिशेने पळून जायला सागितले.
जयंत अमृताचा कुंभ घेऊन पळतोय हे लक्षात आल्यानंतर दानव जयंताच्या पाठीमागे धावू लागले.
नंतर अमृत कुंभासाठी देव आणि दानवांच्यात घनघोर लढाई झाली. लढाईच्या काळात कुंभातून अमृताचे चार थेंब पृथ्वीवर पडले. प्रयाग, उज्जैन, हरिव्दार व त्र्यंबकेवर ही ती चार ठिकाणे.
हीच ती kumbh ka mela कुंभमेळयाची दर चार वर्षानी येणारी ठिकाणे. त्यांना तीर्थक्षेत्र असा सरकार मार्फत दर्जा देण्यात आला.
बरीच वर्षे देव आणि दानवांच्यात लढाई चालू होती.
कुंभ फुटू नये यासाठी सूर्याने व चंद्राने देखील देवांना मदत केली.
गुरू ग्रहानेही देवांच्या बाजूने लढत दानवाशीं संघर्ष केला.
बारा वर्षाच्या युद्धानंतर देवांचा विजय आणि दानवांचा पराभव झाला.
गुरू जेंव्हा कुंभ राशीत असतो तेव्हा हरिद्वारला, वृषभ राशीत असतो तेव्हा प्रयागला, सिंह राशीत असतो तेव्हा त्र्यंबकेवरला आणि वृश्चिक राशीत असतो तेव्हा उज्जैनला कुंभमेळा भरतो.
अशा प्रकारच्या अनेक मानवनिर्मित कथानकांनी कुभमेळयाचं महत्त्व अधोरेखीत केलेलं आहे किंबहूना मार्केटींग केलेल आहे.
लहान मुलांना जर हे कथानक ऐकवलं, तर निश्चितपणे त्यांना काही प्रश्न पडणारच.
समुद्र घुसळल्यानंतर मिठाऐवजी अमृत कसं तयार झालं?
देव सुद्धा चोरी करत होते का?
चोरी करून पळून जात होते का?
अमृताचे थेंब पृथ्वीवर पडताना त्याची वाफ का झाली नाही?
थेंब फक्त भारतातच कसे पडले?
देव दानवांचे युद पृथ्वीवर सुरू होते की अंतराळात?
देव दानवांच्या युद्धात नेहमी देवांचाच विजय का होतो?
आपल्यापासून 78 कोटी किलोमीटर अंतरावरील दगड धोंडयाचा असलेला गुरू ग्रह देवांच्या मदतीला कसा आला?
बारा वर्षानंतरच कुंभमेळा का भरतो?
पाप धुवून जावे म्हणून आंघोळ करण्यापेक्षा पापच करू नये हे मोठयांना कळत नाही का?
सध्या गुरू ग्रह कुंभ राशीत आल्यामुळे लाखो (संधी)साधूंनी हरिद्वार येथे (नग्न) शाहीस्नान करून नदीचे पाणी सरकारी खर्चाने अक्षरश: घाण केले.
नदीत स्नान करणारा केवळ स्नान करून थांबत नाही, तर अनेक टाकावू पदार्थ पाण्यात सोडून देत असतो.
आंघोळ केल्यानंतर हेच पाणी भक्तगणांनी तिर्थ म्हणून प्राशन केलेलं असणार किंवा कमंडलूमध्ये पवित्र पाणी म्हणून साठवून ठेवलेलं असणार यात वादच नाही.
स्नान करण्याचा आणि गुरूचा कुंभ राशीत प्रवेश याचा काही संंबंध?
विचारच करायचा नाही असे ठरवले तर धर्माच्या नावाखाली आपण काहीही करायला तयार असतो.
सदर शाही स्नानाचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण सुद्धा केले जाते.
आंघोळीला निघालेले नग्न साधू पाहण्यात सार्थकता मानणारे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार आपल्या मुलांच्यामध्ये कितपत रूजवतील याबद्दल शंका आहे.
संत तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ, गाडगे महाराज, कबीर यांनी कधीही शाही स्नान केल्याचा उल्लेख नाही.
किंबहुना उघडया अवस्थेत आणि जटाधारी रूपातील त्यांचा फोटो तमाम महाराष्ट्रातील घरांघरामंध्ये बिलकुल नाही.
संत तुकाराम, कबीर यांनी तर कुंभमेळयावर त्यांच्या अभंगातून ताशरे ओढलेले आहेत.
असं असताना आम्ही तथाकथीत सुशिक्षीत चिडीचुप असतो.
हे तटस्थपणाचं आणि बेरकीपणाचं लक्षण म्हणावं लागेल.
ही तटस्थपणाची भूमीका जर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज, या संत समाजसुधारकांनी घेतली असती, तर आपलं काय झालं असतं याचा क्षणभर विचार करून पहा.
अर्थात विचार करणार असू तरच!
संत आणि हल्लीचे साधु यांच्यामध्ये फरक करण्याची गरज आहे.
काही साधु गांजा ओढत बसलेले, काहीजण जटा वाढवून एका पायावर उभे, तर काहीजण खाली डोके वर पाय केलेल्या अवस्थेत असतात.
अशा अवस्थेत असलेल्या साधुंचा समाजाला काय उपयोग?
समाजाच्या कोणत्या प्रश्नावर त्यांनी अशा प्रकारचे आंदोलन केलेले असते?
याचे उत्तर नकारार्थीच आहे.
कुंभमेळयासाठी सरकारने हजारो कोटी रूपये खर्च केलेले आहेत.
तेच पैसे कोरोनाच्या संशोधनासाठी, बेरोजगारीसाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी खर्च केले तर समाजाचंच भल होईल ना!
पण असे होणे शक्य नाही.
इतर छोटे छोटे देश विज्ञानाची आणि आधुनिकतेची कास धरत, कोरोनावर मात करत, समाजाला पुढे घेऊन जात आहेत.
आम्ही मात्र संस्कृती आणि परंपरेच्या तकलादू आवरणाखाली समाजाला झापडबंद अवस्थेत ठेवत आहोत.
वास्तविक पाहता कोरोनामुळे विज्ञान आणि संशोधन याकडे ओढा निर्माण होणे क्रमप्राप्त होते पण यउलट दैववादाकडेच जास्त ओढा निर्माण होत आहे.
हे आधुनिक आणि स्वावलंबी भारतासाठी भूषणावह नक्कीच नाही.
सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणं गुन्हा ठरतो.
कुंभमेळयामध्ये मात्र धर्माच्या नावाखाली गांजा, अफु आदी मादक द्रव्यांचा व्यापार व वापर खुलेआम सुरू असतो.
मनावर ताबा मिळवण्यासाठी अथवा चिंतनासाठी आणि विश्वशांतीसाठी मौन व्रत धारण करणारे काही मौनी साधू या मेळयात सामिल झालेले आहेत.
मौनव्रत पाळून जर एखादा विद्वान झाला असता आणि समाजाचे प्रश्न सुटले असते, तर जंगली प्राण्यांचे आणि पाळीव प्राण्यांचे कोणतेच प्रश्न शिल्लक राहिले नसते.
कुंभमेळा म्हणजे महाभिक्षुकांची, व्यापाऱ्यांची, संधीसाधुंची, साधुचा वेष चढवुन फिरणाऱ्या चोर दरोडेखोरांची चंगळच चंगळ.
यात आपला स्वार्थ साधणारे राजकारणी आणि सेलीब्रीटी असतील तर नवल वाटू नये.
कुंभमेळा संपल्यानंतर हे शाहीस्नान करणारे साधु समाजासाठी काय करत असतात.
समाजाच्या उत्थानासाठी कोणती योजना राबवत असतात याचा वेध घेण्याची गरज आहे.
धार्मिक कर्मकांडासारख्या ठिकाणी राबवण्यात येणाऱ्या योजना पाहिल्या तर कष्ट करणाऱ्या शेतकरी, कष्टकरी, शेतमजूरांना या गरजासांठी का झगडावं लागत हेच समजत नाही.
मार्च 2020 मध्ये लॉकडाउन झाल्यानंतर स्वतःच्या गावी जाण्यासाठी कष्टकरी वर्गाने केलेली पायपीट आणि त्यात सांडलेलं त्यांच रक्त कुंभमेळयाच्या उत्सावामध्ये आपण विसरून गेलो असेल, तर ती एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.
कुंभमेळा 30 एप्रिल 21 पर्यंत सुरू राहणार आहे.
दि. 27 एप्रिल रोजी तिसरे शाही स्नान आहे. कोरोनामुळे कोणतीही काटछाट या मेळयासाठी करण्यात येणार नाही, असा निर्वाळा मुख्यमंत्री रावत यांनी दिलेला आहे.
मार्च 20 मध्ये कोरोनाला कारणीभूत ठरल्याचा ठपका दिल्ली येथील मरकजच्या नावे फोडणारे अंधभक्त आणि त्यांचे प्रसारमाध्यमातील आक्राळ विक्राळ रूपातील चेले सध्या गंगेत डुबक्या तर मारत नाहीत ना?
प्रायश्चित्त म्हणून!
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कुंभमेळयात तीन कोटी लोकांनी स्नान करून गर्दीचा आजवरचा उच्चांक केला अशा प्रकारची बातमी काही दिवसांनी आली तर भारतीयांचा उर अभिमानाने भरून येणार?

परदेशातील लोक kumbh ka mela कुंभमेळयाच्या संशोधनासाठी येतात असा हाकाटा पिटला जातो.
ते संशोधनासाठी येतात का? की आपण किती भंपक आहोत याचा वेध घेण्यासाठी येतात हे लक्षात घेण्याची गरज आहे.
जटाधारी व्यक्तींना चांगल्या हेतूने पाहायला येणाऱ्या परदेशी व्यक्तींच्या बुद्धीची किव करावीशी वाटते.
गुरू हा ग्रह आकाशामध्ये सांयकाळी तेजस्वी चांदणीच्या रूपात दिसतो.
साधु काय किंवा स्नान करणारे महाभाग काय यापैकी कोणीही गुरू निश्चितच पाहिलेला नाही.
गुरूला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी बारा वर्षे लागतात. ग्रीकांनी आकाशाचे बारा भाग केले व प्रत्येक भागामध्ये येणाऱ्या ताऱ्यांच्या समुहाला रास म्हणून संबोधले.
एकूण बारा राशी ग्रीकांनी केलेल्या आहेत.
बारा राशींतून एक फेरी पुर्ण करण्यासाठी गुरूला बारा वर्षे लागतात याचाच अर्थ गुरू दरवर्षी एका राशीमध्ये वास्तव्य करतो.
सध्या गुरू कुंभ राशीमध्ये आहे त्यामुळे हरिव्दार येथे कुंभमेळा भरलेला आहे.
नक्षत्र ही संकल्पना भारतीयांची तर रास ही संकल्पना ग्रीकांंची.
मग भारतीय संस्कृतीमधील एखादा सण अथवा उत्सव साजरा करण्यासाठी ग्रीकांच्या संकल्पनेचा वापर तथाकथीत संस्कृती रक्षकांना करावा लागतो हे अनाकलनीय वाटते.
गुरू ग्रह आपल्यापासून 78 कोटी किलोमिटर अंतरावर, तर कुंभ राशीतील तारे आहेत जवळपास 68 प्रकाशवर्षे दुर (68,00,00,00,00,00,000 किलोमीटर).
या अंतराची कल्पनाच न केलेली बरी.
गुरूचा आणि कुंभ राशीचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. त्याचा आंघोळीशी आणि पाप धुवून जाण्याशी तर बिलकूलच नाही.
परंतू धार्मिक रंग चढला की, कोण कशाचा उपयोग कशासाठी करतील याचा नेम नाही.
स्वत:च्या आर्थिक, सामाजिक, राजकीय फायद्यासाठी मानवनिर्मित कथा पिकवून आपली तुंबडी भरण्याचा हा बिनभांडवली उदयोग आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!