Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORYINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Maratha Empire – “वीर शिवा काशीद

1 Mins read

Maratha Empire – वीर शिवा काशीद

 

12 जुलै 1660 – Maratha Empire –  शिवा काशीद यांचा स्मृतिदिन

 

 

 

12/7/2021,

12 जुलै 1660 शिवा काशीद यांचा स्मृतिदिन

मराठ्यांच्या इतिहासातील एक तेजस्वी पान जौहरला गुंगारा देण्यासाठी शिवछत्रपतींचे हुबेहुब सोंग

घेऊन जौहरच्या छावणीत बिनधोक जाणारे व सोंग उघडकीस आल्यावर हसत हसत मरणाला

कवटाळणारे मर्द!साडे तीनशे वर्षांपेक्षा अधिक काळ लोटून गेला आहे ,शिवा काशीद यांच्या आत्मबलिदानाला .

तरीही जनमाणसांच्या मनात अजूनही एक प्रश्न रूंजी घालत आहे कोण होते हे शिवा काशीद ?

शिवा काशीद हे मूळचे पन्हाळ्याच्या पूर्वेस असलेल्या नेबापूर या गावचे रहिवासी.

जन्म पन्हाळ गडाच्या पायथ्याशी असणार्या नेबापूर या गावातील नाभिक कुटुंबात झाला.

दुसर्याच्या अंत:करणातील गुपित बाहेर काढण्यात अत्यंत चलाख व निष्णात अशी ही जात असल्यामुळे

शिवरायांनी यांस आपल्या पदरी ठेवून घेतले होते.शिवा काशीद बराचसे शिवरायांसारखे दिसत होते .

मजबूत बांधा ,सरळ नाक, तेजस्वी नजर, शत्रूच्या गोटातून माहिती काढण्यात ते अत्यंत पटाईत होते .

दिनांक 2 मार्च 1660 रोजी आदिलशहाने अफजलखानाच्या वधानंतर सिद्दीजोहरला विजापूरहून

स्वराज्यावर आक्रमणास धाडले तर, दुसरीकडे मुघल सैन्य औरंगजेब बादशहाचा मामा शाहिस्तेखान

याच्या नेतृत्वाखाली पुण्यातील लाल महालात तळ ठोकून होते. स्वराज्यावर दुहेरी संकट आले होते.

त्यावेळी शिवराय पन्हाळा किल्ल्यावर होते. 35 हजार पायदळ ,वीस हजार घोडदळ अशा प्रचंड

सैन्यानिशी जौहरने पन्हाळगडाला वेढा दिला.महाराज गडावर अडकून पडले होते. पावसाळ्याचे दिवस होते.

पन्हाळा किल्ल्यावर जास्त दिवस थांबणे महाराजांसाठी धोक्याचे होते. वेढ्यातून बाहेर पडण्याची

छत्रपती शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली. हा वेढा फोडून विशाळगडाकडे जाण्याचे ठरवले .

विशाळगडाकडे कूच करणार त्या दिवशी शिवा काशिद यांना शिवरायांचा पोशाख चढविला.

शिवा काशीद हे हुबेहुब शिवरायांसारखे दिसू लागले. खरे शिवराय कोण हेच कळणे थोडे अवघड झाले.

दिनांक .12 जुलै 1660 रोजी पौर्णिमेची रात्र, रात्री दहाचा सुमार होता .छत्रपती शिवराय पन्हाळगडावरून निघाले. पालखीत बसले. पालखी मावळ्यांनी उचलली. फुलाजीप्रभू आणि बाजीप्रभू देशपांडे सोबत 600 निवडक मावळेही निघाले, आणि सोबत आणखी एका पालखीत शिवाकाशीद निघाले.
पाऊस ,वादळ ,विजा अखंड चालूच होत्या. पालखी जरा आडवाटेने गडाखाली उतरत होती. रस्ता दाखवायला पुढे हेर चालत होते. छत्रपती शिवाजीमहाराज उद्याच शरण येणार आहेत !मग कशाला या वादळी पावसापाण्यात मोर्चावर ऊभे राहा ? करा उबदार आराम ! अगदी असाच गाफील विचार करून शाही मोर्चे वाले ढिले पडले होते .झाडाझुडपातून आणि खाचखळग्यातून महाराजांची पालखी विशाळगडाच्या दिशेने धावत होती .पाऊस पडत होता, आभाळ गडगड होते , विजा लखलखत होत्या, पालखी धावतच होती. नजरा धास्तीने भिरभिरत होत्या. पालखी बेमालूमपणे वेढा भेदून गेली .वेढ्या पासून पालखी पुष्कळच दूर गेली. एवढ्यात घात झाला! जौहरच्या हेरांनी पालखी ओळखली. आता? ठरल्याप्रमाणे हेरलेली पालखी घेऊन 15 -20 लोक मुख्य रस्त्याने धावू लागले आणि महाराजांची पालखी आडमार्गाने तोपर्यंत विशाळगडाकडे मार्गस्थ झाली. शत्रुचा पाठलाग अटळ होता .अन् खरोखरच जौहरची फौज सिद्दी मसाऊदच्या बरोबर पाठलागावर निघाली .थोड्याच वेळात त्यांनी पालखीला गराडा घातला.त्यांनी मावळ्यांना विचारले,आत कोण आहे? उत्तर मिळाले की पालखीत छत्रपती शिवाजी राजे आहेत.पालखी सकट महाराज कैद झाले अन् सिद्दीच्या छावणीत दाखल झाले .सिध्दी समोर सर्वांना उभे केले, पण जाणकारांनी ओळखले! काहीतरी गडबड आहे. चौकशी झाली आणि कळले की हे तर शिवा न्हावी आहेत. सिद्धीने त्यांना विचारले की त्यास मरणाचे भय वाटत नाही का? उत्तर आले . छत्रपती शिवाजीराजें साठी हजार वेळा मरावयास तयार आहे. छत्रपती शिवाजीराजे कोणासही सापडणार नाहीत. हे ऐकून रागाने सिद्दीने शिवा काशीद यांचे शीर कलम करण्याचा आदेश फर्मावला.
शिवा काशीद यांचे धाडस प्राणांची आहुती आपण कदापि विसरू शकणार नाही.माणसाच्या आयुष्यात अखेरचे मोल असते, ते त्याच्या स्वतःच्या प्राणांचे ,पण आपल्या राजाच्या जिवीतापुढे आपले प्राण कवडीमोल समजून त्या प्राणांची आपल्या राजावर उधळण करणारा शिवा काशीद खरोखरीच धन्य होता.स्वराज्यासाठी( maratha empire ) स्वतःच्या प्राणांचे बलिदान देऊन शिवा काशीदने ज्या प्रखर राष्ट्रनिष्ठेचा व स्वामीनिष्ठेचा आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे. त्याला हिंदुस्तानाच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातही तोड नाही. कारण शिवा काशिद यांसारख्या मावळ्यांच्या बलिदानामुळे स्वराज्याचे देखणे स्वप्न शिवराय साकार करु शकले.स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या वीर शिवा काशीद यांच्या कुटुंबियांना महाराजांनी भेट देऊन पत्नी पारूबाई व पुत्र यशवंत यांचे सांत्वन केले .नेबापूर येथे पन्हाळगडाला लागूनच शिवा काशीदांचे स्मारक ऊभारून त्यांचे स्मरण इतिहासात जागते ठेवले. आहे .”
अशा या वीर शिवा काशीद यांना तमाम मराठी जनांचा मानाचा मुजरा”
जय जिजाऊ जय शिवराय

लेखन
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर
( इतिहास अभ्यासक  )

संदर्भ:
डाॅ. सचिन पोवार
शिवछत्रपतींचे शिलेदार

Leave a Reply

error: Content is protected !!