देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची नव्हे,

रेबीजची लस टोचा !

 

 

महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे थैमान सुरू आहे. कोरोनाचा सामना करताना सर्व यंत्रणा अपु-या पडत आहेत. सरकार गत वर्षीच्या अनुभवातून काही शिकले असे वाटत नाही. सरकारवाले भोंगळे राहिल्याचा प्रत्यय येतो आहे. गतवर्षी फटका बसूनही कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकारने विशेष तयारी केली नसल्याचे जाणवते. खरेतर हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. सरकारी रुग्णालये सुसज्ज केलेली नाहीत. तिथे पुरेशी यंत्रणा उभारलेली नाही. योग्य सुविधा दिलेल्या नाहीत.

पण या ही स्थितीत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे प्रामाणिकपणे आहे त्या स्थितीचा सामना करताना दिसत आहेत. सरकारची ही अवस्था तर राज्यातला विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेता इतिहासात नव्हता इतका रोगट आणि कुजकटवृत्तीचा निघाला आहे. सत्ता गेल्यापासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिसाळले आहेत. जबाबदार विरोधकांसारखे त्यांचे वागणे अजिबात नाही. त्यांचा सरकारसोबत समन्वय नाही, सुसंवाद नाही. ते केवळ सुडबुध्दीचे राजकारण करण्यात व्यस्त आहेत. त्यांच्या वागण्या-बोलण्यात अहंकार, सुड आणि बदल्याची भावना जास्त दिसते आहे.

“सरकार कधी पाडतोय आणि मी कधी मुख्यमंत्री होतोय ?” अशी मानसिकता फडणवीसांची आहे. चमच्यांची टोळधाड सोबत घेवून ते सतत सरकार पाडण्याची कट-कारस्थाने आणि स्वप्ने रचत असल्याचे दिसते आहे. असले विकृत राजकारण करण्याची ही वेळ नाही. सत्ता गेल्याचा झटका त्यांच्या मेंदूला इजा देणारा ठरला आहे. त्यांना मानसोपचार तद्नाची गरज आहेच पण त्याहीपेक्षा त्यांना रेबीजची लस देण्याची अधिक गरज आहे. राज्यात सध्या कोरोनाचे लसीकरण सुरू आहे. देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची नव्हे तर प्राधान्याने रेबीजची लस दिली तर त्यांचेच भावी जीवन सुखी होईल असे वाटते आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांच्यावर दया करावी. सत्तेसाठी पिसाळलेल्या फडणवीसांना लवकरात लवकर रेबीजची लस टोचावी.

देवेंद्र फडणवीस २०१४ पुर्वी विरोधी पक्षनेते असताना अत्यंत ताकदीने व पोटतिडकीने काम करत होते. विधानसभेत लोकांचे प्रश्न घेवून गर्जत होते. अत्यंत प्रभावीपणे विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होते. जनतेच्या प्रश्नावर विधीमंडळाचे सभागृह दणाणून सोडत होते. सामान्य लोकांचा आवाज बुलंद करत होते. राज्यातील जनतेला या स्वच्छ चारित्र्याच्या व अभ्यासू व्यक्तीमत्वाकडून खुप अपेक्षा होत्या पण गडी सत्तेत आला आणि वाया गेला. मोदी लाटेवर स्वार होत ते मुख्यमंत्री झाले पण आपल्याच जीवावर राज्यात सत्ता आली या भ्रमात या माणसाचा अहंकार आभाळाला भिडत गेला.

सगळ्यात आधी फडणवीसांनी स्वपक्षातले सगळे स्पर्धक अडचणीत आणले. एक एक करत भाजपासाठी आयुष्य वेचणा-या अनेक नेत्यांना तांदळातल्या खड्यासारखे बाजूला फेकले. एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह पक्षाच्या मुख्य प्रवाहातली माणसं बाजूला फेकली. पक्षातच त्यांची उपेक्षा सुरू केली. संघाच्या आणि मोदी-शहाच्या आशिर्वादाने वेडावलेल्या फडणवीसांनी विरोधात असताना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भ्रष्ट नेत्यांच्याविरूध्द मोठ्या ताकदीने आवाज उठवला होता.

सत्ता येताच या बहाद्दराने तेच भ्रष्ट लोक सत्तेची भिती घालून भाजपात घेतले. कॉंग्रेस-राष्ट्रवादीतले अनेक चोर नेते तुरूंगात टाकणार असल्याची वल्गणा करणा-या या माणसाने त्या सर्वांना भाजपात घेतले. त्यांना भाजप प्रवेशाचे गोमुत्र पाजून पवित्र केले. आयारामांंच्या गळ्यात लाचारीचा पट्टा बांधून त्यांचे नेतेपद स्वत:कडे घेतले. मुळ भाजपात फडणवीसांच्या मागे जास्त ताकद नव्हती. पक्षात अनेकजण त्यांचे स्पर्धक होते. फडणवीसांनी त्या सर्वांचे काटे काढत आयारामांचा गोतावळा तयार केला. पक्षासाठी राबणारे निष्ठावंत नेते फाट्यावर मारत त्यांना बदनाम केले. त्यांना अडचणीत आणत आयारामांना सत्तेची संधी दिली. आयारामांचा नेता म्हणून स्वत:चाच राज्याभिषेक करून घेतला. ज्या अजित पवारांना हे महाशय तुरूंगात टाकणार होते पण त्यांच्याशीच पहाटे पहाटे शपथविधी केला.

सिंचन घोटाळ्यावर बुड फाटेपर्यंत आपटणारे फडणवीस भ्रष्टाचाराच्याविरूध्द निव्वळ पोपटपंची करतात हे त्यामुळे लक्षात आले. “मी पुन्हा येईन !” अशी वल्गणा करणारे देवेंद्र फडणवीस त्यांच्या अहंकाराने आणि सत्तेच्या मस्तीने अडचणीत आले. सामान्य लोकांच्या मनातून ते उतरू लागले आहेत. फडणवीसांच्या अहंकाराला वैतागलेल्या इतर पक्षांनी मोळी बांधत त्यांना सत्ताच्युत केले आणि तिथून फडणविसांचा जळफळाट सुरू झाला.

तेव्हापासून फडणवीसांच्या तोंडावरचे हसू मावळले आहे. गेली वर्ष ते दिड वर्ष फडणवीस निखळपणे एकदाही हसतानाही दिसत नाहीत. पराकोटीचा आकांडतांडव, प्रचंड आरडाओरडा, सतत “मी मी” करत विरोधकांना संपवण्याची भाषा बोलत आहेत. त्या साठी नवनवीन कारस्थाने करण्यात फडणवीस गर्क झाले आहेत. एखाद्याची प्राणप्रिय सखी दुस-याबरोबर पळून गेल्यावर त्याला जसा मानसिक धक्का बसतो तसाच धक्का फडणवीसांना बसला की काय ? असा प्रश्न या निमित्ताने पडल्याशिवाय रहात नाही.

देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते झाल्यापासून विधीमंडळात किंवा विधीमंडळाबाहेर ज्या पध्दतीने बोलत आहेत ते पाहता ते राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत की मुठभर भांडवलदारांचे दलाल आहेत ? असा प्रश्न पडतो. मागच्या काही अधिवेशनात व इतरवेळी ते सामान्य लोकांसाठी नव्हे तर हायफ्रोफाईल लोकांसाठीच भांडताना दिसत आहेत. सुशांतसिंग रजपूत प्रकरण, कंगना राणावत, मनसुख हिरे व आता रेमडीसिव्हीर कंपनीच्या चोरांसाठी फडणवीस दलाली करत आहेत.

विलेपार्लेच्या पोलिस ठाण्यात फडणवीस मध्यरात्री धावून गेले होते. राज्याचा विरोधी पक्षनेता एखाद्या पोलिस ठाण्यात जातो आणि तिथे कुणासाठी दादागिरी करतो, कर्तव्य बजावणा-या पोलिसांना दमबाजी करतो हे बरे नाही. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांना घेवून फडणवीस पोलिस ठाण्यात पोहोचले होते. तिथे जावून औषधाचा काळाबाजार करणा-या कंपनीची वकिली करत होते. फडणवीसांनी गत वर्षा दिड वर्षात जनतेचे प्रश्न खुप कमी मांडले आहेत. २०१४ पुर्वी विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीसांनी जे मिळवले होते ते आता गमावले आहे. त्यांची निखळ प्रतिमा राहिलेली नाही. भ्रष्टाचाराच्या विरूध्द भांडणारा, भ्रष्टाचाराची चिड असणारा नेता अशीच त्यांची प्रतिमा होती पण ती खोटी होती हे आत्ता लक्षात आले. शेवटी सोंग ते सोंग असते.

सोंगातला वाघ आणि खरोखरचा वाघ यात फरक असतोच. देवेंद्र फडणवीस आयटीसेलवाली पिलावळ आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीतले आयाराम घेवून राज्यात राडा करत आहेत. केवळ धिंगाणा घालण्यापलिकडे काही करत नाहीत. सचिन वाझे प्रकरणात त्यांनी जसे थैमान घातले तसे थैमान यापुर्वी दाभोळकर, पानसरे यांच्या हत्या झाल्यावर का घातले नाही ? त्यांच्यासाठी का त्यांनी राडा केला नाही ? ते मुख्यममत्री असताना मंत्रालयात आत्महत्या करणा-या शेतक-यासाठी का त्यांनी आकांडतांडव केले नाही ? देवेंद्र फडणवीसांनी रडीचा डाव मांडला आहे. राज्य अडचणीत असताना हलकट राजकारणाचे खेळ त्यांनी चालवले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेत “नवा अनाजीपंत” अशी देवेंद्र फडणवीसांची ओळख निर्माण होवू लागली आहे. संभाजी राजांच्या राज्यकारभारात कट कारस्थाने करून मिठाचे खडे टाकणारा अनाजीपंत आणि सध्याची सत्ता उलथवून टाकण्यासाठी नाना प्रकारची कारस्थाने करणारे फडणवीस लोकांना अनाजीपंतासारखे वाटत आहेत.

फडणवीसांनी शांतपणे लोकांचे प्रश्न मांडावेत. उगीचच थयथयाट न घालता लोकांच्या प्रश्नावर काम करावे. आघाडी सरकारला लोकांचा कौल नव्हता पण ते स्थापन झाल्यावर राज्यातली जनता सुखावली होती. उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर लोकांना समाधान वाटले. देवेंद्र फडणवीसांनी सरकार पाडण्याची कट-कारस्थाने बंद करावीत.

लोक शहाणे आहेत. फडणवीसांनी चांगले काम केले तर येणा-या निवडणूकीत एकट्या भाजपाला पुर्ण बहूमत देतील. आता भाजपाचे १०५ आमदार आहेत. फडणवीसांच्या कामाची पोहोचपावती म्हणून लोक येणा-या निवडणूकीत त्यांचे दोनशे आमदार निवडूण देतील. आपण जनतेचे प्रतिनिधी आहोत मुठभर भांडवलदारांचे दलाल नाही आहोत याचे भान ठेवून त्यांनी काम करावे. विधीमंडळात जनतेचे प्रश्न मांडावेत. त्यासाठी सरकारशी भांडूण ते सोडवावेत. जनता शहाणी आहे ती निवडणूकीत योग्य कौल देईल पण तोवर फडणवीसांनी धीर धरावा. संयमाने, विवेकाने काम करावे, आपत्तीवेळी सुडभावनेचे राजकारण न करता महाराष्ट्र म्हणून एकत्र यावे हिच लोकांची इच्छा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here