Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRA

Bombay book depot – आठवणी आन्नूंच्या आणि बॉम्बे बुक डेपोच्या

1 Mins read

Bombay book depot – आठवणी आन्नूंच्या आणि बॉम्बे बुक डेपोच्या

 

Bombay book depot – पांडुरंग कुमठा, २५ मे १९२१ – २८ मार्च २०१९

 

 

26/5/2021,

 

आज आन्नू (पांडुरंग कुमठा, २५ मे १९२१ – २८ मार्च २०१९) असते तर शंभर वर्षांचे असते.

ते ९८ वर्षांचे होईपर्यंत त्यांची प्रसन्न साथ आम्हाला लाभली.

ते एक यशस्वी पुस्तक-विक्रेते म्हणून पुस्तक-जगतात प्रसिद्ध होते. त्यांचा ‘बॉम्बे बुक डेपो’, मराठी पुस्तकांचे माहेरघर म्हणून ओळखला जायचा.

एखादे मराठी ललित वाङ्मयाचे पुस्तक जर बॉम्बे बुक डेपोत मिळाले नाही तर ते कुठेच मिळणार नाही असे म्हटले जायचे.

नंतर बॉम्बे बुक डेपो बंद झाल्यावरही ते असेपर्यंत, सहज न मिळणाऱ्या पुस्तकाच्या शोधातील अनेकजण त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचत.

 

बेळगांवजवळच्या बेलहाँगल या गावी जन्मलेल्या आन्नूंनी इंग्रजी (व कन्नड) मध्ये एम.ए. केले.

जोसेफ कॉनरॅड या लेखकावर पी. एच. डी. करायची हे त्यांचे स्वप्न होते.

पण अनपेक्षितपणे मुंबईला आल्यावर फारसे मराठी येत नसलेला हा कारवारी माणूस मराठी पुस्तकांचा व्यवसाय करू लागला –

तेही आजूबाजूला क्रमिक पुस्तकांची दुकाने भरभराटीला आलेली असताना

त्यांनी ललित पुस्तके विकण्यावर भर दिला.

बॉम्बे बुक डेपो ची शो विंडो. कुमठा डावीकडून दुसरे.

बॉम्बे बुक डेपो ची शो विंडो. कुमठा डावीकडून दुसरे.

त्यांनी चव्वेचाळीस वर्षे मराठी ललित वाङ्मयाचा व्यवसाय सचोटीने आणि नवनवीन, कल्पक, धाडसी व लोकाभिमुख उपक्रम सर्वप्रथम राबवून प्रकाशक, इतर ग्रंथविक्रेते, लेखक व रसिक वाचक यांच्या मनात स्थान मिळवले.

मराठी ललित पुस्तकांचे एवढे प्रचंड मोठे दुकान त्यावेळी दुसरे नसेल.

(आम्ही मुले तर अक्षरशः हुंदडायचो दुकानात!) दीडेक हजार चौरस फुटांची जागा, त्यावर माळा.  सगळीकडे गच्च पुस्तकं भरलेली उघडी कपाटं (शेल्फ). बाहेर त्याची भली मोठी शो विंडो.

बाल साहित्य जत्रा चालू असताना शो विंडो.

बाल साहित्य जत्रा चालू असताना शो विंडो.

 

त्या काळात पुस्तकप्रेमी ग्राहकांना सदैव पुस्तकांचा ओपन अँक्सेस (जो इतर कुठल्याच पुस्तक दुकानात नव्हता),

दुकानाच्या बाहेर माणूसभर उंचीची मोठाली शो विंडो.

त्यात खास इंटिरियर डेकोरेटरकडून करून घेतलेली पुस्तकांची सजावट, नवरात्रीत ‘पुस्तक पंढरी’ लेखक-स्वाक्षरी सप्ताह (ज्यात लेखकांना भेटून पुस्तकांवर त्यांची स्वाक्षरी घ्यायला झुंबड उडायची!),

‘बाल साहित्य जत्रा’ (जी ते पुढे गावोगाव भरवायचे), धार्मिक पुस्तकांची ‘ग्रंथ दिंडी’, दरमहा व दर वर्षी प्रकाशित झालेल्या पुस्तकांची सूची,

‘बाल साहित्य जत्रा’ मासिक, नव्या पुस्तकांची माहिती देणारे ‘पुस्तक पंढरी’ मासिक, ‘बॉम्बे बुक क्लब’ (दरमहा १० रुपये भरा आणि वर्ष अखेरीस १६० रुपयांची पुस्तके अधिक भेट पुस्तके मिळवा),

असे अनेक नवनवीन उपक्रम त्यांनी सर्वप्रथम सुरू केले आणि सातत्याने राबवले – ज्या काळी इव्हेंट मँनेजमेंट हा शब्दसुद्धा प्रचलित नव्हता अशा काळात!

त्यांचे अभिनव उपक्रम पाहून बरेच पुस्तक विक्रेते व प्रकाशक Bombay book depot तेच उपक्रम करायला लागले – काही वेगवेगळ्या नावांनी,

तर काही त्याच. उदा. इतर काहींनी बुक क्लब सुरू केले.  आन्नूंनी शंभरेक बाल साहित्य जत्रा भरवल्यावर इतरांनीही त्याचे अनुकरण सुरू केले व बाल साहित्य जत्रा हे तर नंतर सर्वसाधारण – जेनेरिक – नाम झाले.

मराठी ग्रंथप्रसाराला आन्नूंनी अक्षरशः स्वतःला वाहून घेऊन असाधारण योगदान दिले आहे.

 

एक गम्मत: ठणठणपाळ म्हणजे जयवंत दळवी हे गुपित एका पुस्तक पंढरी स्वाक्षरी सप्ताहात फुटले!

अशा अनेक गमतीजमती त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिल्या आहेत. आन्नूंच्या अत्यंत मितभाषी, शांत, नम्र, अजातशत्रू , गोड स्वभावाने त्यांनी अगणित माणसे (ग्राहक, प्रकाशक, लेखक, इ.) जोडली – पुस्तक विक्री हा त्यांच्यासाठी धंदा नव्हे, तर व्रत होते.

सचोटीनेही व्यवसाय उत्तम करता येतो हे त्यांनी दाखवून दिले. पॉप्युलर हे घरचे प्रकाशन असले तरी त्यांनी दुसऱ्या प्रकाशकांना कधी दुजाभाव दाखवला नाही.

महाराष्ट्रभरातील प्रकाशकांचे ते आवडते होते.

कुठल्याही प्रकाशकाने पुस्तके आणली तरी त्यांनी कधी नाही म्हटले नसेल व कुठलाही प्रकाशक आला तर त्याला आधीच्या पुस्तकांचे काहीतरी पैसे दिल्याशिवाय त्यांनी परत पाठवले नसेल.

कित्येक लेखकही त्यांना हवी ती पुस्तके चाळायला, घ्यायला दुकानात येत असत. 

 

दिवसभर कामाचा भलताच उरक. माझी आई गमतीने बॉम्बे बुक डेपो माझी सवत आहे असे म्हणायची म्हणे!

दुपारी व रात्री जेवायला घरी यायचे तेवढेच काय ते आमच्या वाट्याला यायचे. पण तरी त्यांनी कसलाही उपदेश न करता त्यांच्या नुसत्या वावरातूनच आम्हा मुलांची व्यक्तिमत्वे घडवली.

दुपारी वा रात्री ते कधीही अचानक कुठल्याही परगावातील वा स्थानिक प्रकाशक वा लेखक वा ग्राहक मित्राला जेवायला / रहायला घेऊन येऊ शकत. घरी राहायला आलेल्यांशी घरोब्याचे नाते जोडले जायचे.

आम्हा मुलांसाठी घरात आलेल्यांशी घरोबा म्हणजे आम्ही मुले त्यांच्या अंगाखांद्यावर खेळायचो, काहींच्या तपकिरीने शिंकून हसायचो, इ. धम्माल करायचो!

आमच्या घरात कोणीही कधीही यावे, तो आमच्या आनंदाचा भाग आहे, ही परंपराच रुजली. नंतर मग माझ्या आईच्या असंख्य मैत्रिणी,

मग तिसरी बहीण, मग मी, माझी पत्नी व शेवटी माझा मुलगा अशा आम्हा सर्वांची मित्रमंडळी – अशी घरात माणसांची सतत ये-जा असण्याची परंपरा कायम चालू आहे, जिने माझ्या मुलालाही घडवले आहे.

आन्नूंनी काही पुस्तके प्रकाशितही केली. पुस्तक विक्रेते-प्रकाशक संघटनेतही काम केले.

एक गमतीची गोष्ट सांगायची म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीचा ‘पाहण्याचा कार्यक्रम’ही तिच्या नकळत क्राँस मैदानात ‘बॉम्बे बुक फ़ेअर’ मध्ये झाला!

त्यानंतर उरलेल्या आम्ही तिघांनीही प्रेमविवाह केल्यामुळे पाहण्याचा कार्यक्रम नव्हताच. आमचे प्रेमविवाह देखील आन्नूंनी सहज मान्य केले.

एके दिवशी एका तरुणाने – त्यांच्या दुसऱ्या मुलीच्या एका हरयाणवी मित्राने अचानक येऊन त्यांच्या मुलीचा हात मागितला आणि त्यांनी सहज लगेच त्यांच्याकडून होकार देऊन टाकला.

त्यानंतर तिसरीने व चौथ्याने (मी) स्वतःच्या मनाप्रमाणे लग्न करणे हे तर अपेक्षितच होते.… “मुलाला दुकानाच्या काउंटरवर बसायची ट्रैनिंग लहानपणापासूनच सुरु करा” असे त्यांना त्यांचे व्यवसाय मित्र सांगत.

पण मी आयुष्यात काय शिकावे, काय करावे, यासाठी त्यांनी कधीच माझ्यावर दबाव आणणे तर सोडाच, काही ठासून सुचवले देखील नाही.

मी व्यावसायिक अभ्यासक्रम न निवडता गणित शिकलो, त्यांच्या व्यवसायात शिरलो नाही, पुढे जाउन कॉर्पोरेट नोकरी सोडून प्राध्यापकाची नोकरी धरली – तीही सामाजिक कार्यकर्ता बनण्यासाठी वेळ मिळावा म्हणून,

हे सर्व त्यांनी सहज स्वीकारले. त्यांचा हा दुसऱ्यांना सहज स्वीकारण्याचा स्वभाव शेवटपर्यंत टिकून होता.

 

बॉम्बे बुक डेपो मधील पुस्तक प्रदर्शन. सर्वात उजवीकडे कुमठा.

बॉम्बे बुक डेपो मधील पुस्तक प्रदर्शन. सर्वात उजवीकडे कुमठा.

त्यांना त्यांच्या प्रदीर्घ व्यावसायिक आयुष्यात खूप यश मिळाले. सत्कार, पुरस्कार, मान-सन्मान मिळाले, पण त्यांचा उल्लेख करायचा त्यांचा स्वभावच नव्हता.

त्यामुळे आमच्या कुटुंबातही कोणीही त्यांचा सहसा उल्लेख करत नाही. त्यांच्यासाठी आणि आम्हा सर्वांसाठी माणसाची खरी शिदोरी ही माणसाचा स्वभाव व त्याने/तिने जोडलेली माणसे!

कुमठा कुटुंबातील हसतमुखपणा व भटकळ कुटुंबातील सामाजिक बांधिलकी – दोन्हीही गुण आन्नूंत होते.

आन्नूंची प्रसन्नता, साधेपणा, नम्रता, आत्मावलंबन, कोणालाही मदत करण्यासाठी धाऊन जाण्याची वृत्ती, दिलखुलासपणा, क्षमाशीलता, समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकून घेण्याची आवड, थोडे पण नेमके बोलणे,

अशा अनेक गुणांमुळे ते सर्वांना हवेहवेसे वाटत. आम्हा मुलांवर त्यांच्या नुसत्या अस्तित्वानेच प्रभाव पडला आहे.… पण त्यांची सर आम्हाला कशी येणार? !

जयवंत दळवी, श. ना. नवरे, सदानंद भटकळ, रामदास भटकळ आदी सोबत कुमठा.

जयवंत दळवी, श. ना. नवरे, सदानंद भटकळ, रामदास भटकळ आदी सोबत कुमठा.

मुंबईला आन्नू दररोज दोनदा फिरायला जात. पुण्याला गेलो आणि कुठल्याही बागेत फिरायला गेलो

तरी त्यांचा चाहता/चाहती (अगदी ग्राहक देखील) भेटायचे. उतारवयातही ते आमच्यापेक्षा जलद चालत.

घरात देखील दार वाजले की चालत दार उघडले तर पाहुण्यांचा अपमान होतो – ते पळत जाउनच उघडायचे अशी त्यांची श्रद्धा!

अशा आन्नूंना एकदा एकाने अतिशय प्रेमाने माथेरान वा कुठल्यातरी हिल-स्टेशनवरून एक सुंदरशी चालण्याची काठी आणून भेट दिली! आम्हा सर्वांनाच तिचे काय करावे ते कळेना!

जून २०१८ मध्ये, ते ९७ वर्षांचे असताना पार्क इक्विपमेंटवर व्यायाम करतानाचा त्यांचा व्हिडीओ त्यांच्या फेसबुक पेज वर पाहून लोक आश्चर्यचकित होतात.

 

पु. ल. देशपांडे, कुमठा, पंढरीनाथ रेगे यांसोबत बॉम्बे बुक डेपोचे कर्मचारी.

पु. ल. देशपांडे, कुमठा, पंढरीनाथ रेगे यांसोबत बॉम्बे बुक डेपोचे कर्मचारी.

शेवटच्या दिवसापर्यंत ते सतत, अफाट वाचत. ते स्वतः पुस्तके घेतच, पण लेखक व प्रकाशक देखील

स्वतःहून त्यांना त्यांच्या अभिप्रायासाठी प्रेमाने स्वतःची पुस्तके पाठवत.

काही लेखक प्रस्तावनेसाठी त्यांना विचारत. पुस्तक विकत घेतल्यावर ते वाचून त्या त्या लेखक व/वा प्रकाशक यांच्याशी त्यांचा पत्र व फोनद्वारे संवाद सतत चालू असे.

२८ मार्च २०१९ च्या पहाटे झोपेतच ते गेले. त्याच्या आदल्या दिवशीही त्यांनी पुस्तकावरचा अभिप्राय पत्राद्वारे पाठवला होता – लिहायला त्रास होत असूनही.

वि. स. खांडेकरांसोबत कुमठा.

वि. स. खांडेकरांसोबत कुमठा.

त्यांनी थोडेबहुत लिखाणही केले. पुस्तक पंढरी मसिकाचा पूर्ण अंक ते अनेक वर्षे एकहाती लिहीत असत.

(कधी कधी मी त्यांना काहीबाही लिहून देत असे.) त्यांच्या ८५ व्या वाढदिवशी त्यांचा ‘सॉंग्स फ्रॉम द हार्ट’ हा काव्य-कथा संग्रह प्रसिद्ध झाला.

त्यांच्या ९० व्या वर्षी ‘पुस्तक पंढरीचा वारकरी’ हे त्यांचे व्यावसायिक जीवनाचे आत्मचरित्र पॉप्युलर प्रकाशनतर्फे प्रसिद्ध झाले.

मराठी पुस्तक विक्रेत्याचे बहुधा हे एकमेव आत्मचरित्र असावे व त्यातून १९४५-९२ या काळातल्या मराठी पुस्तक व्यवसायाचे एक सुंदर रेखाचित्र उभे राहते. त्या वर्षीच्या ललित मासिकाच्या चोखंदळ वाचकांच्या पसंतीच्या यादीत या पुस्तकाने स्थान पटकावले.

Bombay book depot याशिवाय त्यांनी वेळोवेळी पुस्तक व्यवसायाबाबत व इतर विषयांवर अनेक लेख वेगवेगळ्या नियतकालिकांत लिहिले आहेत.

त्यांनी तारुणपणी के. एन. पी. राव या टोपण नावाने किहिलेल्या काही कथा, कविता व लेख प्रकाशित झाल्या आहेत. तसेच त्यांचे काही अप्रकाशित लेखनही आहे.

त्यांच्या १९४६ मधील कवितांमधून त्या काळच्या एका लहान शहरातल्या गरीब उच्चवर्णीय पोरक्या सरल व उत्कट तरुण मनाची झलक मिळते.

पहिले पुस्तक, “Songs of the Heart”

पहिले पुस्तक, “Songs of the Heart”

‘हार्टफेल्ट – पेनिंग्स बाय पांडुरंग कुमठा’ या त्यांच्या फेसबुक पेजवर त्यांचे काही लिखाण प्रसिद्ध झाले आहे, 

तसेच मी आता रिटायर झाल्यावर त्यांचे कार्य व व्यक्तिमत्वापासून प्रेरणा घेऊन काही उपक्रम सुरू करण्याचा मानस आहे.

कुमठांचे काही लिखाण

कुमठांचे काही लिखाण

ते घरी असले की त्यांचा सहवास म्हणजे आम्हा कुटुंबियांसाठी

आत्मचरित्र  "पुस्तक पंढरीचा वारकरी

आत्मचरित्र  “पुस्तक पंढरीचा वारकरी

शांत वातावरणात सर्वत्र दरवळणाऱ्या प्रसन्न सुवासासारखा होता

 आतासुद्धा त्यांची आठवण आली की तोच अनुभव येतो आणि प्रसन्न वाटते.

 

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: