Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORYINDIAMAHARASHTRA

panipat war 3 – पानिपत मोहिमेचे प्रमुख सदाशिवभाऊ

1 Mins read

 

 

Panipat war 3 – मराठ्यांच्या पानिपत मोहिमेचे प्रमुख

सदाशिवभाऊ यांची समाधी कुठे आहे ?

प्रवीण भोसले

“दो मोती गलत,दसबीस अश्रफात फरकात,खुर्देकू-रुपयाकू गणत नहीं।” म्हणजे “दोन मोती गळाले,दहावीस मोहरा हरपल्या, खुर्दा-रुपयांची गणती नाही”. पानिपतच्या महाविनाशाचे हे तत्कालीन संक्षिप्त वर्णन आहे.यातील मोती आहेत सदाशिवभाऊ आणि विश्वासराव,मोहरा आहेत मातब्बर मराठे सरदार आणि खुर्दा इतर सर्व.

panipat war 3 – पानिपत ! अब्दाली-नजीबखान-अहमद बंगष-सुजाउद्दौला यांच्या संयुक्त सैन्याविरूध्द मराठे प्राणपणाने लढले ते पानिपतच्या महारणसंग्रामात.मराठ्यांच्या या सैन्याचे प्रमुख होते सदाशिवभाऊ आणि त्यांच्यासोबत होते नानासाहेब पेशव्यांचे थोरले पुत्र विश्वासराव.पानिपतावर प्रचंड सैन्यहानी होऊन मराठे पराभूत झाले. पण अब्दालीला या लढाईत बसलेला मराठ्यांचा तडाखा असा काही जबरदस्त होता की विजयी होऊनही त्याने मराठ्यांचा दिल्ली आणि हिंदुस्थानाच्या कारभारावरील अधिकार मान्य करून काढता पाय घेतला.पानिपतावरील मराठ्यांच्या कडव्या प्रतिकारामुळेच पुन्हा हिंदुस्थानावर खैबरखिंड आणि हिंदुकुश पर्वत रांगांतून एकही आक्रमण झाले नाही.पुढच्या दहा वर्षात मराठ्यांनी पानिपतचे अपयश साफ धूवून काढून दिल्ली पुन्हा आपल्या वर्चस्वाखाली आणली. पानिपतवरील पराभवाच्या जखमा भरून आल्या, पानिपतावर धारातीर्थी पडलेल्या मराठी वीरांची नावे अजरामर झाली पण त्यांच्या समाध्या मात्र विस्मरणात गेल्या.या युध्दाचे प्रत्यक्ष सेनापती असलेल्या, पानिपतावरच धारातीर्थी पडलेल्या सदाशिवभाऊंची समाधी आज किती मराठी लोकांना, इतिहास संशोधक-अभ्यासकांना माहिती आहे?

panipat war 3 - पानिपत मोहिमेचे प्रमुख सदाशिवभाऊ यांची समाधी 1

panipat war 3 – पानिपत मोहिमेचे प्रमुख सदाशिवभाऊ यांची समाधी 1

२०१८ साली या समाधीची माहिती मी छायाचित्रांसह मराठी वृत्तपत्रांतून दिली.मराठीत प्रथमच ही माहिती यामुळे छापली गेली व प्रकाशित झाली.या समाधीचे दर्शन मला कसे घडले त्याची हकीकत आज तीन वर्षानंतर तुम्हा सर्व वाचकांसमोर ठेवतोय.

भाऊंच्या समाधीबद्दल सांगण्यापूर्वी थोडक्यात भाऊ व विश्वासराव यांची माहिती नमूद करतो.

www.postboxindia.com

मराठ्यांच्या पानिपत मोहिमेचे प्रमुख सदाशिवभाऊ यांची समाधी कुठे आहे?

panipat war 3 – सदाशिवराव हे पहिल्या बाजीरावांचे धाकटे बंधू चिमाजीआप्पा यांचे पुत्र होते.(जन्म- ३ ऑगस्ट १७३०). १७४० साली पेशवे बाजीराव आणि चिमाजी आप्पा निधन पावले.यावेळी भाऊ केवळ १० वर्षाचे होते. बाजीरावांनंतर त्यांचे थोरले पुत्र बाळाजी उर्फ नानासाहेब यांना छत्रपती शाहूमहाराजांनी पेशवेपदावर नेमले.

१७४६ मध्ये कर्नाटकात मोहिमेवर जाऊन भाऊनी खंडण्या वसूल करून कोप्पळजवळचा बहादूरबंडा किल्ला जिंकण्यात मोठी कामगिरी बजावली.ही भाऊंची पहिली मोहीम होती. १७५० मध्ये नगरचा मोगली किल्लेदार कवीजंग याला फितूर करुन नगरचा किल्ला भाऊंनी काबीज केला.

Also Read : https://wp.me/pd4aDm-1kI

सांगोला येथील लढाईत भाऊंनी विजय मिळविला. ह्यावेळी छत्रपती रामराजेंना भाऊंनी सोबत नेले होते.सांगोला येथेच पेशव्यांच्या हुकूमाने भाऊंनी छत्रपती रामराजे महाराजांकडून ‘सांगोला करार” करून घेतला.या कराराने पेशव्यांचे अधिकार आणखीनच वाढले. भाऊ यानंतर पेशव्यांचे मुतालिक(दिवाण) झाले.नानासाहेबांचा भाऊंवर अतिशय विश्वास असून भाऊंचा त्यांना मोठा आधार वाटत असे.

www.postboxindia.com

मराठ्यांच्या पानिपत मोहिमेचे प्रमुख सदाशिवभाऊ यांची समाधी कुठे आहे?

panipat war 3 – पेशवे नानासाहेबांचे पुत्र विश्वासराव हे रूपाने अत्यंत देखणे असून ‘पुरुषात देखणा विश्वासराव’ असे त्याकाळी म्हणत असत (जन्म-२ मार्च १७४२).विश्वासरावांना भावी पेशवे ह्या भावनेनेच नानासाहेबांनी कारभाराचे शिक्षण द्यायला चालू केले. दत्ताजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली विश्वासराव सिंदखेडच्या निजामाविरुद्धच्या लढाईत सामील झाले होते. १७६० साली हैदराबादचा

निजाम व मराठे यांच्यात उदगीर येथे लढाई झाली. निजामाला उदगीरच्या किल्ल्यात कोंडून मराठ्यांनी त्याला शरण आणले. या मोहिमेची मुखत्यारी भाऊंकडे होती. इथे भाऊंनी मोठी कर्तबगारी दाखविली.ह्या लढाईत विश्वासरावांच्या हाताखाली दहा हजार सैनिकांची स्वतंत्र फौज देण्यात आली होती. निजामाकडून ६२ लाखांच्या खंडणीसह अशीरगड,अहमदनगर, नळदुर्ग किल्यांबरोबरच देवगिरी प्रथमच मराठ्यांच्या ताब्यात आला.पाठोपाठ नाशिक त्र्यंबकेश्वर मधील पूर्वी मोगलांनी देवळे पाडून केलेल्या मशीदी भुईसपाट करुन तिथे पुन्हा मंदिरे बांधण्यात आली.

www.postboxindia.com

मराठ्यांच्या पानिपत मोहिमेचे प्रमुख सदाशिवभाऊ यांची समाधी कुठे आहे?

मराठे ह्या विजयानंदात गर्क असतानाच दिल्लीकडून एक भयंकर बातमी आली.अफगाणी सुलतान अहमदशहा अब्दाली व रोहिलखंडातील नजीबखान रोहिल्याने

आक्रमण करून, दत्ताजी शिंदेंची क्रूरपणे हत्या करून, दिल्ली काबीज केली.ही बातमी येताच नानासाहेब पेशव्यांनी भाऊंना अब्दालीविरूध्दच्या मोहिमेचे प्रमुखपद देऊन त्यांना तीस हजाराची फौज देऊन दिल्लीकडे रवाना केले. ह्या मोहिमेत विश्वासरावांनाही भाऊबरोबर पाठवण्यात आले. दिल्लीकडे जाताना वाटेत शिंदे, होळकर, गायकवाड, पवारांच्या फौजा भाऊंना सामील होऊन मराठ्यांनी दिल्ली गाठली. दिल्ली काबीज करून मराठ्यांचा मुक्काम दिल्लीला अडीच महिने पडला.

www.postboxindia.com

मराठ्यांच्या पानिपत मोहिमेचे प्रमुख सदाशिवभाऊ यांची समाधी कुठे आहे?

दिल्ली येथे फौजेला पैशांची अडचण येताच भाऊंनी फौज घेऊन उत्तरेकडे कुंजपुरा गावावर हल्ला करून ते काबीज केले. ह्या लढाईत दत्ताजींना क्रूरपणे मारणारा कुतुबशहा हाती पडताच त्याचे डोके उडवण्यात आले. यमुनेच्या पश्चिम काठाने मराठे तर पूर्व काठाने

अब्दालीची फौज एकमेकांचा अंदाज घेत समांतर हालचाली करीत होते. भाऊंनी दक्षिणेकडे वळून दिल्लीचा रोख धरताच अब्दालीही दक्षिणेकडे सरकला व त्याने बागपत येथे यमुना नदी ओलांडून मराठ्यांचा दिल्लीकडे जाण्याचा मार्ग रोखला. दिल्लीच्या वाटेवरील पानिपत ह्या

गावाशेजारी भाऊंनी आपल्या सैन्याची छावणी केली. खंदक खणून व आघाडीला तोफा ठेऊन

panipat war 3 – मराठे पानिपतावर थांबले. अब्दालीही दोन मैलावर तळ ठोकून मराठ्यांसमोर आला. १ नोव्हेंबर पासून पुढील दोन महिने मराठे व अब्दालीचे सैन्य एकमेकांवर सैन्याच्या तुकड्या पाठवून हल्ले करीत होते. मराठ्यांना दिल्लीकडून रसद व खजिना पाठविणारे गोविंदपंत बुंदेले अब्दालीकडून मारले जाताच मराठ्यांची रसद तुटली. अब्दालीला मात्र मागून रसद पुरवठा चालूच होता. मराठा फौजेची होती नव्हती ती रसद,अन्नसाठा संपुष्टात आला. माणसे,जनावरे दगाऊ लागली. ८-९ जानेवारीपासून सहा दिवस अर्धपोटी राहून, उपास काढून, अखेर ह्या सापळ्यात अडकून उपाशी मरण्यापेक्षा अब्दालीवर हल्ला करून त्याची फळी फोडून पार व्हायचा निर्णय भाऊंनी घेतला. उपाशी असले तरी युद्धाच्या आवेशाने मराठे सर्व विसरून प्राणपणाने लढायला तयार झाले.

www.postboxindia.com

मराठ्यांच्या पानिपत मोहिमेचे प्रमुख सदाशिवभाऊ यांची समाधी कुठे आहे?

panipat war 3 – मराठ्यांबरोबर असलेला इब्राहीम खान ह्यांचा तोफखाना पुढे ठेवून मागे गोल करून लढाई करण्याचा बेत करून १४ जानेवारी १७६१ ला सकाळी मराठे अफगाणांवर तुटून पडले. इब्राहिमखान व इतर मराठे सरदार सुरुवातीला ठरल्याप्रमाणे लढाई करीत दुपारपर्यंत अफगाणांवर भारी पडू लागले.दुपारपर्यंत विजयाचे पारडे मराठ्यांच्या बाजूला झुकलेले होते.यावेळी आपल्या सैन्याच्या मागे लढाईपासून दूर अंतरावर असलेल्या अब्दालीने आपल्या जनानखान्यासह पलायनाची तयारी चालू केली होती. एवढ्यात ठरलेली गोल रचना मोडून काही मराठी सैन्यतुकड्या तोफखान्याच्या पुढे घुसल्या. इब्राहीमखानांना नाईलाजाने तोफखाना बंद करावा लागला आणि अफगाणांच्या तोफांनी मराठ्यांचे अतोनात नुकसान होऊ लागले. तरीही मराठ्यांच्या पराक्रमाने अफगाणदेखील मोठ्या संख्येने मारले जाऊ लागले. हातघाईची लढाई सुरू झाली.

भाऊ व विश्वासराव हुजुरातीची फौज घेऊन अफगाणांवर तुटून पडले. ह्या धुमश्चक्रीत एक गोळी विश्वासरावांच्या कपाळात घुसून विश्वासराव ठार झाले. हे पाहताच त्वेषाने भाऊंनी आपल्याजवळच्या सैन्यासह या प्रचंड रणधुमाळीत लढत स्वत:ला झोकून दिले. विश्वासरावांच्या वीरमरणापाठोपाठ भाऊ दिसेनासे होताच मराठ्यांचा धीर सुटू लागला.अशातच लढाईपूर्वी मराठ्यांच्या सैन्यात चाकरी पत्करून दाखल झालेल्या दोन हजार पठाणांनी दगा करून सैन्याच्या गोलातील बाजारबुणग्यांवर हल्ला केला.

www.postboxindia.com

मराठ्यांच्या पानिपत मोहिमेचे प्रमुख सदाशिवभाऊ यांची समाधी कुठे आहे?

“विश्वासराव व भाऊ मारले गेले असून मराठ्यांचा पराभव झाला आहे”असे मोठ्याने ओरडत या पठाणांनी बाजारबुणग्यांची लूट व कत्तल चालू केली. बुणगे पळू लागताच मराठ्यांची फळी विस्कटली आणि अफगाणांनी आता भाऊंच्या हुजुरातीच्या सैन्याला घेरून जबरदस्त हल्ला केला. भाऊंच्यासोबत तुकोजी शिंदे,यशवंतराव पवार, संताजी वाघ,जनकोजी शिंदे अखेरपर्यंत प्राणपणाने लढले.वीरश्री अंगी संचारलेले भाऊ हजारो पठाणांच्या जोरदार आक्रमणात लढता लढता दिसेनासे झाले. सैन्याचे सेनापती दिसेनासे होताच मराठ्यांचा धीर खचला आणि अब्दालीच्या सैन्याने निकराचा हल्ला करून मराठ्यांचा पराभव केला.साठ हजार लढवय्ये लढून, कटून धारातीर्थी पडले तर इतर बिनलढाऊ मराठ्यांपैकी पन्नास हजार लोकांची अब्दालीच्या पठाण आणि नजीबखानाच्या रोहिल्यांनी साफ कत्तल केली.अंदाजे पंचवीस हजार मराठे कैद केले गेले.यात स्त्रियांचा भरणा मोठा होता. मराठ्यांचे प्रचंड युध्दसाहित्य व इतर सामुग्री शत्रूच्या हाती पडली.यातून निसटलेल्या हजारो मराठ्यांनी जमेल त्या मार्गाने जीव बचाऊन दक्षिणेची वाट धरली.

www.postboxindia.com

मराठ्यांच्या पानिपत मोहिमेचे प्रमुख सदाशिवभाऊ यांची समाधी कुठे आहे?

सूजाउद्दोल्याच्या चाकरीतील हिंदूंच्या मदतीने काही मराठ्यांनी दुसऱ्या दिवशी रणभूमीवरच विश्वासरावांचा दहनविधी केला.

भाऊंचे काय झाले याची माहिती काशीराज या सुजाच्या पदरच्या मुत्सद्द्याने लिहिलेल्या वृत्तांतात अशी नमूद आहे;

” सदाशिवरावभाऊंचे शव शीर नसल्याने अंगावरील खुणांवरुन अंदाजाने ओळखून त्या शवाचाही अग्निसंस्कार करण्यात

आला. ह्यासाठी मराठ्यांकडून एक लाख रुपये प्रेते ताब्यात देण्यासाठी अब्दालीने घेतले.दोन दिवसांनी भाऊंचे शिर सापडले.त्यालाही अग्नी देण्यात आला.”

panipat war 3 – पानिपतचे हे युद्ध उद्भवण्यामागची कारणे,मराठ्यांच्या पराभवाची कारणे आणि या युध्दाचे परिणाम यावर भरपूर लिखाण झालेले आहे.जिज्ञासूंनी ते वाचावे. या लेखाचा विषय तो नसून भाऊंची समाधी हा आहे. पण मराठीत रुढ झालेला ‘भाऊगर्दी’ शब्द पराभवाचे एक महत्त्वाचे कारण आपल्याला सांगतो.६० हजार लढवय्यांसोबत बाजारबुणगे (बिनलढाऊ)माणसे होती सव्वा लाखाहूनही जास्त. अजिंक्य मराठ्यांच्या सैन्यासोबत आयतीच तीर्थयात्रा घडेल म्हणून सामील झालेल्यांचा भरणा यात मोठा होता.अशी प्रचंड गर्दी कधीही न पाहिल्याने आणि भाऊ सेनापती असल्याने त्यांचे नाव जोडून ‘भाऊगर्दी’ हा शब्द मराठीत अवतरला.ही ‘भाऊगर्दी’ मराठ्यांच्या वाताहतीचे एक मुख्य कारण ठरले.

www.postboxindia.com

मराठ्यांच्या पानिपत मोहिमेचे प्रमुख सदाशिवभाऊ यांची समाधी कुठे आहे?

आणखी सांगायचे म्हटले तर ‘भाऊगर्दी’ शब्दाला मृत्यूसमयी ‘भाऊ युध्दाच्या गर्दीत मिळाले(मिसळले,नाहीसे झाले)’ आणि ‘भाऊंवर गर्दी झाली ‘या बखरीतील वाक्याचा काही संदर्भ असेल का हे काही सांगता येत नाही.

तर आता या समाधीपर्यंत पोहोचण्याचा माझा प्रवास सांगतो.

पानिपतवीरांच्या समाधीस्थळांच्या शोधासाठी माझे अनेक प्रयत्न चालले होते.संदर्भग्रंथांचे वाचन,विविध घराण्यांतून मिळणारी माहिती, पत्रसंग्रह,इंटरनेटवरील माहिती, अनेक मान्यवर इतिहास संशोधकांशी चर्चा यातून माहितीचे कण गोळा होत होते.पानिपत युध्दाचा इतिहास बारकाव्यांसह स्पष्ट होत होता.पण सदाशिवभाऊंची समाधी कुठे आहे याबद्दल माहिती मिळत नव्हती. २०१७ साली पानिपतला जायचे मी निश्चित केले होते.तिथे काही माहिती मिळेल अशी आशा वाटत होती.

पानिपतला जाण्यापूर्वी मी पुण्यात डॉ.गो.बं.देगलूरकर सरांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. किल्ले, मराठी स्वराज्यवीरांची समाधीस्थळे याबरोबरच प्राचीन शिल्पसमृध्द मंदिरे आणि मूर्ती हादेखील माझ्या आवडीचा,अभ्यासाचा विषय आहे.मंदिरस्थापत्य आणि मूर्ती शास्त्र यातील देगलूरकर सरांचा अभ्यास आणि अधिकार खूप उच्च दर्जाचा आहे.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे नाव त्यांच्या कार्यामुळे खूप प्रसिद्ध आहे.मला या मंदिरांच्या विषयात त्यांचे मौल्यवान मार्गदर्शन मिळत होते.सरांच्या घरी चर्चा करीत असताना मी पानिपतला जाणार आहे हे सरांना सांगितले आणि सदाशिवभाऊ व विश्वासराव यांच्या समाध्यांबद्दल काहीच माहिती मिळत नाही हेही सांगितले.

सर म्हणाले ” आम्ही डेक्कन कॉलेजमार्फत हरियाणामधे फरहाना गावी बारा-पंधरा वर्षापूर्वी पुरातत्त्वीय उत्खनन करीत असताना त्या कामावर रोहतक भागातील एक स्थानिक व्यक्ती आमच्यासोबत होती.या व्यक्तीने मला सांगितले होते की त्याच्या भागात एका गावी एका मराठा वीराची जुनी समाधी आहे.पण त्याला त्या वीराचे नाव माहिती नव्हते.”

सरांना मी गावाचे नाव विचारले तेव्हा सर म्हणाले “मी काही ती समाधी पाहिलेली नाही. आणि या गोष्टीला बारा-पंधरा वर्षे झाली. त्यामुळे गावाचे नाव माझ्याही लक्षात नाही. पण रोहटक परिसरात ही समाधी आहे हे निश्चित आहे.”

मला एक माहितीचा महत्वाचा धागा मिळाला. सरांचे आभार मानून मी त्यांचा निरोप घेतला.पानिपतला जाण्यापूर्वी रोहटक जिल्ह्यातील प्रेक्षणीय व ऐतिहासिक स्थळांवरील एक इंटरनेटवरील लेख माझ्या वाचनात आला.या लेखात रोहटकमधील सांघी गावातील ‘भाऊ ता गद्दी’ या नाथपंथी मठाचा नामोल्लेख होता.नावाशिवाय बाकी काहीही माहिती यात नव्हती.पण ‘भाऊ’ हे अस्सल मराठी नाव माझ्या मनात पक्कं ठसलं.शिवाय देगलूरकर सरांनी दिलेला रोहटकचा संदर्भ मनात होताच.माझ्या पानिपतवारीत या ठिकाणी भेट देणं या दोन संदर्भामुळे निश्चित झालं.

हा पानिपतचा माझा दौरा थोड्या आडव्यातिडव्या मार्गाने होता.परत येईपर्यंत पाच-सहा हजार कि.मी.प्रवास होणार होता.१९९५ पासून मोटरसायकलवरुन महाराष्ट्रात सतत आणि चारदा भारतभर फिरल्याने पाठीचे दुखणे सुरु झाले होते.आता चारचाकीशिवाय पर्याय नव्हता. सोबत माझे मित्र नाना यादव आणि राजाराम चव्हाण होते.मात्र गाडी चालवणारा मी एकटाच.

www.postboxindia.com

मराठ्यांच्या पानिपत मोहिमेचे प्रमुख सदाशिवभाऊ यांची समाधी कुठे आहे?

सांगलीतून निघून सात आठ दिवसांत खांडवा,सांची,उदयगिरी,खजुराहो, छत्तरपूर,धुबेला,ओरछा,झांशी,शिवपुरी,आग्रा,दिल्ली, दत्ताजी शिंदेंचे धारातीर्थस्थळ बुराडी घाट पाहून पुढे १४ डिसेंबर २०१७ च्या रात्री आम्ही पानिपत गाठले.

१५ डिसेंबरच्या सकाळी ७ वाजता पानिपत panipat war 3 गावालगत असणाऱ्या युध्दभूमीवर पोहोचलो.पानिपतच्या ‘काला आम’ ह्या युध्दस्मारकापाशी,मराठ्यांच्या या सर्वोच्च शौर्यस्थळी आपल्या पराक्रमी पूर्वजांना श्रध्दांजली वाहिल्यावर तिथल्या नीटनेटक्या ठेवलेल्या हिरव्यागार झाडीने, गवताने आच्छादलेल्या शांत परिसरात बैठक मारली.इथे पूर्वी असणारे आंब्याचे झाड १९०६ साली वठल्याने नष्ट झाले.याच ठिकाणी सदाशिवभाऊंसह धारातीर्थी पडलेल्या असंख्य मराठी वीरांच्या सामूहिक चिता १४-१५-१६ जानेवारी १७६१ च्या रात्री धडधडून पेटल्याचे दृश्य मनातून जाता जाईना.त्याकाळी मराठ्यांच्या एका संपूर्ण लढाऊ पिढीची राख पसरलेल्या ह्या परिसराची आताची शांतता भयंकर जीवघेणी तर आहेच पण त्याचबरोबर मराठ्यांच्या अग्नीतुल्य शौर्याची आठवण करुन देणारी , जरीपटक्याच्या सोनेरी काठासारखी झगझगीत, झळाळणारी, डोळे दिपवणारी किनार असणारीदेखील आहे.प्राणांची होळी करुन रक्ताची धुळवड खेळलेल्या मराठ्यांचे हे सामूहिक स्मारक आहे.परत निघताना पुन्हा एकदा स्मारकाला साष्टांग नमस्कार घातला.आता शोधायची होती भाऊंची समाधी.

पानिपत वस्तूसंग्रहालयात भाऊंच्या समाधीबद्दल कसलीच माहिती उपलब्ध नव्हती. मात्र सांघी गाव रोहतकजवळ आहे हे संग्रहालयाच्या क्युरेटरनी सांगितले. सांघी गावी जाण्यासाठी इंटरनेटवर सांघी गावाचा रस्ता शोधताना हरियाणा शासनाच्या रोहतक जिल्हा गेझेटीयरमधे मला ‘ सांघी गावात सदाशिवभाऊंची संभाव्य समाधी आहे ‘ हा अत्यंत महत्वाचा संदर्भ मिळाला. हे गेझेटीयर १९७० सालचे आहे.अत्यंत आतुरतेने आणि ओढीने पानिपतपासून सांघी गावचा रस्ता पकडला.पानिपतवरुन गोहाना गाठले. गोहाना – रोहतक रोडवर असलेल्या जसिया गावातून उजवीकडे गेलेल्या फाट्यावर ४ कि.मी.वर असलेल्या सांघी गावात पोहोचलो.पानिपत ते सांघी अंतर ५५ कि.मी.आहे.सांघीमधे चौकशी करताच ग्रामस्थांनी ‘भाऊ ता गद्दी’ मठाचा पत्ता सांगितला.गावाबाहेर साधारण ३ कि.मी.अंतरावर हिरव्यागार शेतांच्या मधे मठाची इमारत आहे.बाहेरच सदाशिवराव भाऊंचे नाव असलेला फलक दिसला आणि आपण योग्य ठिकाणी आल्याची खात्री पटली.(पोस्टच्या शेवटी सांघी गावाचे स्थान व या फलकाचा फोटो दिला आहे.)

अनिवार आतुरतेने मठात प्रवेश करताच सामोरे आले ते मठाचे मुख्य महंत.यांचे नाव सुंदरनाथ महाराज.या महंतांना आम्ही महाराष्ट्रातून दर्शनासाठी आलोय हे सांगताच ते अत्यंत भारावले.आत जाऊन भाऊंच्या समाधीचे दर्शन घेतानाच्या भावना शब्दात मांडणे कठीण आहे. महंतांना आमच्याबद्दल वाटलेल्या आपुलकीमुळे आम्हाला अपेक्षित माहिती सहजगत्या मिळू लागली.

सदाशिवभाऊ पानिपत युध्दातील मराठ्यांचे सेनापती होते, विश्वासराव हे नानासाहेब पेशव्यांचे पुत्र होते, भाऊंची जन्मतारीख, ही लढाई केव्हा, कुणाविरूध्द झाली ही सर्व मूलभूत माहिती महंतांना होती.पण युध्द संपल्यावर काय घडले याबद्दल त्यांनी दिलेली माहिती मात्र मला नवीनच होती.

महंतांनी दिलेल्या माहितीचा सारांश असा होता.” सदाशिवभाऊ

panipat war 3 – पानिपतावर मरण पावले नाहीत. ते अत्यंत जखमी होऊन गुप्तपणे सांघी गावी २२ जानेवारी १७६१ रोजी आले. इथे आल्यावर त्यांनी नाथपंथाची दीक्षा घेतली.पानिपतावरील पराभव वर्मी लागल्याने ते गुप्तपणे आपली ओळख लपवून राहू लागले.त्यांना परिसरातील लोकांनी मठ बांधण्यात मोठी मदत केली.

१७६४ मधे सांघी गावावर एका लुटारू रोहिल्याने हल्ला केला तेव्हा भाऊंनी पुढे होऊन या रोहिल्याचा मोड करुन गाव वाचवले.मात्र या रोहिल्याने भाऊंना ओळखले व त्यामुळे भाऊ खरे कोण हे सर्वांना कळले.आपली ओळख जाहीर होताच भाऊंनी १७६४ मधे माघ शुक्ल त्रयोदशीला मठात समाधी घेतली.काहींच्या मते रोहिल्याविरुध्द लढताना भाऊ गंभीर जखमी झाले व त्यातच त्यांचा अंत झाला.त्यांच्या भक्तांनी त्यांची मठातील ही समाधी बांधली व आजतागायत ही समाधी नित्यपूजेत असून या परिसरात ‘भाऊ ता गद्दी'(भाऊंची गादी) म्हणून तेव्हापासूनच या स्थानाची प्रसिद्धी आहे.या परिसराला डेरा लांघिवाला असे नाव आहे.”

सुंदरनाथ महाराजांनी सांघी गावचा इतिहास आणि भाऊंची समाधी यावर रोहतकचे जिल्हा उपशिक्षणाधिकारी श्री.गुलाबसिंह हुड्डा यांनी लिहिलेले पुस्तक दिले.यात खूप महत्त्वाची माहिती नमूद आहे.ती खालीलप्रमाणे आहे.

भाऊंच्या समाधीला भेट देणारे पहिले मराठी व्यक्ती आहेत श्री. नरहरी विष्णु गाडगीळ.१९६२ मधे पंजाबचे राज्यपाल असताना श्री. गाडगीळ येथे आले होते.त्यांच्यामुळेच १९७० सालच्या रोहतक जिल्हा गेझेटीयरमधे भाऊंच्या समाधीची माहिती नमूद झाली.(पोस्टमधील फोटो पहावा.) श्री. हरी राम गुप्ता या मान्यवर इतिहास संशोधकांनी १९६१ मधे लिहिलेल्या ‘ Marathas and Panipat’ या पुस्तकाला श्री.गाडगीळ यांचीच प्रस्तावना आहे.१९६१ मधे प्रा.भला राम मलिक यांनी प्रथम सांघी गावातील भाऊंच्या समाधीची माहिती प्रकाशित केली. डिसेंबर २००२ मधे श्री. धर्मपाल डुडी यांनी हरियाणा टुरीझम कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवर ही माहिती अपलोड केली.भाऊंच्या पुण्यतिथीला पूर्वीपासून दरवर्षी यात्रा भरते.या यात्रेवर आणि भाऊंच्या समाधीवर दै.जागरण,दै.अमर उजाला या हिंदी वर्तमानपत्रातून बातम्या छापल्या गेल्या आहेत.(खाली फोटो दिला आहे.) समाधीशेजारची भाऊंची मूर्ती ८ सप्टेंबर २०१३ रोजी श्री.गुलाबसिंह हुड्डा यांनी स्थापली आहे.भाऊ हे मठाचे पहिले महंत मानलेले असून त्यांच्यानंतर महंतपदी आलेल्या ११ महंतांची नावे कार्यकाळासह मठात नमूद आहेत.सध्याचे सुंदरनाथ महाराज हे १२ वे महंत आहेत.मठाला वेळोवेळी भक्तांनी जमीनी दान दिल्या असून सध्या मठाची एकूण जमीन १८ एकर आहे.

आता आपण भाऊंचा मृत्यू व अंत्यसंस्कार याबद्दल मराठीत प्रकाशित झालेल्या संदर्भातील माहिती पाहू.

विश्वासराव धारातीर्थी पडताच दु:खाने व संतापाने भाऊं घोड्यावर स्वार होऊन हुजुरातीच्या सैन्यासह पठाणांना भिडले.या हातघाईच्या लढाईत भाऊ दिसेनासे झाले. युध्द संपल्यावर दोन दिवस अंत्यसंस्कारासाठी शवांची शोधाशोध झाली. त्यात विश्वासरावांचे शव सापडले.आणखी एक बिनशीराचे शव सापडले.ते पोशाखावरुन व अलंकारांवरुन भाऊंचे आहे असा निष्कर्ष काढून दोन्ही शवांचे अंत्यसंस्कार युध्दभूमीवरच करण्यात आले.भाऊंचे शीर एका पठाण सैनिकाने कापून घेऊन लपवून ठेवले होते.ते उघडकीस आल्यावर या शीरालाही अग्नी देण्यात आला.पण या हकीकतीतील त्रुटींमुळे भाऊ पानिपतावर धारातीर्थी पडले नसून ते जिवंत आहेत अशी अफवा पसरली होती.शिवाय इतर महत्त्वाच्या बखरीत “भाऊ नाहीसे झाले”, “गायब झाले”, “भाऊंचे काय झाले कळलेच नाही”, ” भाऊसाहेब गर्दीत मिळाले,कोठे ठिकाण नाहिसें झाले” असे उल्लेख आहेत.यामुळेच पुढे भाऊंच्या तोतयाचे खळबळ माजविणारे प्रकरण उद्भवले.पुढे ह्या तोतयाचे बंड खूप वाढले.अखेर त्याला पकडून तो तोतया आहे हे सिध्द करून त्याला शिक्षा करण्यात आला.तरीही भाऊंचे नक्की काय झाले हा प्रश्न त्याकाळी अनेकांना पडला होता.

भाऊंच्या मठातील माहिती, बखरींतील व इतर संदर्भ साधनातील माहिती यावरुन मला संभाव्य वाटणारा निष्कर्ष इथे नमूद करतो.

panipat war 3 – भाऊंचा मृत्यू पानिपतावरच झाला.अंत्यसंस्कारानंतर अस्थी भागीरथीमधे विसर्जनासाठी पाठवल्याचा उल्लेख बखरीत आहे.त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात सहभागी असलेल्या मराठ्यांनी हिंदू परंपरेनुसार या अत्यंत महत्वाच्या व्यक्तीचे मरणोपरांत श्राध्द वगैरे विधी यथोचित होण्यासाठी कुठेतरी त्यांची समाधी बांधण्याचा निर्णय घेतला असावा.याच मराठ्यांनी भाऊंच्या अस्थी सोबत घेऊन भाऊंची समाधी पानिपतापासून दूर असलेल्या सांघी गावी बांधली असावी.या समाधीच्या देखभालीसाठी, पूजाअर्चेसाठी ह्यापैकी काही मराठे तिथेच राहिले असणार.पानिपतावर परक्या आक्रमकांशी प्राणपणाने लढणारे मराठ्यांचे सेनापती भाऊ त्याकाळी सर्वांनाच माहिती झाले होते.त्यामुळे सांघी गावातील लोकांनी या समाधीला व मराठ्यांना आपलेपणाने वागवून मदत केली .भाऊंना एक विभूती मानून त्यांच्या समाधीचे नाथपंथी मठात रूपांतर झाले.एकप्रकारे मराठी लोकांना अज्ञात राहिलेल्या भाऊंच्या समाधीला आणि भाऊंनाही आपले मानूनच सांघीच्या जाट ग्रामस्थांनी हे स्थान जपले आहे.

पानिपत लढाईनंतर पळून गेलेल्या मराठ्यांपैकी कित्येक हरियाणातच स्थायिक झाले. ह्या मराठ्यांनीदेखील भाऊंच्या समाधी व मठनिर्माण कार्यात आपले योगदान दिले असावे. सध्या रोड मराठे म्हणून हे मराठे ओळखले जातात.

एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाऊ पानिपतावर किंवा सांघी गावात कुठेही मरण पावले असले तरी सांघी गावातील हे समाधी स्मारक भाऊंचेच आहे याबद्दल खात्री वाटते.कारण १७६१ पासूनचा या मठाचा उपलब्ध इतिहास, सुरूवातीपासून या समाधीला, मठाला लोकांनी दिलेल्या जमिनी व इतर दाने आणि चालत आलेली परंपरा यावरुन ही माझ्या मते तरी भाऊंचीच समाधी आहे.रोहतक गेझेटीयरमधे ‘ भाऊंचा दहनविधी बहुधा सांघी किंवा आसपासच्या भागात झाल्याने सांघी व भाऊंच्या संबंधाची परंपरा पडली असावी’ असा उल्लेख आहे.

दुसरा मुद्दा भाऊंची इतरत्र कुठेही समाधी नसल्याने आज जर आपणास भाऊंच्या वीरमृत्यूला वंदन करावयाला जायचे म्हटले तर ह्याच स्थानी यायला पाहिजे. भाऊंचे हे एकमेव तत्कालीन समाधीस्मारक असल्याने याचे मोल खूप मोठे आहे.

समाधी स्थानाच्या इमारतीत

भाऊंची समाधी व शेजारी त्यांची मूर्ती बसविण्यात आली आहे.नाथपंथी परंपरेनुसार इथे धुनी आहे.रोज भाऊंच्या समाधीची यथाविधी पूजा होते.दर रविवारी येथे लंगर (प्रसादाचे जेवण) केला जातो.आम्हालाही दर्शन झाल्यावर आग्रहाने जेवण घालूनच महंतांनी निरोप दिला.धुनीतील राख पुड्यात बांधून घेऊन आम्ही तेथून निघालो.

बाहेर पडल्याबरोबर आधी देगलूरकर सरांना फोन करून भाऊंच्या समाधीचे दर्शन झाल्याचे सांगितले. सरांनी मनापासून कौतुक करून शाबासकी दिली.

मला राहून राहून एका बाबीचे आश्चर्य वाटत होते.१९७० साली रोहटकच्या गेझेटीयरमधे नोंद झालेली,हिंदीत माहितीपुस्तक लिहिली गेलेली,अनेकदा हिंदी वर्तमानपत्रांतून लेख आलेली भाऊंच्या समाधीची माहिती मराठीत कशी काय प्रकाशित झाली नाही. पेशव्यांपासून तर ही समाधी अनभिज्ञ राहिलीच पण ब्रिटिश राजवटीपासून मराठी इतिहासाचे संशोधन करणाऱ्या संशोधकांनादेखील ही माहिती अज्ञातच राहिलेली दिसते.

मराठ्यांच्या, पेशव्यांच्या आणि त्यातल्या त्यात पानिपतच्या इतिहासाचे अभ्यासक, संशोधक,व्याख्याते, लेखक,कादंबरीकार, नाटककार अजूनही या वीरांची शौर्यगाथा मांडतात पण अद्याप एकाही मराठी पुस्तकात मला भाऊंच्या समाधीचे छायाचित्र ,माहिती आढळलेली नाही.

panipat war 3 – पानिपतावर धारातीर्थी पडलेल्या मराठ्यांच्या नावांची यादी बखरींतून मिळते.या जवळपास १५० पानिपतवीरांच्या समाधीस्थळांकडे भाऊंच्या समाधीप्रमाणेच अद्यापही दुर्लक्ष झालेले आहे. (यातील काहींच्या समाधीस्थळांचे मी दर्शन घेतले आहे, पण त्यावर पुढे सविस्तर लिहीन.) पानिपतावर धारातीर्थी पडलेल्या लाखभर मराठ्यांपैकी केवळ इतकीच नावे आपल्याला पुस्तकांतून,याद्यांतून मिळतात. हे सर्व मराठे ज्यांच्या नेतृत्वाखाली लढले त्या सदाशिवभाऊंची ही सांघीमधील समाधी आपणा मराठी लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मराठ्यांच्या इतिहासातील, मध्ययुगीन भारतातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक प्राणहानी झालेली अशी ही पानिपतची लढाई होय.या लढाईतील मराठ्यांच्या सेनापतींच्या म्हणजेच भाऊंच्या या समाधीचे मोल खूप मोठे आहे.

हा दौरा आटोपून मी २४ डिसेंबर ला सांगलीत परतलो.भाऊंच्या या समाधीस्थळाची माहिती पानिपत लढाईच्या २५७ व्या स्मृतीदिनी १४ जानेवारी २०१८ रोजी वर्तमानपत्रात यावी या उद्देशाने आदल्या दिवशी १३ जानेवारीला सकाळी पत्रकार परिषद घेऊन छायाचित्रांसह सर्व माहिती पत्रकार बंधूंना दिली.योगायोग म्हणजे याच दिवशी संध्याकाळी बी.बी.सी.मराठी या डिजिटल वृत्तवाहिनीवर भाऊंच्या सिंघी येथील समाधीवर माहिती प्रसारीत झाली.माझा यावरील लेख १४ जानेवारीला प्रमुख वर्तमानपत्रांतून प्रकाशित झाला.मराठी छापील माध्यमात प्रकाशित झालेला, भाऊंच्या समाधीस्थळाची माहिती छायाचित्रांसह देणारा हा पहिला लेख आहे आणि याचे मला खूप समाधान वाटले.

नंतर ‘मराठ्यांची धारातीर्थे’ या माझ्या २०१९ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातून सदाशिवभाऊंची समाधी छायाचित्रांसह प्रथमच मराठी भाषेतील पुस्तकातून वाचकांसमोर आणण्याचे भाग्य मला लाभले.(२०१९ पूर्वी कोणत्याही मराठी पुस्तकात समाधीचे छायाचित्र सविस्तर माहितीसह छापलेले माझ्या पाहण्यात तरी नाही. कुणाला आढळले असेल तर जरूर कळवावे.ज्याचे श्रेय त्याला मिळावे ही भावना यामागे आहे. )

मराठीत आपण एखाद्या व्यक्तीने “माझ्यावर विश्वास ठेव.” म्हटले आणि आपल्याला विश्वास वाटत नसेल अथवा विश्वास ठेवायचाच नसेल तर आपण “विश्वास गेला पानिपतावर” असे चटकन म्हणून जातो.याचा संदर्भ आहे पानिपतावर वयाच्या केवळ अठराव्या वर्षी वीरमृत्यू आलेल्या विश्वासरावांच्या निधनाचा.हे विश्वासराव पानिपतावर गेले पण एका वेगळ्याच अर्थाने ही घटना बोलीभाषेत सामावली. पण मराठ्यांचा आपल्या ताकदीवरचा, पराक्रमावरचा विश्वास काही हरवला नव्हता हे पुढच्या १० वर्षातच पानिपतावरील पराभवाचा सव्याज बदला घेऊन महादजी शिंदेंनी सिध्द केले.

भाऊंच्या समाधीची ही सविस्तर माहिती दिल्यानंतर आता ‘सांघी गावात सदाशिवभाऊंची समाधी आहे’ यावर तुमचा विश्वास बसायला हरकत नसावी असे मला वाटते. पानिपत मोहिमेच्या या सेनापतींना, प्राण जाईतो लढून धारातीर्थी पडलेल्या या पानिपतवीराच्या वीरमृत्यूला,मराठा साम्राज्याच्या उत्कर्षात त्यांनी केलेल्या कामगिरीला वंदन करण्यासाठी आपल्याला सांघी गावातील त्यांची समाधी हे एकमेव ठिकाण आहे हे मात्र नक्की.आणि कुठल्याही मराठी वीराच्या समाधीला आपण वंदन करतो तेव्हा त्या व्यक्तीच्या चरित्रातून सिध्द झालेल्या कर्तबगारीला,त्यातून मिळणाऱ्या प्रेरणेला आणि त्याच्या वीरमृत्यूला आपण वंदन करीत असतो.”हीच समाधी खरी असेल का?” हा प्रश्न इथं दुय्यम ठरतो. समाधीच्या खरेखोटेपणाबद्दल वकीली पध्दतीचे वादविवाद करण्यापेक्षा त्या व्यक्तींच्या गुणगौरवाच्या शब्दस्मारकांबरोबरच जी जुनी, तत्कालीन,परंपरागत समाधीस्थळे आहेत ती मान्य करणे तसेच त्यांचा जीर्णोद्धार करणे आणि ज्यांची समाधीस्थळे नाहीत त्यांचीही नवीन स्मारके उचित ठिकाणी उभारणे हेच मराठ्यांच्या इतिहासाचा अभिमान बाळगणाऱ्यांचे खरे लक्षण आहे असे मला वाटते.

प्रवीण भोसले, सांगली

लेखक - मराठ्यांची धारातीर्थे

9422619791

Leave a Reply

error: Content is protected !!