Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORY

pawar family – नगरदेवळेकर पवार घराणे

1 Mins read

pawar family – नगरदेवळेकर पवार घराणे

 

 

pawar family – नगरदेवळेकर पवार घराणे

 

 

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात जळगाव ते चाळीसगाव या मध्य रेल्वेमार्गावर नगरदेवळा रेल्वे स्टेशन आहे. जळगाव पासून ७० कि.मी. अंतरावर तर चाळीसगावकडून ३५ कि.मी. अंतरावर असलेले नगरदेवळा हे गाव रेल्वे स्थानकापासून ५ कि.मी. अंतरावर आहे. अग्नावती नदीकाठी वसलेले देवळांचे नगर म्हणजे नगरदेवळा अशी या गावाच्या नावाची उत्पत्ती सांगणाऱ्या या गावात धार येथील पवार यांच्या वंशजांचा गढीवजा कोट आहे. मराठेशाहीच्या उत्तरकाळात पेशव्यांच्या वर्चस्वाखाली असलेल्या अनेक वतनदारांनी आपल्या वतनात भुईकोट व गढ्या बांधल्या. यातील बरेच भुईकोट वाडे हे खाजगी स्वरूपाचे असुन त्यांचा उपयोग महसूल जमा करण्यासाठी व स्वसंरक्षणसाठी होत होता. वतने खालसा झाल्याने खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने आज बहुतांशी गढी कोट उध्वस्त होत चालले आहेत. स्थानिकांची या वास्तुबाबत असलेली उदासीनता देखील या गढीकोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे.

आंतरजाल व इतर कोणत्याही पुस्तकात नगरदेवळा या गढीची माहिती सापडत नसल्याने या किल्लेवजा गढीची ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न. साधारण बारा एकरमध्ये पसरलेला नगरकोट त्याच्या आत तीन एकरात गढीवजा कोट व त्याच्या आत खासे पवार यांचा वाडा अशी या कोटाची रचना आहे. बारा एकरात पसरलेला हा नगरदुर्ग आज पुर्णपणे नष्ट झाला असुन त्याच्या तटबंदीत असलेल्या पाच बुरुजापैकी केवळ एक फत्ते बुरुज आज शिल्लक आहे. फत्ते बुरुजाशेजारी गावाच्या वेशीचा दरवाजा आजही शिल्लक असुन हा दरवाजा फत्ते दरवाजा म्हणुन ओळखला जातो.

या दरवाजाशिवाय या नगरदुर्गाला गणेश दरवाजा,गाळण दरवाजा व भडगाव दरवाजा असे तीन वेगवेगळे दरवाजे होते. या नगरदुर्गाच्या आत असलेल्या गढीची तटबंदी आजही काही प्रमाणात शिल्लक असुन उर्वरित तटबंदी गढीच्या आत असलेल्या वस्तीने गिळंकृत केली आहे. गढीच्या तटबंदीत चार टोकाला चार बुरुज व गढी अंतर्गत टेहळणी अथवा झेंडा बुरुज असे एकंदरीत पाच बुरुज असुन या गढीचे आज केवळ मारुती बुरुज व झेंडा बुरुज असे दोनच बुरुज शिल्लक आहेत.
गढीची तटबंदी साधारण १५ फुट उंच असुन तटाबुरुजाचा खालील भाग काळ्या दगडात तर वरील चर्या विटांनी बांधल्या आहेत. गढीचा पुर्वाभिमुख मुख्य दरवाजा आजही शिल्लक असुन या दरवाजाच्या वरील बाजूस नगारखाना तर आतील बाजुस घोड्याच्या पागा पहायला मिळतात.

दरवाजाच्या आतील बाजुने तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर मुख्य वाडयाकडे जाताना वाटेच्या डाव्या बाजुस चौथऱ्यावर बांधलेली काही जुनी घरे आहेत. या घरांच्या दगडी चौथऱ्यावर काही झीज झालेली शिल्प तसेच कोरलेली नक्षी पहायला मिळते. घरांच्या रांगेत पुढे एक भली मोठी विहीर असुन या विहिरीचे पाणी आजही वापरात आहे.

येथुन पुढे आपण गढीतील मुख्य वाडयाकडे येतो. वाडयाला स्वतंत्र अशी तटबंदी असुन या तटबंदीला कमानवजा दरवाजा आहे. या दरवाजाच्या अलीकडे उजवीकडील वाट झेंडा बुरुजाकडे जाते. झेंडा बुरुजाची उंची ३५ फुट असुन बुरुजावर जाण्यासाठी आतील बाजुने गोलाकार पायऱ्या आहेत. बुरुजावर एक खोली असुन ध्वजस्तंभ आहे. या ध्वजस्तंभाला बळी देण्याची प्रथा होती पण २०१२ पासुन हि प्रथा बंद झाली आहे. बुरुजावर सज्जा बांधलेला असुन गढीमधील हे सर्वात उंच ठिकाण आहे. येथुन गढीचा अंतर्गत परीसर, नगरदेवळा शहर व दूरपर्यंतचा प्रदेश दिसतो.

बुरुज पाहुन झाल्यानंतर कमानवजा दरवाजातुन आपण राजे पवार यांच्या चौसोपी वाड्यासमोर येतो. दुमजली असलेला हा वाडा सध्या विद्यार्थ्यांचे वसतीगृह असुन त्या अनुषंगाने त्यात बदल करण्यात आले आहेत. वाड्याच्या लाकडावर सुबक आणि रेखीव अशा मुर्ती कोरलेल्या असुन दरवाजाची द्वारपट्टी पूर्णपणे लाकडात कोरलेली आहे. वाडयाच्या आवारात एक विरगळ तसेच प्राचीन मंदिराचा मुर्ती कोरलेला अवशेष उघडयावर पडलेला आहे. या शिवाय वाडयाच्या आवारात एक कबर असुन आरसे महाल,सदर,पागा इत्यादी उध्वस्त झालेल्या वास्तुंची जोती पहायला मिळतात. या उध्वस्त वास्तुंचे तळखडे आजही तेथे पडलेले आहेत. यातील सदरेखालील तळघर भुयारी मार्गाने आरसे महाला खाली असलेल्या तळघराशी जोडलेले आहे. या तळघरातुन कधीकाळी गढीबाहेर पडण्याचा मार्ग होता पण सध्या तो बंद झाला आहे.

नगरदेवळाचे संस्थानिक pawar family कै . श्रीमंत बाळासाहेब पवार यांनी त्यांच्या तलवारी, कट्यारी, खंजीर, गंजिफा, भांडी, नाणी, अशा अनेक वस्तु उत्तर महाराष्ट्र विदयापीठाला दिल्या तिथे पुरातत्त्व लेखाभिगा संग्रहालय निर्माण करण्यात आले आहे. त्यात विष्णुचे दशावतार कोरलेली एक दुर्मिळ तरवार आहे. याशिवाय गावाजवळ असलेल्या छत्रीबाग परिसरात पवार घराण्यातील काही व्यक्तींच्या समाधी पहायला मिळतात.

मध्यभारतातील प्राचीन धारानगरी म्हणजेच आजचे धार हे परमार राजवंशाच्या काळात एक संपन्न नगर म्हणुन प्रसिद्ध होते. धारच्या या परमार राजवंशात राजा भोज सारखा पराक्रमी सम्राट होऊन गेला. माळवा प्रांतात असलेले परमार घराण्याचे राज्य इ.स.१३०५ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर लयास गेल्यावर धारच्या परमार घराण्याचे वंशज निरनिराळ्या प्रांतात जाऊन स्थायिक झाले. त्यातील एक शाखा महाराष्ट्रात आली व पवार म्हणुन उदयास पावली.
प्राचीन राजधानी धार येथून आल्यामुळे हे घराणे धार पवार म्हणून इतिहासात प्रसिद्धिस आले. साबुसिंग पवार हे या पवार घराण्यातील मूळ पुरुष म्हणुन ओळखले जातात. साबुसिंग पवार यांनी घोडेस्वार व पायदळ बाळगुन अहमदनगर जवळ हंगे गावाच्या रानात आपले ठाणे बनविले. इ.स.१६५८ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याणवर स्वारी केली त्यावेळी साबुसिंग महाराजांसोबत होते. पुढे त्यांनी अहमदनगर सुभ्यात सुपे गाव वसविले व या गावची पाटीलकी मिळवली. साबुसिंग यांना कृष्णाजी नावाचा पुत्र होता. महाराजांनी विजापूरकरांच्या मुलखावर केलेल्या स्वाऱ्यात कृष्णाजी पवार सामील होते. अफझल खानच्या वधानंतर त्याचा मुलगा फाजलखान ह्याच्याबरोबर झालेल्या झटापटीत कृष्णाजी पवार यांचे नाव पुढे येते. कृष्णाजी पवारांच्या कामगिरीवर महाराजांनी त्यांना कणगी व करणगाव इनाम दिले.

कृष्णाजी पवारांच्या मृत्युनंतर त्यांचे तीन पुत्र बुबाजी, रायाजी व केरोजी शिवाजी महाराजांच्या सेनेत सामील झाले. संभाजी महाराजांच्या निर्घृण हत्येनंतर मराठेशाहीवर कोसळलेल्या संकटात ज्या मराठा सरदारांनी मोगलांशी झुंज दिली त्यात या पवार बंधुंचे नाव दिसुन येते. राजाराम महाराजांनी टाकलेल्या विश्वासामुळे बुबाजी व केरोजी यांच्या फौजानी मोगलांच्या वऱ्हाड आणि गंगाथडी मुलखात घौडदौड करून चौथाई वसुल करत मोगल फौजेस हैराण करून सोडले व मराठ्यांचा दरारा वाढवला.

इ.स. १६९४ मध्ये सेनापती संताजी घोरपडे मोंगलाची रसद लुटताना मोंगल सरदार हिम्मतखान याने घेरले असता बुवाजी पवार यांनी आपल्या फौजेसह हि कोंडी फोडत संताजी घोरपडे यांची सुटका केली. या कामगिरीमुळे राजाराम महाराजानी जिंजीहून महाराष्ट्रात परत आल्यावर बुबाजीस विश्वासराव हा किताब व सरंजाम तर केरोजीस सेनाबारासहस्त्री हि पदवी व वस्त्रे दिली. इ.स.१६९९ मध्ये खानदेश मोहिमेवर असता मोगलांनी बुबाजीस जिवंत पकडुन आशिरगडावर भिंतीत चिणुन ठार मारले.

या तिन्ही भावांची घराणी सुप्यात असलेले बुबाजीचे मोठे pawar family पवार घराणे विश्वासराव रायाजी यांचे वाघाळे तर केरोजी यांचे नगरदेवळे ह्या नावाने प्रसिद्धीस आली. इ.स. १७०३ पासून मराठ्यांनी खानदेश व माळवा येथे स्वाऱ्या करत चौथाई व सरदेशमुखीचे हक्क मिळवत मराठयांचा दरारा बसवला यातील प्रमुख सरदारात बुवाजी पुत्र काळोजी व संभाजी विश्वासराव व तसेच केरोजी पुत्र धीराजी,रायजी पुत्र मलोजी पवार ह्यांच्या कर्तुत्वाचा विशेष उलेख होतो. काळोजींचे पुत्र तुकोजीराव, कृष्णराव, जिवाजी व मानाजी यांनी पहिल्या बाजीराव पेशव्यांसोबत उत्तरेतील मोहिमात पराक्रम गाजवून देवास येथे आपले ठाणे वसवले.

संभाजी पवार यांचे पुत्र उदाजीराव, आनंदराव, व जगदेवराव यांनी मध्य भारतात मराठ्यांचे वर्चस्व गाजवत धार हे पवारांचे प्रमुख ठाणे म्हणुन प्रस्थापित केले. अशा प्रकारे पवारांच्या प्राचीन राजधानीचे ठिकाण त्यांच्याच वंशजांनी पुढे ४०० वर्षानंतर आपल्या पराक्रमामुळे मिळविले.
खानदेशातील जळगाव जिल्ह्यात नगरदेवळा येथे केरोजी पवार घराण्याच्या एका शाखेला जहागिरी मिळाल्यामुळे तेथे व आसपासच्या प्रदेशात पवार घराण्याचा विस्तार झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर संस्थाने खालसा होईपर्यंत नगरदेवळा संस्थान पवार घराण्याच्या अंमलाखाली होते. आजही नगरदेवळा येथे पवार राजघराणे वास्तव्य करून आहे.

 

 

 

नगरदेवळे

( माहिती आणि संकलन संजीव बावस्कर, शब्दांकन - सुरेश निंबाळकर )

Leave a Reply

error: Content is protected !!