मोराने बंद पाडली रेल्वेची वाहतूक
मोराने बंद पाडली रेल्वेची वाहतूक
मोराने बंद पाडली रेल्वेची वाहतूक

मोराने बंद पाडली रेल्वेची वाहतूक

समीर मणियार

मोराने बंद पाडली रेल्वेची वाहतूक

समीर मणियार

 

 

4/6/2021,

करोना साथरोगाच्या काळात सामान्य प्रवाशांना उपनगरी लोकल अथवा मुंबईकडे येजा करणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करता येत नाही. परवा सोमवारी पश्चिम रेल्वेच्या वैतरणा सफाळे स्टेशनच्या दरम्यान दोन्ही वैतरणा खाडीच्या मध्यभागी वालीव समोर एका अजस्त्र मालगाडीच्या इंजिनच्या पेंटाग्राफमध्ये पक्षी अडकल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सकाळी सुमारे दीड तास बंद पडली होती. मुंबईवरुन सुरतकडे जाणाऱ्या डाऊन मार्गिकेवरील कोनराज एक्सप्रेस मालगाडीच्या इंजिनच्या पेंटाग्राफमध्ये हा पक्षी अचानक अडकल्यामुळे मालगाडीचा इंजिनचा पेंटाग्राफ आणि विद्युत वाहिनी यांच्यातील घर्षणात अडचण निर्माण झाली. ती मालगाडी एकाच ठिकाणी थांबून राहिली.

एक पक्षी रेल्वेची मालगाडी रोखून धरतो ही गोष्ट मनाला मान्य होण्यासारखी नव्हती. नेमके काय झाले असेल. तो कोणता पक्षी असेल. एखाद्या पक्ष्यांमध्ये मालगाडी रोखण्याची ताकद असू शकते काय अशा अनेक प्रश्नांची मांदियाळी ही वन्यजीव सृष्टीबाबत संवेदनशील असलेल्या मनात घर करु लागली. या घटनेची बातमी मुंबईतील एका मराठी दैनिकाने दिली होती. तो पक्षी कोणता. त्याच्या नावाचा उल्लेख बातमीत नव्हता. यामुळे त्या पक्ष्याविषयी उत्सुकता वाढली. ३१ मे २०२१ ची ही घटना काय असेल याचे विचारचक्र सुरु झाले. रेल्वेचे सेवानिवृत्त अधिकारी सुधाकर राऊत आणि या भागातील फॉरेस्ट डिपार्टमेंटचा नव्याने चार्ज घेतलेल्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर नम्रता हिरे यांनी विनंती केली. नेमका काय प्रकार घडला असावा. अर्थात त्यात शासकीय विभागाची चूक नसून तो निव्वळ अपघातच आहे.

मला उपलब्ध झालेली माहिती धक्कादायक होती. तो पक्षी म्हणजे आपल्या सर्वांचा आवडता राष्ट्रीय पक्षी मोर होता. या अपघातात ठार झालेली पक्षिणी ही श्रीमती मोर म्हणजे लांडोर होती. वैतरणा ते सफाळे स्टेशन दरम्यान मालगाडीच्या इंजिनच्या वरच्या ओव्हरहेड वायरशी संपर्क आल्यामुळे अंदाजे दीड ते दोन वर्षे वयाच्या मोर पक्षी अर्थातच मादी लांडोर यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. मोर भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. त्यात सौभाग्यवती मोर म्हणजे लांडोर यांचा भल्या सकाळी विजेचा शॉक लागून अपघाती मृत्यू हे मन हेलावून टाकणारी घटना होती. यामुळे सोमवारी ३१ मे २०२१ रोजी सकाळी ०७ वाजून २० मिनिटांच्या पुढे सव्वा ते दीड तास पश्चिम रेल्वेच्या मुंबई ते अहमदाबाद दरम्यान दोन्ही मार्गांची वाहतूक पूर्णपणे बंद पडली होती.

राष्ट्रीय पक्षी मोराचा अपघाती मृत्यू झाल्याची खबर फॉरेस्ट डिपार्टमेंटला द्यावी लागली. फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृत मोराची मादी लांडोर यांचे कलेवर, शव ताब्यात घेऊन, त्या मृतदेहाची कायदेशीर विल्हेवाट लावण्यात आली.

रेल्वे प्रशासन, फॉरेस्ट डिपार्टमेंटने घटनेचे गांभीर्य घेतलेले होते. ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी इलेक्ट्रीक टॉवर वॅगन घटनास्थळी सफाळेकडून रवाना झाली. सकाळी ०७ वाजून २० मिनिटे ते ०७ वाजून ५० मिनिटे असा अर्धा तास रेल्वेमार्गावरील वीज पुरवठा बंद करावा लागाला होता. बिचारी लांडोर ही आकाश विहार करण्यात माहीर नसते. मोराच्या प्रेमापोटी ती सफाळे परिसरातील घनदाट जंगलातूत उडाली. ती रेल्वे अपघातात सापडली. दिवंगत श्रीमती मोर उर्फ लांडोर यांच्या मृत आत्म्यास शांती लाभो अशी निसर्गाकडे विनम्र प्रार्थना.

या घटनेचे दुख आहे. तथापि, सफाळे, पारगाव, ढेकाळे, तांदुळवाडी, घाटीम, वालीव या भागात मोर हा वास्तव्यास आला आहे. याचाही आनंदच आहे. पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यात मोर आहेत. ज्येष्ठ सनदी अधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी मोराचे जतन, संवर्धन करण्यात मोठी भूमिका बजावली आहे. पुणे जिल्ह्यात शिरुरजवळ मोराची चिंचोली या गावाच्या विकासात त्यांचा मोठा वाटा आहे. मोराची चिंचोली या गावात अडीच हजारांपेक्षा अधिक मोर आहेत. अहमदनगर, बीड जिल्ह्यातही मोराचे वास्तव्य आहे. लहानपणी लोणी व्यंकनाथ, आढळगावच्या परिसरात मयुर दर्शन घडलेले होते. मोर हा भारताच्या संस्कृतीचा मोठा घटक आहे. पालघर जिल्ह्यात गर्द वनराजीत, नदीकिनारी तो वास्तव्यास आला आहे. त्या मोरांचे जतन, संवर्धन करणे हे पालघर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. वनखात्याला आपण याकामी प्रामाणिक मदत, सहकातर्य केले पाहिजे.

अभिजात सौंदर्याचे मूर्तिमंत उदाहरण, भारतीय संस्कृतीचे प्रतिक, अखिल सजीवसृष्टीच्या कल्याणासाठी पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वरीतील चार अध्यायात मोराचा आवर्जून उल्लेख आहे. महाभारतातील आदर्श व्यक्तीमत्व भगवान श्रीकृष्ण हे आपल्या मुकुटावर नेहमी मोरपंख धारण करीत असत. मोर हे सरस्वतीचे वाहन आहे. महाकवी कालीदास यांच्या मेघदूत या महाकाव्यात मोराची महती मोठी आहे. सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या राजवटीतील नाण्यांवर मोराचे प्रतिमा आहे. मुगल बादशहा शहाजहान यांचे तख्तची रचना मोरासारखी आहे. पैठणी या महावस्त्रावरही मोराची प्रतिमा विराजमान असते. प्रत्येक पवित्र ठिकाणी मोरांच्या मोरपिसांचे वास्तव्य असते.

भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मोराची निवड करण्यात आली. मोराला हा बहुमान २६ जानेवारी १९६३ साली मिळाला तामीळनाडूतील उटकमंडच्या नॅशनल बर्ड सिलेक्शन मंडळाच्या १९६० साली बैठक झाली. हंस, सारस, ब्राह्मणी बदक या पक्षांच्या नावाचाही राष्ट्रीय पक्षी स्पर्धेसाठी नावे होती. अखेर बाजी मारली मोरानेच. जंगलमे मोर नाचा किसने देखा असे आपल्याला यापुढे म्हणता येणार नाही. मोर हा नजाकतीचा पक्षी आपल्या भागात यजमान म्हणून आला आहे.

मोराचा विणीचा हंगाम जानेवारी ते आक्टोबर का काळात असतो. लांडोर एकावेळी तीन ते पाच अंडी घालते. मोर केकारव करून लांडोरीना आकर्षिक करतात त्यासाठी पिसारा फुलवून नृत्यही करतात. मोर हे सुंदरता, सभ्यतेचे प्रतिक मानले जाते. त्याच्या पंखांचा वापर मुकुट, सिंहासने, शाईने मजकूर लिहिण्यासाठी होत आहे. श्रीकृष्णाच्या डोक्यावरही मोरपीस विराजमान असून, गणेशाचा भाऊ कार्तिकेयाचेही मोर वाहन आहे. मोर हा मूळचा अस्सल भारतीय आहे.

मोर हा बहुभक्षी आहे. तो साप, पाली किडे आणि वेळप्रसंगी धान्यही खातो. खुली मैदाने, दऱ्याखोऱ्यात मोर राहतात. मोर उडतात कमी पण निवाऱ्यासाठी रात्री झाडावरच झोपत असतात. सिंह अथवा अन्य प्राणी शिकारीसाठी बाहेर पडले तर जोरजोरात ओरडून मोर अन्य प्राण्यांना जागे करतो. मोराचा नाच हा नयनमनोहर सोहळा असतो. पावसाळ्यात या नाचाला बहर येतो. मोराच्या शिकारीवर भारतात १९७२च्या वन्यजीव कायद्यानुसार बंदी आहे. मोराचे संदर्भ प्राचीन काळापासून सापडतात. सम्राट अशोक, मौर्य राजांच्या नाण्यांवर मोर कोरलेले आढळतात. मुगल बादशहा शहाजहान मयुर सिंहासनावर बसत असे. त्यास तख्त ए ताऊस नाव होते. ताऊस या अरबी शब्दाचा अर्थ आहे मोर.. मोर हा मूळचा दक्षिण आशियाचा. जगात अनेक ठिकाणी त्याचा प्रसार आहे.

मोर नर आकाराने मोठा. चोचीपासून शेपटीपर्यंतची लांबी १०० ते ११५ सेंमी. चार ते सहा किलोच्या आसपास वजन असते. लांडोरीची लांबी सुमारे ९५ सेंमी असते. लांडोरीचे वजन पावणेतीन ते चार किलो असते. नराचे डोके निळे असून त्यावर पंख्याच्या आकाराचा तुरा असतो. मानेवर गडद निळ्या रंगाची पिसे आणि पाठीवर खवल्याच्या आकाराची बिरंजी हिरव्या रंगाची पिसे असतात. पाठीवरच्या पिसांवर फिकट करडे ठिपके असतात. नराला शेपटीभोवती पिसारा असतो. त्याच्या शेपटीला झाकणारी पिसे लांब असून त्यांपासून तयार झालेला पिसारा ९०–१२० सेंमी. लांबीचा असतो.

त्यात २०० च्या सुमारास पिसे असतात. हिरवा रंगाच्या पिसाऱ्‍यातील पिसांच्या रचनेमुळे मोर अधिक आकर्षक, देखणा दिसतो. बहुतेक पिसांच्या टोकावर डोळा असून त्याच्या मध्यभागी जांभळट काळ्या रंगाचा हृदयाकृती मोठा ठिपका असतो. लांडोरीला पिसारा नसतो. शेपटी दाट तपकिरी. तिचा खालचा भाग तकतकीत हिरवा असतो. मोराचे पाय बळकट असतात. मोरांचे वास्तव्य दाट झुडपांमध्ये, नदी, ओढा किनाऱ्‍याला असते. ते समूहाने राहतात. वावरतात. मनुष्य वस्तीच्या आसपास राहतात. दिवसभर खाद्य शोधत फिरून रात्री एखाद्या मोठ्या झाडावर विसावतात. जमिनीवर पडलेली फळे, धान्ये, साप, उंदीर, सरडे, कीटक आदी त्यांचे अन्न आहे.

मोर एकापेक्षा अधिक जोडीदारांसोबत राहतो. एका मोराबरोबर बहुधा दोन-तीन लांडोरी असतात. प्रणयाराधनेप्रसंगी मोर पिसारा ताठ करून एखाद्या पंख्याप्रमाणे तो पसरून, पुढेमागे हालवीत, पिसारा थरथरवीत लांडोरीसमोर नाचतो. ठुमकत चालतो. मादीला आकर्षित करतो. मिलन काळानंतर मोराच्या शेपटीवरची पिसे गळून पडतात. मोराचा नाचण्याचा कालावधी, पिसांची संख्या यानुसार लांडोर मोराची निवड करते. लांडोर एका वेळी तीन पाच अंडी जमिनीवर घालते. फक्त मादी अंडी उबविते. २८ दिवसांनी अंड्यातून पिलू बाहेर येते.

लांडोरीच्या गर्भधारणेविषयी काही आख्यायिका आहे. राजस्थान उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तीने तर मोरांच्या खाजगी आयुष्याविषयी वादंग निर्माण करणारी वक्तव्ये केली होती. मोर रतीक्रिडा करीत नाही. परंतु तो जेव्हा आंनदविभोर होऊन नाचू लागतो. त्यावेळी मोराच्या डोळ्यातून आनंदाश्रू सारखे गळत असतात. मोराचे ते अश्रू पिल्यावर लांडोर गर्भवती होती. जमिनीवरील अश्रू टिपल्यामुळे लांडोरीला मादी पिल्ले तर अधांतरी टिपलेल्या आसवांमुळे तिला नर पिल्ले होतात ही आख्यायिका खोटी आहे. मोर लांडोर हे समागम करतात असे अनेक पक्षीतज्ञांनी अभ्यासाअंती मांडले आहे. प्रसिद्ध वन्यजीवसृष्टी अभ्यासक आणि पक्षीतज्ञ मारुती चितमपल्ली यांचेही तेच मत आहे.

मोर कधी म्याऊ म्याऊ करीत ओरडत असे. कधी तो आवाज मै हू. मै. हू सारखा वाटतो. कधी पिआ आओ, पिआ आओ म्हणून लांडोरीला साद घालतो. मोर असे नाना आवाज काढतो, असे निरीक्षण मारुती चितमपल्ली यांचे आहे. आपल्या पालघर जिल्ह्यातील घनदाट वृक्षराजी, खाडी, नदीकिनारी देवभूमीतील राष्ट्रीय पक्षी वास्तव्यास आला आहे. वन खात्याच्या हातात हात मिळवून आपण मोर लांडोर यांचे संरक्षण करुया. मोराचे केकारव गुंजत राहायला हवे.

समीर मणियार,

विश्वकोष, मारुती चितमपल्ली यांची ग्रंथसंपदा, मयुर वन्यजीव प्रेमी, वनखात्यातील अधिकाऱ्यांच्या माहितीचा साभार संदर्भ घेतला आहे.

More Stories
www.postboxindia.com
मा.कै.वसंतदादा पाटील यांना स्मृतिदिना निमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा
error: Content is protected !!