Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORYINDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Rajshri Shahu Maharaj – कोल्हापूर राजश्री शाहू महाराज

1 Mins read

Rajshri Shahu Maharaj – कोल्हापूर राजश्री शाहू महाराज

 

Rajshri Shahu Maharaj

 

7/7/2021

वैशाख महिन्याचे दिवस.भर दुपारची वेळ. रणरणतं उन्ह. कोल्हापूर शहराच्या बाजूलाच एका शिवारांतून एक बाई लगबगीने चालली होती.

डोक्यावर टोपली. टोपलीत नव-यासाठीं जेवण आणि पाण्याने भरलेला तांब्या होता. चालता,चालता, मध्येंच गच्च झाडी असलेली पायवाट लागली.

वाट नेहमीचीच. पण कां कोणास ठाऊक. पण या ठिकाणी येताच तिला नेहमीच भिती वाटायची. अचानक कोणी समोर आला तर? कांहीं अतिप्रसंग केला तर ?

ओरडलो तरी मदतीला कोणी पोचणार नाही अशी ती जागा.

आजही तोच विचार तिच्या मनात आला. पण नेहमीप्रमाणे तिने तो झटकून टाकला.पावलं लगबगीने पडायला लागली.

एवढ्यात तिला घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. बाई मनातून बरीच घाबरली. टापांचा आवाज जवळ ऐकायला यायला लागला.

बाई आणखीनच घाबरली. एवढ्यात तो रुबाबदार घोडेस्वार तिच्या समोर उभा ठाकला.

बाईंची भितीने गाळणच उडाली. दरदरून घाम फुटला.तशी बाई धीटच होती. घोडेस्वाराने विचारले, “काय ग, कूठें चाललीस ?”

“धन्याला जेवण घेऊन चाललीया,” बाईने उत्तर दिले. “कोठे आहे धनी तुझा ?” घोडेस्वाराने परत प्रश्र्न विचारला. “पलीकडच्या शेतामध्ये काम करतुया.

“बाई उत्तरली. “असं का. कोणाचं शेत ? तुमचं की दुस-याच्या शेतात ? ” बाई आतापर्यंत बरीच सावरली होती. म्हणाली, “आर माझ्या भावा, आमी गरीब मानसं.

आमचं कूठून आलंय शेत.” बाई मोठी हिकमती होती. भावा असं म्हणून तिने स्वत:च्या रक्षणाचे एक हत्यार बाहेर काढले होते. “बरं, आज जेवणांला काय आहे ?

” घोडेस्वाराने विचारले. बाईंची भीड आता बरीच चेपली होती. ती म्हणाली, “अहो, आमी गरीब मानसं. आमचं ते जेवन काय असणार.

आंबोळ्या आनी चटनीचा गोळा.” ” मला खायला देशील का ?” घोडेस्वाराने विचारले. “आर, माझ्या भावा, खावा की .” बाई म्हणाली.

बाईने जेवणाची टोपली खाली ठेवली. घोडेस्वार घोड्यावरून खाली उतरला आणि खाली जमिनीवर मांड ठोकून बसला.

बाईने टोपलीतल्या आंबोळ्या, त्यावर लसणीचा लाल लाल गोळा आणि पाण्यानं भरलेला तांब्या घोडेस्वाराच्या समोर ठेवला.

घोडेस्वाराने खायला सुरुवात केली. खातां, खातां घोडेस्वाराने तिला विचारले, “अग, तूं या आंबोळ्याना कशी काय भोकं पाडतीस ?

सुईने की काय ?” त्याबरोबर बाई मोठमोठ्याने हसली व म्हणाली, “आर माज्या भावा, यडा की खुळा र तू ?” आतापर्यंत तीची भिती पळून गेली होती.

बाईने घोडेस्वाराला आंबोळ्या कश्या करतात ते सविस्तरपणे सांगितले. आदल्या दिवशी तांदूळ कसे फुगत घालावे लागतात,

मग दुसऱ्या दिवशी ते पाट्यावर कसे वाटतात, मग तापलेल्या तव्यावर कसे भाजतात, तापलेल्या तव्यावर पाणी वाळल्यानंतर तिथं भोकं तयार होतात.

“आसं होय.” असं म्हणून तो घोडेस्वार खळाळून हसला. बाईपण खळाळून हसली. घोडेस्वाराने चटणी बरोबर आंबोळ्या खाल्ल्या.

त्यावर पाणी प्याला व त्या बाईला विचारले, “अग, आता तुझ्या नव-याला जेवण ?” ” त्याची काळजी तुम्हाला नग. आता मी घरला जाईन.

परत आंबोळ्या आनी चटनी करून नव-याला नेईन.” बाई म्हणाली. घोडेस्वार घोड्यावर स्वार झाला आणि निघून गेला.

बाई परत घरी आली. परत आंबोळ्या केल्या. लाल तिखट चटणी केली. पाण्याचा तांब्या भरला. सगळं पाटलींत ठेवले आणि परत नव-याकडे यायला निघाली.

इकडे नवरा ठरल्या वेळेत बायको आली नाही याची काळजी करत होता. एवढ्यात त्याला दूरवरून येणारी बायको दिसली आणि जीवाला बरं वाटलं.

बाई आली आणि तिने टोपली खाली ठेवली. नव-याने विचारले,” अग, एव्हढा उशीर कां झाला ?”

मग बायकोने सगळं सविस्तर सांगितले. त्या आडवळणाच्या जागीं तो रुबाबदार घोडेस्वार कसा आला, त्याला भावा कसं म्हटलं,

आंबोळ्या खाताना छिद्रांची हकिकत सांगितली आणि आपण त्याला यडा की खुळा म्हणून छिद्रे कशी होतात ते सांगितले.

यावर दोघेही नवरा- बायको भरभरून हसली. नव-याने जेवण केले आणि तांब्यातले पाणी घटा-घटा प्यायला.

दोघांनी संध्याकाळपर्यंत शेतात काम केले व सूर्य अस्ताला जाण्याच्यावेळीं घरी परतली.

दोघं नवरा-बायको घराकडे पोंचली. पहातो तो काय ? दोन सैनिक घराकडे उभे होते. नवरा-बायको दोघेही घाबरली, एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहीली.

दोघांपैकी एक सैनिक म्हणाला,” उद्यां सकाळी दहा वाजता तुम्हां दोघानाबी कोल्हापूरच्या दरबारात हजर व्हायला हवं.

” निरोप देऊन दोघेही सैनिक परतले.

इकडे दोघं नवरा-बायको भयभीत होऊन एकमेकांवर काही तरी वंगाळ काम केल्याचा संशय घ्यायला लागली. मन था-यावर नव्हतं.

रात्रीच्या जेवणाकडे दोघांचं लक्ष नव्हतं. कसेतरी दोन घास घशाखाली घातले आणि दोघंजण अंथरुणावर पडलीं पण झोप लागत नव्हती.

या कुशीवरून त्या कुशीवर वळत रात्र काढली.

दुसऱ्या दिवशी नेहमीपेक्षा लवकरच पहाटे दोघं जणं उठलीं. नव-याने गाईचं दूध काढणे, गुरांना रानांत सोडणे, दुधाचा रतीब टाकणं, ही कामं केली.

बायकोने शेण भरून गोठा साफ करणे, घरांतील इतर सगळीं काम आटोपली. दोघं नवरा-बायको कोल्हापूरच्या दरबारात जायला निघाली.

मनात धाकधूक होतीच. काय चूक झाली असेल आपणाकडून. कशाला बोलावले असेल दरबारात. हेच प्रश्र्न दोघांच्याही मनात येत होते.

अर्धा- पाऊण तास पायपीट केल्यावर दोघेही कोल्हापूरला राजवाड्यात पोंचली. त्यांना दरबारात नेण्यांत आले. दरबारात प्रचंड गर्दी होती.

लोक अनेक तक्रारी घेऊन शाहू महाराजांकडे आले होते. जसजशी गर्दी कमी होत होती, तसतशी नवरा-बायको घाबरलेल्या अवस्थेत पूढे पूढे जात होती.

गर्दी बरीचकमी झाली. संपूर्ण दरबार आता दिसत होता. एवढ्यात शेतकऱ्याच्या बायकोचे लक्ष सिंहासनाकडे गेले आणि आश्चर्याने ती नव-याला म्हणाली,”

अहो, ह्योच तो कालचा रुबाबदार घोडेस्वार.” नवरा म्हणाला, ” अग, ह्यो तर आमचे शाहू महाराज.” बायको आता आणखीनच घाबरली व म्हणाली,

” आरं म्हाज्या देवा, म्हणजे कालचा तो घोडेस्वार म्हणजे साक्षात शाहू महाराज व्हते. महाराजांना मी काय काय म्हटलं ?

भावा म्हटलं, यडा की खुळा म्हटलं.” बाई आता भितीने थरथर कापायला लागली. नवरा म्हणाला, “म्हाराज काय शिक्षा देतात ती मुकाट्याने भोगायची आता.”

थोड्या वेळात ही नवरा-बायको थरथर कापत शाहू महाराजांच्या पायांवर घालून घेणार एवढ्यात शाहू महाराजांनी आपला हात पुढे केला

आणि म्हणाले,” दिवाणजी, या माझ्या बहिणीची साडी-चोळीने ओटी भरण्याची व्यवस्था करा आणि या माझ्या बहिणीच्या नव-याला त्या शिवारात सहा एकर जमीन वतन द्या.”

दोघांही नवरा-बायकोच्या डोळ्यातून अश्रुंच्या धारा वहात होत्या. दोघंही आदरयुक्त भावनेने शाहू महाराजांच्या समोर नतमस्तक झालीं.

भितीची जागा आता आदराने घेतली होती. शेतकऱ्याच्या बायकोची साडी-चोळीने ओटी भरण्यात आली आणि तिच्या नवऱ्याला सहा एकर वतनाचा कागद देण्यात आला.

भरलेल्या अंत: करणाने आणि सद्गतीत मनाने दोघेही नवरा-बायको घरी परतली. वतन दिलेल्या त्या शेताला आजही आंबोळीचं शेत ह्याच नावाने ओळखतात.

Rajshri Shahu Maharaj

शब्दांकन:
प्रा. पांडुरंग रावजी नाडकर्णी

Leave a Reply

error: Content is protected !!