Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

BLOGSINDIAMAHARASHTRANewsPostbox MarathiSANSKRITISANSKRITI DHARA

जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी – १

1 Mins read
  • आरती घुले

जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी – १

आरती घुले

हसतमुख, प्रेमळ, सर्वसामान्य महिलांना बरोबर घेऊन जाणाऱ्या, महिला संघ महाराष्ट्रच्या माध्यमातून महिलांचा आर्थिक व सामाजिक विकास कसा होईल हे सतत पाहाणाऱ्या तसेच व्हिजन नर्सरी स्कूलच्या माध्यमातून मुलांचा बौध्दिक विकास कसा होईल याचा ध्यास घेऊन गेली २२ वर्ष कार्यरत असलेल्या आरतीताई आज अनेकांच्या गळ्यातील ताईत बनल्या आहेत.
आज त्या व्हिजन नर्सरी स्कूलच्या प्राचार्य, स्मॅाल वंडर स्कूलच्या संस्थापक, लीलावती कॅालेज ॲाफ कॅामर्स ॲन्ड कॅाम्प्युटर स्टडीजच्या संचालक, कृष्णा एज्युकेशन फाउंडेशनच्या सचिव व महिला संघ महाराष्ट्रच्या प्रदेश अध्यक्षपदी कार्यरत आहेत.

आरतीताईंचा जन्म सातारा येथे एका मुस्लीम कुटुंबात झाला. त्यांचे वडील Navy मधे विक्रांत शिपवर कामाला होते त्यांनी एआरडीई डिफेन्स येथे डॉ. अब्दुल कलाम यांचेबरोबर काम केलं आहे. हे ते अभिमानाने सांगतात.आई कराड येथील मराठा कुटुंबातील, ती शिक्षिका होती. त्यांना ५ बहिणी व सर्व उच्चशिक्षित. ताईंचे वडील साताऱ्यातील भोसले कुटुंबात वाढले त्यांचे वडील (आजोबा) राजघराण्यात दिवाणजी होते. त्यामुळे ताईंच्या वडीलांच्या सामाजिक जाणीवा प्रगल्भ होत्या. तेही अनेक गरीब मुलांना मदत करत असत. त्यामुळे दोन मुलेही त्यांनी दत्तक घेतली होती. ताई सातवीत असतानाच त्यांची आई गेली. वडीलांनी मुलांना वाढवले. ताईंचे शालेय शिक्षण हे JNU दिल्ली येथे झाले तर पुणे येथे सिम्बायोसिस महाविद्यालयातून त्यांनी कॅामर्सची पदवी घेतली आणि Appal industries पुणे येथून computer diploma व मॅाटेसरी शिक्षक डिप्लोमा पूर्ण केला. वडील मिलिटरीत असल्याने त्या पूर्ण देशभर राहिल्या आहेत. घरी जातपात धर्माच्या पलीकडचे वातावरण असल्याने त्या निधर्मी बनल्या.

आईवडीलांचा आंतरधर्मीय विवाह. शालेय शिक्षण काही ठिकाणी ख्रिश्चन शाळांमधून झाले. घरी सर्व धर्माचे आचरण होत असे. त्यांच्या एकूण कुटुंबात सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया होत असे. त्यामुळे लहानपणापासूनच ताईंना हिंदूंची मंदिरे, मुस्लीमांची मशीद, ख्रिश्चनांचे चर्च, शीखांचा गुरूद्वारा, बौध्दांचे स्तूप याचे आकर्षण होते. त्या सगळीकडे सहजतेने प्रार्थनेला जात असत. त्यामुळे त्यांचे विचार जातीधर्मात कधीच अडकले नाहीत. त्या सर्व प्रकारच्या शाळेत पण शिकल्या. सारेच धर्म त्यांना आपले वाटत गेले. जसजशा ताई मोठ्या झाल्या तसतसा त्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास केला तसेच त्यांच्या सर्व भावंडांनी सुध्दा विचार उच्च ठेवल्याने व अभ्यास केल्याने देव एकच आहे. मानवतां हा एकच धर्म आहे. साने गुरूजी म्हणतात त्याप्रमाणे – ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ यावर त्यांनी शिक्का मोर्तब केले.

आपल्या जीवनातील अनेक घटना त्या खूप आनंद व अभिमानाने सांगतात. नेव्ही आर्मी आणि एअरफोर्सच्या वातावरणात ताई वाढल्या. त्यांच्या घरी सर्व सण एकत्र साजरे होत असत. ताईंच्या कुटुंबात खऱ्या अर्थाने ‘वसुधैव कुटुंब कम’ किंवा संत ज्ञानेश्वर महाराज म्हणाले त्याप्रमाणे-‘ हे विश्वचि माझे घर’ असे वातावरण त्यांना मिळाले.

पुणे येथे कॅालेजात शिक्षण घेत असतानाच त्यांचा प्रेमविवाह झाला. व्यावसायिक सधन घरात घुलेंच्या मोठ्या कुटुंबातील त्या एक झाल्या. ताईंचे पती उद्योग व सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. वेगळे संस्कार व सांस्कृतिक वातावरणात वाढलेल्या ताई या घराशी समरतेने एकरूप झाल्या. पुढील शिक्षण व कामाची संधी त्यांना कोणीही नाकारली नाही त्यामुळे ताईंनी आपल्या कामाची व्याप्ती वाढवली. दोन मुले, पती, सासू सासरे, दीर जावांचा पूर्ण पाठिंबा मिळाल्याने त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. स्वतःच्या संस्था निर्माण करून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात स्वतःला झोकून दिले.

विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम विकसित करणे, शिक्षकांना अभ्यासक्रमात मार्गदर्शन करणे, मुलांच्या विकासासाठी उपक्रम राबवणे, अभ्यासक्रमावर पुस्तके प्रकाशित करणे तसेच प्रामुख्याने शाळांसाठी व त्याच्याशी निगडीत सर्वांसाठी मार्गदर्शन तसेच नवीन शाळा सुरु करण्यासाठी सल्ला मसलत करणे, बालविकास व बालसंगोपन या विषयावर व्याख्याने देणे हे सातत्याने सुरु असते. गरीब विद्यार्थ्यांचे मूलभूत शिक्षण पूर्ण करण्यास प्रोत्साहित करून विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये भाग घेण्यास मार्गदर्शन करून त्यांच्या विकास व उत्कर्षाच्या दिशेने कार्य करण्यासाठी ताई सतत तत्पर असतात.
शैक्षणिक कार्याबरोबरच महिला संघ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी त्या कार्यरत आहेत. या माध्यमातून त्या देशभर कार्यरत आहेत. विशेषत: विधवा व घटस्फोटित महिलांचे संघटन करून व इतर महिला समित्यांच्या माध्यमातून विविध उत्थान कार्यक्रमांचे आयोजन पुण्यातील ११ हून अधिक झोपडपट्टी विकासासाठी निरामय फाऊंडेशनमध्ये काम केले.

ताईंचे पती त्यांच्या व्यवसायात यशस्वी आहेत तर त्यांची दोनही मुले पदवीधर होऊन आपापल्या क्षेत्रात यशस्वी आहेत. ताईंना आजवर नर्सरी शाळेचे उत्कृष्ट नियोजनासाठी केंद्रीय मंत्री मा. एम. व्ही. राजशेखरन यांचे हस्ते इंदिरा गांधी सदभावना पुरस्कार, वारसा सोशल फाऊंडेशनचा असामान्य स्त्री पुरस्कार, AICTE APPROVED HR EXPERT & ACADEMICS साठी अरिहंत फाऊंडेशन तर्फे पुरस्कार तसेच शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व वारसा सोशल फाऊंडेशन कडून जिजाऊ – सावित्री पुरस्कार मिळाला आहे.

ताईंचे स्वप्न व व्हिजन मोठे आहे. त्यासाठी त्या अविरतपणे कार्यरत आहेत. तळागाळातील मुलं व महिलांसाठी त्या कायम मदत व मार्गदर्शन करत असतात. आजवर कित्येक मुलांना शिक्षणासाठी ताईंनी मदत केली आहे तसेच महिलांनाही आर्थिक सक्षम केले आहे याच्या नोंदी ठेवणे ताईंना आवडत नाही. ‘कर्मण्ये वाधिका रस्ये मा फलेषु कदाचन।’ याप्रमाणे ताईंचे आचरण आहे. इतरांवर प्रेम कसे करावे ? हे त्यांच्याकडे पाहून अनेकांना शिकतां येते. ताईंच्या जगण्या व वागण्याला कोणत्या धर्माचे संस्कार म्हणावे हा प्रश्न पडावा इतक्या ताई आपल्या कुटुंब, नात्यात व आपल्या क्षेत्रात समरसून काम करत आहेत. ताईंचे सासर व माहेरचे कुटुंब पाहाता सर्वजण उच्चविद्याविभूषित असल्याने सर्वानुमते चांगले जगण्यासाठी, चांगले विचार आत्मसात करण्यासाठी केवळ शिक्षणाची व मानवतेची गरज आहे असे वाटते. जात पात, धर्म याला फारसे महत्व न देता धर्म व कर्मकांडांत न अडकता सुमारे ५५ ते ६० जण वर्ष – दोन वर्षात एकत्र येतात. यात हिंदू, मुस्लीम, केरळ, पंजाबी , कॅनडा व इतर देशातही ताईंचे असलेले नातेवाईक एकत्रित आले की काय धमाल असते याचा आनंद बोलताना त्या व्यक्त करतात. अशा ग्लोबल फॅमिली निर्माण होऊन जगात शांतता राहाणे व आपापल्या संस्कृती व खाद्यसंस्कृतीचे आदान प्रदान होणे किती गरजेचे आहे असे क्षणभर वाटून गेले. आज देशांतील परिस्थितीचा विचार करता ताईंचे कुटुंब हे आदर्श मानले पाहिजे.

यशाच्या शिखरावर पोहोचल्या तरीही पाय कायम जमीनीवर असणाऱ्या, सर्वधर्मसमभाव केवळ भाषणात नव्हे तर आचरणात आणणाऱ्या, मानवतां धर्म मानणाऱ्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहाणाऱ्या या जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकीला मानाचा मुजरा..!!

अॅड. शैलजा मोळक

Leave a Reply

error: Content is protected !!