स्वराज्याचे निष्ठावंत चतुरसिंग भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा 

 

 

 

चतुरसिंग भोसले हे मालोजी व विठोजी भोसले या सुप्रसिद्ध भोसले बंधू पैकी विठोजी भोसले यांचे वंशज होय.विठोजी भोसले यांच्या आठ मुलांपैकी नागोजी म्हणून एक मुलगा होता .त्या नागोजींचा मुलगा रावजी उर्फ काकाजी हा वावी येथे राहू लागला. काकाजींचा नातु त्रिंबकजी यांना तीन मुलगे होते. विठोजी, परशुराम आणि चतुरसिंग यापैकी वडील विठोजी हे सातारकर छत्रपती राजाराम महाराजांना इ.स.१७७७ मध्ये दत्तक गेले व धाकटे शाहू या नावाने साताऱ्यात सिंहासन रूड झाले.तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचे वडील त्रिंबकराव व चतुरसिंगही राजवाड्यात राहू लागले.

छत्रपती शाहूराजांची कारकीर्द सुरू झाली त्यावेळी पुणे येथे सवाई माधवराव पेशवेपदावर होते. मराठ्यांचे छत्रपती आता कारभार्यांच्या कब्जात आले .नाना फडणीसांनी पेशव्यांच्या सैन्याच्या खड्या पहाऱ्यात छत्रपती शाहू राजांना साताऱ्यात ठेवले होते.१७९५ मध्ये नाना फडणीसांनी छत्रपतींचा जास्तच कोंडमारा केला. छत्रपतींच्या खर्चाची त्यांची जी स्वतंत्र नेमणूक होती ती बंद करून नानाने पुण्याहून रक्कम ठरवून पाठवायला सुरुवात केली. छत्रपतींच्या विविध विभागांचा खर्च सहा लाखावरून एक लाखावर आणून नाना फडणीसांनी छत्रपतींचे हत्ती, घोडे, पागा सर्व पुण्याला नेले.

छत्रपती शाहूराजांवर चौकी पहारे बसवून त्यांना कोणी महत्त्वाची व्यक्ती भेटू नये अशी व्यवस्था करून छत्रपतींच्या खाजगी सेवकांची संख्याही कमी केली. हा सरळ सरळ छत्रपतींचा अपमान होता. छत्रपती शाहूराजांचे बंधू चतुरसिंग या सर्व प्रकारामुळे संतापले व त्यांनी पेशव्यांविरुद्ध उठाव केला. नंतर पुढे काही दिवसांनी छत्रपती शाहू राजांना मदत करण्यासाठी कोल्हापूरचे छत्रपती येऊ लागले .आधीच इंग्रजांच्या तावडीत सापडलेल्या व अनेक मराठा सरदार विरोधात असलेल्या बाजीराव पेशव्यांना हे कळताच ते हादरले. त्यांनी सर्जेराव घाटगे यांना चतुरसिंगांना वश करण्यास पाठवले असता चतुरसिंगांनी सर्जेराव घाडगेना ‘ धनी छत्रपती ,तो पेशवा नोकर.

तो कोण सरदारी देणार ? हा स्वतः तर बुडतोच आहे आणि त्याबरोबर सगळ्या राज्याची ही वाट लावत आहे ‘असे खडसावले. सातारा भागात लोकांना छत्रपतींच्या हालाखीची कल्पना दिली. बाजीरावांनी पाठवलेल्या सैन्याला झुकांडी देऊन चतुरसिंग नागपूरला भोसल्यांना कडे गेले. जाताना सेवा करून यश मिळवून परत येऊ अथवा प्राणार्पण करू असा निरोप त्यांनी छत्रपती शाहू राजांना दिला.

आपले ध्येय चतुरसिंगानी नागपूरकर भोसलेंना सांगताच त्यांनी चतुरसिंगांना दोन हजार फौज व दरमहा पंधरा हजाराची नेमणूक दिली. इथून चतुरसिंग मध्य प्रदेशात सागर येथे गेले .शिंदे – होळकरांशी बोलणी करून त्यांनी भरतपूर येथे जाऊन तेथील जाट राजाला आपली योजना सांगून त्यांचा पाठिंबा मिळवला.

चतुरसिंगाची ताकत व उत्साह या घटनांनी खूपच वाढला .बाजीराव आणि इंग्रज मराठा सत्ता मोडायला कारणीभूत होणार हे जवळपास सर्व सरदारांना दिसत होते. त्यांनी चतुरसिंगाना सहाय्य द्यायला सुरुवात केली. ह्या राजकारणात चतुरसिंगानी इंग्रज सेनापती लेक व माल्कम यांची भेट घेऊन त्यांना स्पष्ट बजावले स्वराज्याचे मालक छत्रपती असून त्यांचे नोकर असलेल्या पेशव्यांनी काहीही लिहून दिले तरी ते आम्ही मान्य करणार नाही.आमच्या राज्याला धक्का लागला तर आम्ही प्राण खर्ची घालू.आडवे येतील त्यांना कापून काढू चतुरसिंगाची जाज्वल स्वराज्यनिष्ठा ह्यातून सर्वांच्या निदर्शनात आली.

चतुरसिंगांनी यानंतर यशवंतराव होळकर ,जोधपुरचा राजा मानसिंग, जयपूरचे राजे जगतसिंग यांच्यासह उदयपूरचे राजे व बडोद्याच्या गायकवाडांशी मसलत केली .तोच सातारा येथे १८०८ मध्ये छत्रपती शाहू राजे निधन पावले .या घटनेने चतुरसिंग अत्यंत निराश झाले. बाजीराव पेशवे व इंग्रज यांनी शाहूराजांचे पुत्र प्रतापसिंह यांना गादीवर बसवून सातार्यावर आपली पकड घट्ट बसवली .आता बाजीराव व इंग्रज ह्यांनी चतुरसिंगाचा बंदोबस्त केल्याशिवाय आपण सुरक्षित राहू शकत नाही हे ओळखून त्यांना दग्याने पकडण्याची योजना गुप्तपणे राबवली.

बाजीरावांचे हस्तक त्रिंबकजी डेंगळे यांनी चतुरसिंगाकडे बोलणी चालू करून त्यांच्या वकीलासमोर बेल भंडाराची शपथ घेऊन चतुरसिंगाच्या केसालाही धक्का लागणार नाही असे वचन दिले. चतुरसिंग त्रिंबकजी डेंगळे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून खानदेशात गिरणा नदीकाठी त्रिंबकजी डेंगळे यांना भेटण्यासाठी येऊन वाट पाहत थांबले.गिरणा नदीकाठी त्रिंबकजी डेंगळे ऐवजी त्यांच्या तंबूवर बाजीरावांचे सैन्य येऊन धडकले. हल्ला करून चतुरसिंगासह त्यांचे सर्व अनुयायी कैद केले गेले.

इंग्रजाच्या हातचे बाहुले झालेल्या बाजीरावांनी चतुरसिंगाना कांगोरी किल्ल्यावर कैदेत टाकले.कैदेत हालअपेष्टा झेलत मराठा स्वराज्य इंग्रजांच्या व त्यांचे मांडलिक झालेल्या बाजीरावांच्या पंजातून सोडविण्यासाठी अविरत प्रयत्न करत हिंदुस्तानभर पायपीट करणारे अत्यंत जिगरबाज चतुरसिंग कांगोरी किल्ल्यावर १५ एप्रील १८१८ मधे कैदेतच मरण पावले.

मोठे मोठे सरदार बाजीराव व इंग्रजांच्या आधीन होऊन स्वतःचा बचाव करत असताना चतुरसिंगानी
जी छत्रपतींशी निष्ठा राखली व मराठा राज्य वाचविण्याचे प्रयत्न केले ते गौरवास्पद असूनही अंधारातच राहिले.

 

 

अशा या स्वराज्यनिष्ठ चतुरसिंग भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा 

लेखन 
डाॅ. सुवर्णा नाईक निंबाळकर


संदर्भ 
मराठी रियासत 
मराठ्यांची धारातिर्थे
प्रवीण भोसले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here