पिलाजी गायकवाड यांना
स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन 

 

छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात आपल्या कर्तबगारीने मराठ्यांचा अंमल खानदेश गुजरात सीमेवर बसविणाऱ्या पराक्रमी खंडेराव दाभाडे यांना छत्रपती शाहू महाराजांनी १७१७ मध्ये मराठा सत्तेचे सेनापतीपद दिले. खंडेरावांच्या हाताखाली काम करणारे दावडी (जिल्हा पुणे ) येथील दमाजी गायकवाड आपल्या कर्तबगारीने महत्त्वाच्या पदावर चढले .१७२० मध्ये मोगलांविरुद्ध हैदराबादचा निजाम ह्यांच्यात बाळापूर येथे मोठी लढाई झाली. या लढाईत खंडेराव यांच्या सैन्यातून निजामाविरुद्ध लढताना दामाजींनी चांगले शौर्य दाखवले. यांनी प्रसन्न होऊन छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ‘समशेरबहाद्दर’ असा किताब देऊन त्यांची सेनापतीच्या मुतालीकीच्या जागी नेमणूक केली.१७२१ मध्ये दमाजी गायकवाड मरण पावल्यानंतर त्यांचे पद त्यांनी दत्तक घेतलेले त्यांचे पुतणे पिलाजी गायकवाड यांना मिळाले.

गुजरातच्या चौथ व सरदेशमुखी वसुलीचे काम शाहूमहाराजांनी सेनापती खंडेराव दाभाडे यांना दिले होते. गुजरातवर आपला अंमल बसविण्यासाठी खंडेराव यांनी पिलाजींना ह्या खानदेश गुजरात सीमेवर सोनगड येथे ठाणे बसवायला सांगितले. पिलाजीनी या डोंगराळ व अडचणीचा प्रदेशात सोनगडचा किल्ला बांधला. गायकवाड घराण्याचा उत्कर्ष सोनगड पासूनच सुरु झाल्याने सोनगडला नंतर ‘ गायकवाडवाडीचे पाळणाघर ‘ म्हणून ओळखले जाऊ लागले.

पिलाजीनी स्थानिक कोळी , भिल्ल व देसाई यांचा आपल्या कार्यासाठी चांगला वापर करून घेतला. १७२० मध्ये पिलाजींनीराजपिंपळ्याच्या राजाच्या मदतीने सुरत वर प्रथमच स्वारी करून चौथ वसुली केली आणि अहमदाबाद येथे आपला गुमास्ता ठेवला . गुजरात हा मोगल बादशहाच्या सुभ्यापैकी एक सुभा होता .यावरील सुभेदार मोगलांकडून नेमला जाई. शिवाय सुरत ,बडोदा ,अहमदाबाद ही ठाणी लष्करी अंमलदारच्या ताब्यात असत. १७२४ मध्ये पिलाजीने गुजरातचा नायब सुभेदार हमीदखान याला त्याच्या जागी नवीन नेमल्या गेलेल्या सरबुलंदखानाविरुद्ध मदत केली.

याबद्दल पिलाजीनी मही नदीच्या पूर्वेकडील मुलखात चौथ वसुलीचा हक्क मिळवला. १७२५ मध्ये पराभूत झालेल्या पण पुन्हा पदावर आलेल्या सरबुलंदखानाने पिलाजींशी सख्य ठेवण्यासाठी गुजरातेत चौथ वसुलीचा हक्क दिला.नंदुरबार भागात राहून माळवा गुजरात भागात मराठा अंमल बसवू पाहणारे कंठाजी कदमबांडे व पिलाजी यांच्यात समझोता झाला. कदमबांडे यांनी महिनदीच्या पश्चिमेकडे तर पिलाजींनी पुर्वेकडील मुलखात चौथ वसुली करावी अशी तडजोड झाली.१७२३ मध्येच पिला जीनी बडोद्याचा ठाणेदार रुस्तमअली खान यांच्याशी १८ दिवस युद्ध करून त्याला मारुन बडोदा हस्तगत केले होते.ह्यावेळी खंडेरावाचे पुत्र त्रिंबकराव यांनी बडोदाजवळच्या डभोई येथे आपले मजबूत ठाणे स्थापले.

छत्रपती शाहू महाराजांनी जरी गुजरात प्रांत दाभाडे यांना सत्ता विस्तारासाठी दिला होता तरी दाभाडें वर आपले नियंत्रण असावे म्हणून पहिल्या बाजीराव पेशव्यांनी निम्मा गुजरात प्रांत आपल्याला मिळावा म्हणून प्रयत्न चालू केले. थेट मोगली सुभेदाराकडून बाजीरावांनी गुजरातच्या वसुलीची संमंती मिळविली आणि दाभाडे पेशवे संघर्ष चालू झाला. याची परिणीती डभोईच्या लढाईत झाली.दाभाडे निजामाकडे संघान बांधत आहेत असा आरोप करून बाजीरावाने दाभाडेंवर हल्ला केला.या युद्धात त्रिंबकराव दाभाडे ठार झाले .पिलाजी गायकवाड यांचे पुत्र सयाजीराव मारले गेले.पिलाजी निसटून सोनगडच्या किल्ल्यात आश्रयाला गेले .त्याचा बदला घेण्यासाठी बाजीरावांचा पाठलाग करणाऱ्या यशवंतराव दाभाडेंशी छत्रपती शाहू महाराजांनी बाजीरावांचा समेट करून दिला.

डभोईच्या लढाईपूर्वीच खंडेराव दाभाडे १७३९मध्ये मरण पावले होते. यशवंतराव हे त्रिंबकरावांचे बंधू कर्तबगारीत कमी पडू लागताच पिलाजींनी कारभार आपल्या हाती घेतला .बडोदा ‘डबोई काबीज करून पिलाजीरावांनी नांदोड ,चंपानेर, सुरत,भडोच ह्या गावावर आक्रमणे सुरू केली. मोगलांकडून नेमला गेलेला गुजरातचा सुभेदार मारवाडचा राजा अभयसिंह यांच्याशी सतत युद्ध करून पिलाजीनी त्याला नमविले. छत्रपती शाहू महाराजांनी पिलाजीरावांच्या कर्तबगारीची दखल घेऊन त्यांना ‘सेनाखासगेल’ हा किताब बहाल केला.गुजरातवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करणारे मोगली अंमलदार, स्वकीय प्रतिस्पर्धी कदम बांडे व धारचे पवार ,पेशवे पहिले बाजीराव या सर्वांना वरचढ ठरून पिलाजीरावांनी आपली सत्ता गुजरातेत मजबूत केली. त्यांचे पुत्र दमाजी गायकवाड लहान वयातच पित्याबरोबर मोहिमांवर जाऊ लागले.

मोगल सुभेदार राजा अभयसिंह या दोन वेळा पिलाजीरावांकडून पराभूत झाले होते. दोन्ही वेळा पिलाजीरावांनी त्याला आपले वर्चस्व मान्य करायला लावून सोडले होते. पण बडोदा व डबोई ही दोन महत्त्वाची शहरे काबीज करण्याचा प्रयत्न अभयसिंगाने सोडला नव्हता.अखेर पिलाजीरावांना युद्धात पराभूत करणे अशक्य असल्याचे अनुभवास येताच अभयसिंगाने कपटविद्धेचा प्रयोग केला .वाटाघाटी करण्याच्या निमित्ताने अभयसिंगाने पिलाजीरावांना डाकोर येथे यायचे आमंत्रण दिले. राजपूताच्या शब्दावर विश्वास ठेवून निर्धास्तपणे भेटीस आलेल्या पिलाजीरावांना अभयसिंगाने मारेकरी घालून ठार केले. एक पराक्रमी मराठा सेनानी दग्याने मारला गेला. (१७३२)
पिलाजीरावांची समाधी बडोद्याजवळच्या सावली या गावी एका छोट्या तलावाकाठी आहे. समाधी अत्यंत दुरावस्थेत असून ह्या वास्तूची दारे नाहीशी झाली असून आतील शिवपिंड कडून टाकण्यात आलेली आहे.

 

लेखन 
डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर 
संदर्भ 
मराठ्यांची धारातिर्थे
लेखक 
प्रवीण भोसले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here