Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

HISTORYINDIAMAHARASHTRA

samadhi – सिदोजीराव निंबाळकर यांची समाधी

1 Mins read

Samadhi – सिदोजीराव निंबाळकर यांची समाधी

 

Samadhi – वीर पंचहजारी सेनानी सिदोजीराव निंबाळकर यांची समाधी

– प्रवीण भोसले

 

 

 

 

मराठ्यांच्या स्वराज्याचे पंचहजारी सेनानी सिदोजीराव निंबाळकर!हे होते शिवरायांचे सावत्र मेहुणे जगदेवराव निंबाळकर यांचे पुत्र!निंबाळकर घराण्यातील हे स्वराज्यवीर शिवरायांचे रक्षण करताना धारातीर्थी पडलेले शेवटचे नामवंत सरदार आहेत आणि ते लढलेत सतत तब्बल तीन दिवस. शिवछत्रपतींच्या आयुष्यातील खुद्द शिवरायांनी नेतृत्व केलेली ही शेवटची मोहीम होती.इतक्या महत्त्वाच्या आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रसंगी वीरगती पावलेले सिदोजीराव निंबाळकर तसे ऐतिहासिक ग्रंथलेखनातून दुर्लक्षितच राहिलेले आहेत. अगदी दोनचार ओळीत त्यांचा पराक्रम व त्यांच्या मृत्यूची नोंद आढळते अपवाद फक्त ‘सोलापूर जिल्ह्याचा इतिहास’हे श्री.गोपाळराव देशमुख यांचे पुस्तक. पण यात samadhi समाधीस्थळाची व पट्टा परिसराची माहिती नाही.

पट्टा ऊर्फ विश्रामगड किल्ल्यापाशी असणाऱ्या सिदोजीरावांच्या समाधीबद्दलची माहिती आज या लेखातून तुमच्यासमोर मांडतोय.तीन वर्षापूर्वीच या समाधीची माहिती देणारा लेख मी वृत्तपत्रांत दि.१४ जानेवारी २०१८ रोजी सर्वप्रथम प्रकाशित केला होता. मागोमाग माझ्या ‘मराठ्यांची धारातीर्थे'(२०१९ ची आवृत्ती) या पुस्तकातून ही माहिती प्रकाशित केली. यामुळे मराठी पुस्तकात सिदोजीरावांची शौर्यगाथा समाधीच्या छायाचित्रांसह प्रथमच छापली गेली.

सिदोजीरावांच्या samadhi समाधीची माहिती सांगण्यापूर्वी अर्थातच त्यांचे चरित्र त्यांच्या शौर्यगाथेसह नमूद करणे आवश्यक आहे. शिवरायांचे सासरे मुधोजीराव निंबाळकर हे फलटणच्या त्यांच्या जहागिरीवर १६३० ते १६४४ या काळात प्रमुख होते. मुधोजीरावांना एका पत्नीपासून जगदेवराव व साबाजीराव हे दोन पुत्र होते तर दुसऱ्या पत्नीपासून बजाजीराव व सईबाई ही अपत्ये झाली.१६४० मधे शिवरायांचा विवाह सईबाईसाहेब यांच्याशी झाला.त्या शिवरायांच्या प्रथम पत्नी होत्या.जिजाऊ आणि शिवराय पुणे भागात असताना सुरुवातीच्या काळात त्यांना मदत करणारे, आदिलशहाला न जुमानणारे मुधोजीराव १६४४ मधे विजापूरच्या सैन्याविरूध्द लढताना धारातीर्थी पडले.

मुधोजीरावांनी मृत्यूपूर्वीच आपले पुत्र जगदेवराव यांना भाळवणी तर साबाजीराव यांना दहिगाव येथे काही गावे देऊन स्थायिक केले. हे दोघेही बंधू शिवरायांचे सावत्र मेहुणे होते. भाळवणी हे गाव सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात आहे.

जगदेवरावांचे पुत्र सिदोजीराव हे बहुधा अफजलवधापूर्वीच शिवरायांच्या सैन्यात सामील झाले होते.कारण कोल्हापूरच्या लढाईत त्यांचा उल्लेख येतो.या लढाईची माहिती इथे देतो.अफजलवधापासून शिवरायांच्याबरोबर असलेले सैन्य थेट शिवरायांच्या पन्हाळ्याहून सुटकेपर्यंत त्यांच्यासोबत होते. खानाला मारल्यावर शिवरायांनी झंझावाती मोहीम करुन पन्हाळा जिंकला. विजापूरच्या आदिलशहाने पाठवलेल्या दुसऱ्या फौजेचा कोल्हापूरजवळ झालेल्या लढाईत खुद्द शिवरायांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सडकून पराभव केला.

samadhi - सेनानी सिदोजीराव निंबाळकर 1

samadhi – सेनानी सिदोजीराव निंबाळकर 1

ही लढाई २८ डिसेंबर १६५९ रोजी झाली.या लढाईत मराठ्यांच्या सैन्यातील सिदोजी पवारांनी विजापुरी सादतखानावर हल्ला करुन त्याला उधळून लावले.हे सिदोजी पवार म्हणजेच सिदोजीराव निंबाळकरच असणार कारण पवार हे निंबाळकरांचे मूळ आडनाव आहे.शिवपत्नी सईबाईसाहेब यांचा उल्लेख शिवभारत या अस्सल समकालीन साधनात ‘पवार कुलोत्पन्न सई’असा आहे आणि याच शिवभारतात वरील कोल्हापूरजवळच्या लढाईचे वर्णन आहे.निंबाळकरांना इतरही अनेक कागदपत्रांत पवार असे उल्लेखलेले आहे.या लढाईच्या दिनांकावरून सिदोजीरावांचा जन्म १६३५-४० चा असावा असा तर्क करता येतो.

samadhi - सेनानी सिदोजीराव निंबाळकर 2

samadhi – सेनानी सिदोजीराव निंबाळकर 2

पुढील काळात घोडदळाची सरनौबती प्रतापराव गुजरांकडे असताना सिदोजीराव प्रतापरावांच्या हाताखालील फौजेत सामील झाले. ऑक्टोबर १६७० मधे शिवरायांनी मोगलांचे सूरत शहर दुसऱ्यांदा लुटले.मराठे लूट घेऊन परत येताना वणी-दिंडोरीची प्रसिद्ध लढाई झाली.ही मराठ्यांची उघड्या मैदानात मोगलांविरूध्द झालेली पहिली लढाई होती.शिवरायांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मोगलांना या युध्दात धूळ चारून गनिमी काव्याबरोबरच आपण मैदानी युध्दातदेखील श्रेष्ठ आहोत हे दाखवून दिले. मोगलांचे मनोधैर्य खच्ची झाले तर मराठ्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला.याच वाढलेल्या आत्मविश्वासाने १६७२ ला मराठ्यांनी पुन्हा मोगलांची प्रचंड धूळधाण उडविली.

१६७२ च्या फेब्रुवारीत वणी-दिंडोरीच्या लढाईपेक्षाही खूप मोठे मराठे विरूद्ध मोगल असे युद्ध झाले. हेदेखील मैदानी युध्दच होते.साल्हेरला वेढा घालून बसलेल्या चाळीस हजाराच्या मोगली फौजेवर सरनोबत प्रतापराव आणि पेशवे मोरोपंत पिंगळे अक्षरशः तुटून पडले.मोगलांचे प्रचंड नुकसान झालेल्या या युध्दाने औरंगजेब अत्यंत हादरला.या युध्दाचे सभासद बखरीतील खाली दिलेले वर्णन अत्यंत रोमहर्षक आहे.

samadhi - सेनानी सिदोजीराव निंबाळकर 3

samadhi – सेनानी सिदोजीराव निंबाळकर 3

युद्ध होताच पृथ्वीचा धुराळा असा उडाला की, तीन कोश औरसचौरस आपलें व परके माणूस दिसत नव्हते. हत्ती रणास आले. दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा जाहाले. घोडी, उंट, हत्ती, [ यांस ] गणना नाही. रक्ताचे पूर वाहिले. रक्ताचे चिखल जाहाले. त्यामध्ये रूतो लागले. असा कर्दम जाहाला. मारता मारतां घोडे जिवंत उरले नाहीत. जे जिवंत सापडले ते साहा हजार घोडे राजियाकडे गणतीस लागले. सवाशे हत्ती सांपडले. साहा हजार उंटे सांपडली. मालमत्ता खजीना, जडजवाहीर,कापड, अगणित बिछाईत हातास लागली. बेवीस(२२) वजीर नामांकित धरले.

खासा इखलासखान व बेलोलखान पाडाव जाले. ऐसा कुल सुभा बुडविला.हजार दोन हजार सडे सडे पळाले. असें युद्ध जाले. त्या युद्धांत प्रतापराव सरनोबत व आनंदराव व व्यंकाजी दत्तो व रूपाजी भोसले व सूर्यराव कांकडे, शिदोजी निंबाळकर व खंडोजी जगताप व गोंदजी जगताप व संताजी जगताप व मानाजी मोरे व विसाजी बल्लाळ, मोरो नागनाथ, मुकुंद बल्लाळ, वरकड बाजे वजीर, उमराव असे यांणी कस्त केली. तसेच मावळे लोक यांणी व सरदारांनी कस्त केली. मुख्य मोरोपंत पेशवे व प्रतापराव सरनोबत या उभयतांनी आंगीजणी केली. आणि युद्ध करिता
सूर्यराव कांकडे पंचहजारी मोठा लष्करी धारकरी, याणे युद्ध थोर केले. ते समयीं जंबूरियाचा गोळा लागून पडला. सूर्यराव म्हणजे सामान्य योद्धा नव्हे, भारती जैसा कर्ण योद्धा, त्याच प्रतिमेचा असा शूर पडला.वरकडही नामांकित शूर पडले. असे युद्ध होऊन फत्ते जाहाली.

samadhi - सेनानी सिदोजीराव निंबाळकर 4

samadhi – सेनानी सिदोजीराव निंबाळकर 4

या उताऱ्यात मुख्य पराक्रमी सेनानींबरोबर सिदोजीरावांचेही नाव नमूद आहे.एका अर्थाने सिदोजीरावांचे नाव या लढाईने प्रसिध्दीस आले. मार्च १६७३ च्या अखेरीस मराठ्यांच्या स्वराज्यावर चालून येत असलेल्या विजापुरी सरदार बहलोलखान याला प्रतापरावांनी उमराणी(जतजवळ) येथे अचानक गाठले. मराठयांच्या जबरदस्त हल्ल्याने विजापुरी फौजेत कमालीचा गोंधळ माजला. इतर मराठे सेनानींबरोबर सिदोजीराव शत्रूला उसंत न देता तलवार गाजवित होते. या गोंधळाने
बहलोलखानाच्या सैन्यातील एक हत्ती बिथरून सैरावैरा पळू लागला. कुणालाही आटोक्यात न येणाऱ्या या बेफाम हत्तीला सिदोजीरावांनी काबूत आणून मराठयांच्या तळावर आणले. सिदोजीरावांचे हे धाडस इतिहासात नोंदले गेले.बहलोलखान पूर्ण पराभूत होऊन, प्राणाची भीक मागून,पुन्हा तुमच्यावर चालून येणार नाही असे वचन देऊन; प्रतापरावांकडून जीवदान घेऊन परत फिरला.या विजयापाठोपाठ प्रतापरावानी हुबळी आणि अथणी ही शहरे लुटली.सिदोजीराव अर्थातच या मोहिमेत असणार.

samadhi - सेनानी सिदोजीराव निंबाळकर 5

samadhi – सेनानी सिदोजीराव निंबाळकर 5

हाच बेहलोल प्रतापरावांना दिलेले वचन विसरून ऑक्टोबर १६७३ च्या शिवरायांच्या कर्नाटक प्रांतातील मोहिमेत आडवा आल्याने शिवरायांनी प्रतापरावांना “बेहलोलला बुडवून फत्ते करणे,नाहीतर तोंड न दाखवणे.’ अशा कडक भाषेत पत्र लिहिले. या पत्राने बहलोलवर अत्यंत संतापलेल्या प्रतापरावानी सोबत कमी सैन्य असतानादेखील नेसरीच्या खिंडीत बहलोलवर त्वेषाने झडप घातली.पण दुर्दैवाने सरनोबत प्रतापराव या लढाईत धारातीर्थी पडले.(२४ फेब्रुवारी१६७४)
मराठ्यांच्या प्रतापरावांच्या हुकूमतीखाली असलेल्या फौजेचा दुसरा भाग आनंदराव मकाजी यांच्या नेतृत्वाखाली होता.याच सैन्यात सिदोजीराव असावेत.कारण उमराणीच्या लढाईपासून ही फौज एकत्रितच मोहिमेवर होती.

बेहलोलच्या मदतीला आता मोगली सरदार दिलेरखान आला.या दोघांनी आनंदरावांवर चालकेली. पण त्यांना चतुराईने झुकांडी देऊन आनंदरावांनी थेट बहलोलची संपगावची जहागीर लुटून फस्त केली(२२ मार्च १६७४).लूट घेऊन आनंदराव रायगडावर हजर झाले.कारण आता शिवरायांच्या राजाभिषेकाचा सुवर्णदिन जवळ आला होता.

samadhi - सेनानी सिदोजीराव निंबाळकर 6

samadhi – सेनानी सिदोजीराव निंबाळकर 6

६ जून १६७४ रोजी शिवराय सिंहासनाधीश्वर छत्रपती झाले. याच दरम्यान सिदोजीरावांना पंचहजारी सरदारकीचा मोठा मान मिळाला असावा कारण पुढील इतिहासात त्यांचा पंचहजारी सेनानी असाच उल्लेख येतो. सेनापतीपदाच्या खालोखाल हे दुसरे महत्वाचे पद होते.या पदासाठीची आपली लायकी सिदोजीरावांनी सिध्द केल्यामुळेच शिवरायांनी त्यांना ही जबाबदारी दिली असणार हे उघड आहे. शिवरायांच्या कारकिर्दीत पंचहजारी सरदार पदावर सिदोजीराव निंबाळकर आणि सूर्यराव काकडे या दोनच सरदारांचा उल्लेख येतो.

१६७९ मधील जालन्याची स्वारी ही शिवरायांची त्यांच्या आयुष्यातील शेवटची स्वारी होती.मोगली सरदार दिलेरखानाने विजापूरवर हल्ला केला होता. आदिलशहाने यावेळी शिवरायांना मदतीची विनवणी केली. दिलेरखानाला शह देण्यासाठी शिवरायांनी थेट मोगली मुलुखात घुसून औरंगाबादजवळच्या जालन्यावर हल्ला केला. शिवरायांच्या सोबत यावेळी दहा हजार सैन्यासह पंचहजारी सेनानी सिदोजीराव निंबाळकर होते.सतत तीन दिवस शिवरायांनी जालना शहर लुटून साफ केले. बैलांवर, घोडयावर लुटीचा ऐवज लादून शिवराय जालन्याहून परत फिरले (१३ ते १५ नोव्हेंबर). यावेळी औरंगाबाद येथे औरंगजेबाचा मुलगा मुअज्जम सुभेदारीवर होता.त्याने तत्काळ शिवरायांना अडवण्यासाठी मोठी फौज रवाना केली. मोगल सरदार रणमस्तखान,आसफखान, केसरसिंग,जाबीतखान इत्यादींनी पंचवीस-तीस हजारांची मोठी फौज घेऊन जालन्यावरुन परतणाऱ्या शिवरायांच्या सैन्याला संगमनेरजवळ गाठले.

samadhi - सेनानी सिदोजीराव निंबाळकर 7

samadhi – सेनानी सिदोजीराव निंबाळकर 7

यावेळी लुटीचे ओझे बरोबर असल्याने मोगल आपल्याला गाठू शकतात हे ओळखून शिवरायांनी आपला मूळचा स्वराज्यात परतण्याचा मार्ग बदलून एखाद्या बळकट किल्ल्यावर आश्रय घेण्याचा निर्णय घेतला. संगमनेरपासून ४० मैलावर असणारा पट्टा किल्ला शिवरायांनी यासाठी निवडला कारण हा बळकट तर आहेच शिवाय त्याच्या मोठ्या विस्तारामुळे लूट व सैन्य त्यावर सहज राहू शकत होते.शिवराय पट्ट्याकडे निघाले आणि पाठलागावर मोगलही धाऊ लागले. अगदी पन्हाळ्यावरून शिवराय निसटताच मागोमाग धावलेल्या सिद्दी जौहरच्या सैन्याने केलेल्या पाठलागाचीच जणू इथे पुनरावृत्ती होत होती. पण यावेळी घडलेला युध्दप्रसंग मात्र पावनखिंडीच्या लढाईपेक्षाही मोठा होता आणि इथे एकच खिंड लढवायची नव्हती तर अनेक मार्गानी पुढे घुसू पाहणाऱ्या,सहापट जास्त असलेल्या मोगली सैन्याला थोपवायचे होते.

यावेळी शिवरायांजवळ दहा हजारांची फौज असल्याने व लूट बरोबर असल्याने सिदोजीरावांनी चार पाच हजार फौज घेऊन मोगलांना अडवायचे तर स्वतः शिवरायांनी निम्म्या सैन्यासह लूट घेऊन सुरक्षितपणे पट्टा किल्ल्याकडे निसटायचे अशी योजना शिवरायांनी केली. हा भाग अनेक डोंगरदऱ्यांनी, घाटवाटांनी युक्त असला तरी मोठ्या संख्येने चालून आलेल्या मोगलांना अडविणे सोपे काम नव्हते. पट्ट्याकडे संगमनेरकडून येणाऱ्या मार्गावरील भौगोलिक स्वरूपाचा नकाशा (Topograpghic Map)खाली दिला आहे.

samadhi - सेनानी सिदोजीराव निंबाळकर 8

samadhi – सेनानी सिदोजीराव निंबाळकर 8

पट्ट्याच्या पश्चिमेला कडा आहे.उत्तर बाजूने औंढा किल्ला, चन्नगिरी डोंगर, आड किल्ला पूर्व पश्चिम रेषेत आहेत. पट्ट्याच्या दक्षिण बाजूला बितींगा किल्ला व महाकाळ डोंगररांग आहे.पट्ट्याच्या समोर पूर्व दिशेला थोडा मैदानी भाग असून या मैदानापर्यंत संगमनेरच्या दिशेने येण्यासाठी अनेक लहान-मोठ्या डोंगर-टेकड्यांच्या मधील खिंडी-घाटवाटा पार करून यावे लागते. नेमक्या या वाटा रोखल्या की पट्ट्याकडे जाणे अवघड होते.अशा या भौगोलिक परिस्थितीत लपाछपीचा आणि तीव्र युध्दाचाही एक जीवघेणा खेळ सुरू झाला.यावेळी बहिर्जी नाईकानी लुटीसह शिवरायांना पट्टा किल्ल्यावर अनेक आडमार्गानी नेत तीन दिवसांनी पोहोचविले.

या दरम्यान सिदोजीरावांवर जबाबदारी होती मोगलांना शिवरायांपर्यंत पोहोचू न देण्याची.सिदोजीरावांच्या नेतृत्वाखाली ४-५ हजार मराठे २५-३० हजारांंच्या मोगली लोंढ्याला बांध घालण्यासाठी छातीचा कोट करून झुंजू लागले. अनेक दिशानी खिंडीतून, लहान वाटांतून पुढे सरकू पाहणाऱ्या मोगलांना सिदोजीराव प्रखर प्रतिकार करीत होते.शत्रूच्या हालचालींचा सतत मागोवा घेत सिदोजीरावानी मोगलांना खरोखरच बांध घातला. सतत तीन दिवस अखंड लढा देत सिदोजीरावांनी पराक्रमाची शर्थ केली. त्यांच्या बरोबरचे बहुतांश मावळे मोगलांशी लढताना वीरगती पावले.

samadhi - सेनानी सिदोजीराव निंबाळकर 9

samadhi – सेनानी सिदोजीराव निंबाळकर 9

सिदोजीरावांनी अपूर्व अशी झुंज देऊन मोगलांना शिवरायांपर्यंत पोहोचू दिले नाही. तीन दिवसांच्या अथक लढाईनंतर गोळी लागून सिदोजीराव धारातीर्थी पडले. याचवेळी शिवराय पट्टा किल्ल्यावर सुखरूप पोहोचले होते.शिवराय पट्ट्यावर पोहोचल्याचे कळताच निराश झालेले उरलेले मोगल सैन्य रिकाम्या हाताने माघारी फिरले. शिवरायांचे संरक्षण करताना स्वराज्यासाठी दिलेले सिदोजीरावांचे बलिदान हे शिवरायांच्या कारकीर्दीतले शेवटचे बलिदान ठरले. ह्यानंतर तीनच महिन्यांनी शिवरायांचे निधन झाले (३ एप्रिल१६८०).

२०, २१, २२ नोव्हेंबर असा तीन दिवस सतत लढा देऊन सिदोजीरावांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून रणांगणावर देह ठेवला. जातिवंत आणि कट्टर मराठ्याची स्वामीनिष्ठा,शौर्य,कैकपटीने जास्त असलेल्या शत्रूसैन्याला रोखण्याची बुध्दिमत्ता,युध्दकौशल्य, कडवी झुंज आणि उद्दिष्टासाठी प्राणार्पण करण्याची तयारी किती उच्च दर्जाची असते हे दाखवून धारातीर्थी पडलेले सिदोजीराव त्यांच्या पथकातील सैनिकांसह केवळ निंबाळकर घराण्याला आणि सोलापूर जिल्ह्यालाच नव्हे तर तमाम मराठी मुलूखाला ललामभूत ठरले आहेत.

samadhi - सेनानी सिदोजीराव निंबाळकर 10

samadhi – सेनानी सिदोजीराव निंबाळकर 10

शिवरायांना वाचविण्यासाठी तीन दिवस सतत लढण्याचा सिदोजीरावांचा दैदिप्यमान पराक्रम हा मराठयांच्या इतिहासात एकमेव असाच आहे. या शौर्याला दुसरी तुलना नाही.अशी अनेक वैशिष्ट्ये असणारी ही लढाई अनेक संदर्भ साधनांतून आपल्याला माहित होते. सभासद बखरीतील या प्रसंगाचे वर्णन मोजक्या शब्दात त्या घटनेचा सारांश सांगते. *’आणि पुढे खासा राजियानी अवघे लष्कर घेऊन जालनापूर मोगलाईत त्यास वेढा घेतला. पेठा मारिल्या. शहर लुटून फन्ना केले. अगणित द्रव्य, सोने रूपे,जडजवाहीर, कापड, घोडे, हत्ती, ऊंटे फस्त केली. मोगलांच्या फौजा रणमस्तखान,
केशरसिंग, लष्करखान व बाजे उमराव अशा फौजा पंचवीस तीस हजार चालून आले.

त्याशी व राजियांचे फौजेशी युध्द बहूत झाले. सिदोजी निंबाळकर राजे याजकडील पाच हजार फौज घेऊन तीन दिवस युध्द केले. ते वक्ती सिदोजी निंबाळकर पंचहजारी वजीर राजियांचा पडला. लष्कर, जड, गिरीमार्गाने जावे अशी तजवीज केली. ते समयी बहीरजी जासूद याने कबूल केले की, “मोगलांची गाठ न पडता लष्कर घेऊन ठिकाणास जातो. साहेबी फिकीर न करणे.” तीन रात्री खपून, रात्रंदिवस अवकाश न करीता पट्टागड येथे लष्कर घेऊन आला.’

samadhi - सेनानी सिदोजीराव निंबाळकर 11

samadhi – सेनानी सिदोजीराव निंबाळकर 11

९१ कलमी बखरीत *’ते समई रणमस्तखान धावोन आला. युध्द झाले. सिदोजी निंबाळकर पंचहजारी त्यांस गोला लागोन पडताच राजे रातोरात किले पटियास सहवर्तमान आले. गडाचे नाव किले विश्रामगड ठेविले.’ असे वर्णन दिले आहे. जेधे शकावली या अस्सल साधनात शके १६०१(इ.स.१६७९) खाली ‘कार्तिक मासी इदिलशहा व सिवाजी राजे यांचा सला झाला. त्याच महिन्यात राजानी जाऊन जालनापूर लुटले.तेथे रणमस्तखानाशी लढाई जाली.सिदोजी निंबालकर गोळी लागून ठार झाले.राजे फिरोन पट्टयावरून रायेगडास आले.’

 

Also Read : https://www.postboxindia.com/r-r-patil-aaba-mind-your-toung-rohit-patil-do-positive/

 

अशी या प्रसंगाची नोंद आहे. १६५९ च्या कोल्हापूरजवळच्या लढाईपासून थेट शिवरायांच्या १६७९ सालच्या शेवटच्या मोहिमेपर्यंत पराक्रम गाजवीत २० वर्षे स्वराज्यसेवा करणारे सिदोजीराव निंबाळकर अखेर शिवरायांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांचे मोल देऊन वीरगती पावले.अत्यंत श्रेष्ठ असा रणांगणावरील मृत्यू सिदोजीरावांना प्राप्त झाला पण यांच्या शौर्यशाली वीरमरणाला प्रसिद्धी देण्यात मात्र आपण कनिष्ठ दर्जाचे ठरलो असे मला वाटते.

samadhi - सेनानी सिदोजीराव निंबाळकर 12

samadhi – सेनानी सिदोजीराव निंबाळकर 12

बिकटप्रसंगी प्रत्यक्ष शिवप्रभूंचे रक्षण करणारे जिवा महाले आणि अशाच प्रसंगी शिवरायांच्या रक्षणार्थ प्राणार्पण करणारे शिवाजी काशीद,पावनखिंड प्राण जाईतो लढविणारे शंभूसिंह जाधवराव(सेनापती धनाजी जाधवरावांचे वडील),बाजी प्रभू व फुलाजी प्रभू देशपांडे हे स्वराज्यवीर आपल्या इतिहासात सुप्रसिद्ध आहेत.यात आणखी एका अनाम मावळ्यालादेखील स्थान मिळाले पाहिजे.शिवरायांनी पहिल्यांदा सूरत शहर लुटले त्यावेळी सूरतेचा किल्लेदार इनायतखानाने एक मारेकरी बोलणी करण्याच्या बहाण्याने शिवरायांकडे पाठवला होता.

samadhi - सेनानी सिदोजीराव निंबाळकर 13

samadhi – सेनानी सिदोजीराव निंबाळकर 13

या मारेकऱ्याने शिवरायांशी बोलताना अचानक खंजीर हाती घेऊन शिवरायांच्या रोखाने झेप घेतली.हा वार शिवरायांवर होणार इतक्यात शिवरायांच्या शेजारी उभ्या असलेल्या एका अनाम अंगरक्षकाने अत्यंत चपळाईने तलवारीच्या वाराने त्या मारेकऱ्याचा हात वरच्यावर छाटून टाकला.हात तुटलेला हा मारेकरी त्याच्या वेगामुळे शिवरायांच्या अंगावर कोसळला.त्याला बाजूला ओढून ठार करण्यात आले.या भयानक जीवघेण्या हल्ल्यावेळी शिवरायांचे प्राणरक्षण करणाऱ्या त्या अंगरक्षकाचे नाव अजूनही आपल्याला माहिती नाही. आणि याच मोजक्या नररत्नांच्या मालेतील अखेरचे वीर असणारे सिदोजीराव, त्यांच्या शौर्याची-प्राणार्पणाची नोंद इतिहासात असूनही, मराठी जनांपासून अज्ञात राहिले यात दोष कुणाचा?आपलाच ना?

आता सिदोजीरावांच्या samadhi समाधीबद्दलची माहिती नमूद करतो.पट्टा हा महत्त्वाचा किल्ला पाहणे काही ना काही कारणाने माझ्याकडून लांबणीवर पडत गेले होते. अखेर २०१७ च्या डिसेंबरमधे पानिपतच्या दौऱ्यावरून परत येताना हा योग आला.घोटी बुद्रुकवरुन म्हैसवळण घाटातून कोकणवाडीमार्गे मी, नाना यादव व राजाराम चव्हाण पट्टावाडीत २० डिसेंबरला पोहोचलो.तिथून गडावर जाताना पट्टा किल्ल्याची सविस्तर माहिती देणारे बोर्ड आहेत पण त्यावर सिदोजीरावांचे नाव अथवा त्यांच्या वीरमृत्यूच्या घटनेबद्दल एक शब्दही नाही. वनखात्याच्या रक्षकालाही सिदोजीरावांची माहिती नव्हती. मात्र किल्ल्यावर कुठल्याही महत्वाच्या व्यक्तीची समाधी samadhi नाही हे मात्र त्याने सांगितले.

samadhi - सेनानी सिदोजीराव निंबाळकर 14

samadhi – सेनानी सिदोजीराव निंबाळकर 14

मोठ्या विस्ताराचा पट्टा किल्ला व्यवस्थित पाहून झाल्यावर खाली उतरलो.आता गावात samadhi समाधीबाबत चौकशी चालू केली.गावातून किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर दोन छोटी samadhi समाधीस्थळे आहेत.पण ती कुणाची आहेत याची कुणालाही माहिती नव्हती.एका व्यक्तीने मात्र सहजच मला सांगितले की “वीरवाडीच्या रस्त्यावर निंबाळकरांच्या समाध्या आहेत.” मी दोन क्षण स्तब्धच झालो.”समाध्या आहेत तर मग अप्रसिद्ध आणि दुर्लक्षित का ?” असा प्रश्न मी विचारताच उत्तर आले “आमच्या पंचक्रोशीत कुठेही निंबाळकर आडनावाचे कुणीही नाहीत,या समाध्यांची पूजाही कुणी करीत नाहीत. त्यामुळे या समाध्यांना इथे महत्त्व दिले जात नाही. आणि तुम्ही म्हणता ते सिदोजी निंबाळकर हे नावही आम्हाला माहिती नाही.” ग्रामस्थांना सिदोजीरावांचा इतिहास माहिती नसावा यात काही नवल नाही पण पट्ट्यावर आणि त्याच्या परिसरावर लिखाण करणाऱ्यांपर्यंत ही मला सहज उपलब्ध झालेली माहिती कशी पोहोचली नाही याचे मला आश्चर्य वाटले.

Also Read :

आता इथे जास्त वेळ न घालवता आम्ही त्या व्यक्तीला सोबत घेऊन समाध्या पाहायला निघालो. पट्टावाडीतून वीरवाडीकडे जायच्या रस्त्यावरच डावीकडे पट्टा किल्ल्यावर जाणारा फाटा आहे.(नकाशा पहावा).इथून वीरवाडीकडे जाताना जेमतेम एक-दीड कि.मी.वर उजव्या बाजूला महादेवाचे जुने पडके मंदिर आहे.हा रस्ता पुढे सरळ महाळुंगी नदीच्या उगमस्थानी जातो. या उगमस्थानाच्या अलीकडे रस्त्याच्या उजव्या बाजूला दोन samadhi समाधीस्थळे आहेत.

samadhi - सेनानी सिदोजीराव निंबाळकर 15

samadhi – सेनानी सिदोजीराव निंबाळकर 15

समाध्यांची बांधणी शिवकालीन पद्धतीची आहे.अशी अनेक शिवकालीन samadhi समाधीस्थळे मी पाहिली असल्याने मी हे खात्रीने सांगू शकतो.ह्या दोन्ही समाध्या पूर्वापार निंबाळकरांच्या समाध्या म्हणून ओळखल्या जातात. या भागात कुठेही निंबाळकरांचे वास्तव्य नाही. शिवाय या भागाच्या इतिहासात समाधी बांधण्याएवढे महत्वाचे व्यक्तीमत्व, तेही निंबाळकर आडनावाचे, शिवरायांचे सरदार सिदोजीराव निंबाळकर यांच्याव्यतिरिक्त कुणीही नसल्याने आणि सिदोजीराव याच परिसरात वीरगती पावले असल्याने ही समाधी सिदोजीरावांचीच असण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

खरेतर इथे दोन समाध्या आहेत.त्यापैकी मोठ्या समाधीला मी सिदोजीरावांची समाधी म्हणतोय कारण ते या लढणाऱ्या सैन्याचे प्रमुख होते.महत्वाच्या व्यक्तीची समाधी आकाराने मोठी बांधली जाणे हे साहजिकच आहे. दुसरी समाधीदेखील त्याच वेळी बांधलेली आहे हे बांधकामावरून सहज स्पष्ट होते.कदाचित सिदोजीरावांसह धारातीर्थी पडलेल्या कुणा महत्वाच्या व्यक्तीची ही समाधी आहे.पण या व्यक्तीचे नाव अद्याप अज्ञात आहे.ह्या व्यक्तीचा शोध घेणे आवश्यक आहे.

samadhi - सेनानी सिदोजीराव निंबाळकर 16

samadhi – सेनानी सिदोजीराव निंबाळकर 16

मात्र ही samadhi समाधी सिदोजीरावांच्या पत्नींची नसावी. कारण एकतर शिवरायांच्या सैन्यात कुटुंबकबिला बाळगण्यास मनाई होती आणि दुसरे या समाधीवर सतीशिळा नाही.(सतीशिळा म्हणजे कोपरातून दुमडलेल्या बांगड्या असलेल्या हाताचे सूर्य-चंद्रासह शिल्प.) त्यामुळे ही दुसरी लहान समाधी एखाद्या वीराचीच असावी.

या समाध्या इथे असण्याचे कारण एकतर पट्ट्यावर शिवराय सैन्यासह असल्याने सिदोजीरावांचा देह अंत्यसंस्कारासाठी इथेच आणला गेला असणे साहजिकच आहे.दुसरे कारण समाधी बांधताना शक्यतो नदी,ओढा,तलाव अशा पाण्याच्या स्थळाशेजारी तसेच एखाद्या मंदिराच्या परिसरात बांधली जाई.इथे जवळच महाळुंगी नदीचे उगमस्थानही आहे आणि काही अंतरावर महादेवाचे जुने देऊळही आहे.म्हणजे समाधीसाठी जागा अगदी योग्य निवडली आहे.कदाचित खुद्द शिवछत्रपतींच्या उपस्थितीत हा अंत्यसंस्कार झाला असावा असे मला वाटते.

या दोन्ही समाध्या सध्या भग्न व दुर्लक्षित अवस्थेत आहे.मोठ्या samadhi समाधीचा खालील चौथऱ्याचा एक कोपरा ढासळलेला आहे.त्यावरील शिवपिंड उघड्यावरच आहे. शिवपिंडीवरील घुमटीचे किंवा छत्रीचे दगड शेजारी पडलेले आहेत.दुसरीही समाधी अशीच दुरावस्थेत आहे. सिदोजीरावांच्या या समाधीला काटेकोर वकीली पध्दतीचा कागदपत्रांसहीत असलेला पुरावा नाही. पण मी वर मांडलेले मुद्दे याबाबत स्वयंस्पष्ट आहेत.तसेही बहुतांश शिवकालीन समाध्यांना काटेकोर परिक्षणावर टिकणारे, अगदी अचूक स्थानदर्शक ठरणारे ठाम पुरावे नाहीत हे इथे लक्षात घेण्यासारखे आहे.वंशजांकडून, स्थानिक जाणकारांकडून मिळणारी माहिती, परंपरागत चालत आलेली माहिती, मृत्यूचे ठिकाण व प्रसंग,समाधीचे स्थान,बांधकामाची पध्दत अशा बाबींवरुनच ही समाधीस्थळे निश्चित होत आलेली आहेत.

samadhi - सेनानी सिदोजीराव निंबाळकर 17

samadhi – सेनानी सिदोजीराव निंबाळकर 17

शिवाय सिदोजीरावांचे मूळ गाव असलेल्या भाळवणीत सिदोजीरावांची समाधी नाही. मी स्वतः भाळवणीला जाऊन सिदोजीरावांचे वंशज श्री.राजेंद्र निंबाळकर यांना भेटलेलो आहे. तेथील समाधीस्थळेही मी पाहिली आहेत.इतरत्र कुठेही सिदोजीरावांची समाधी नसल्याने ही पट्टा किल्ल्याजवळची समाधी त्यांचीच आहे असा निष्कर्ष मी निश्चितच मांडू शकतो.

“हीच समाधी खरी कशावरून?”यावर वादविवाद करण्यापेक्षा वरील वस्तुनिष्ठ बाबी; परिस्थितीजन्य व प्रसंगजन्य पुराव्यांसह ध्यानात घ्याव्यात. जोपर्यंत त्याच व्यक्तीची दुसरी एखादी समाधी पुराव्यासह समोर येत नाही किंवा आपण जी समाधी मानतो ती पुराव्यानिशी दुसऱ्याच व्यक्तीची आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत आहे हीच samadhi समाधी खरी मानून तिच्या जीर्णोद्धार, प्रसाराचे कार्य करायचे कि ती समाधी खरी नाहीच असं म्हणून तिला तशीच नष्ट होण्यासाठी सोडून द्यायचे?आणि ही खरी समाधीच असेल तर हा दुराग्रह आणि दुर्लक्ष किती वाईट ठरेल?आपण या महाराष्ट्राच्या पराक्रमी पुत्रांच्या आपल्यावर असलेल्या उपकाराची काही अंशी परतफेड समाधी जीर्णोद्धार करुन,त्यांची शौर्यगाथा घराघरात पोहोचवून करणार की शंका घेत आणि वादच घालत बसणार? इथे शंका घेणाऱ्याच्या हेतूवरच शंका येणार हे नक्की.

samadhi - सेनानी सिदोजीराव निंबाळकर 18

samadhi – सेनानी सिदोजीराव निंबाळकर 18

याही पुढचा मुद्दा म्हणजे एखाद्या व्यक्तीची samadhi समाधीच उपलब्ध नसेल किंवा समाधीच्या खरेखोटेपणाबद्दल वाद असेल तरी त्यामुळे त्या व्यक्तीचा सिध्द झालेला इतिहास, चरित्र,शौर्य, प्राणार्पण खोटे ठरत नाही.मग अशा व्यक्तीच्या पराक्रमाला,योगदानाला साजेसे स्मारक बांधायला काय हरकत आहे? उलट ते आपले कर्तव्यच आहे.आणि जर सिदोजीरावांच्या शौर्याचा आणि वीरमृत्यूचा इतिहास लक्षात घेतला तर ही पट्टा किल्ल्याजवळची त्यांची, अगदी संभाव्य का असेना, समाधी नीट करून तिथेच त्यांचे स्मारक बांधणे हेच योग्य ठरेल.

आपल्या मराठ्यांच्या स्वराज्यातील या वीरांसारखा हाती तलवार घेऊन पराक्रम गाजवायचा काही हा सध्याचा काळ नाही. पण त्यांची समाधीस्मारके जीर्णोद्धार करुन, नवी बांधून त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे तरी आपण गाऊ शकतो ना?असाच हा सिदोजीरावांच्या शौर्याचा, वीरमृत्यूचा पोवाडा या लेखातून मी लिहिलाय.शिवचरित्रातील अखेरच्या अध्यायातील काही अत्यंत महत्वाचे श्लोक सिदोजीराव आणि त्यांच्यासह धारातीर्थी पडलेल्या मराठा वीरांच्या रक्ताने लिहिले गेलेत.ते श्लोक उलगडून सांगणारा हा इतिहासनिष्ठ पोवाडाच मी आपल्यासमोर सादर केलाय.तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचो हीच शिवचरणी प्रार्थना करुन, सिदोजीरावांच्या अतुलनीय शौर्याला,वीरमृत्यूला मनापासून वंदन.

प्रवीण भोसले,सांगली
बी.ई.सिव्हिल, एम.ए. इतिहास
लेखक - मराठ्यांची धारातीर्थे
9422619791




संदर्भ - १.शिवभारत-परमानंद,२.जेधे शकावली,३.सभासद बखर,४.ऐतिहासिक वंशावळी व मराठी रियासत खंड १- गो.स.सरदेसाई,५.पर्णालपर्वत ग्रहणाख्यान - जयराम पिंडे,६. इतर विविध साधने.

Leave a Reply

error: Content is protected !!