Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

INDIAMAHARASHTRANewsPostbox Marathi

Sugar factory in Maharashtra – जरंडेश्वर जप्त ! ताई – अण्णा तृप्त !

1 Mins read

Sugar factory in Maharashtra – जरंडेश्वर जप्त ! ताई – अण्णा तृप्त !

 

जरंडेश्वर – Sugar factory in Maharashtra

 

लेखक : ज्ञानेश महाराव

 

 

कोरेगाव-सातारा येथील ’जरंडेश्वर साखर कारखाना’ची जागा, इमारत व इतर मालमत्ता ’ईडी’ने ’महाराष्ट्र राज्य को.ऑप.बँक’ घोटाळा प्रकरणात जप्त केलीय.

ह्या कारखान्याची मालकी सध्या खाजगी आहे. त्याचा ताबा राजेंद्र कुमार घाडगे यांच्याकडे आहे. ते अजित पवार यांचे ’मामा’ आहेत.

प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ( Sugar factory in Maharashtra )’जरंडेश्वर’ कारखान्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संबंध असल्याने

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणाच्या तपासानुसार, ही जप्तीची कारवाई झाली, असं ’ईडी’च्या अधिकार्यांचं म्हणणं आहे. ह्या कारवाईला

मूळच्या ’श्री जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना’च्या मुख्य प्रवर्तक व चेअरमन डॉ. शालिनीताई पाटील यांनी ’देवाची काठी वाजली’, अशी प्रतिक्रिया दिलीय.

९० वर्षांच्या शालिनीताई ह्या देवभोळ्या नाहीत. त्यांचे वडील ज्योत्याजीराव फाळके हे महात्मा फुले यांच्या ’सत्यशोधक’ विचाराचे प्रसारक आणि ’जलसा’कार होते.

त्यांचे बंधू वसंतराव फाळके हेही ’सत्यशोधक संस्था’ चालक आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री व थोर स्वातंत्र्यसेनानी वसंतदादा पाटील यांच्या शालिनीताई पत्नी आहेत.

१९८० ते ८३ ह्या काळात त्या ’इंदिरा काँगेस’च्या ए.आर.अंतुले आणि बाबासाहेब भोसले यांच्या मंत्रिमंडळात महसूलमंत्री होत्या.

’अ‍ॅडव्होकेट’ असलेल्या ताईंनी वयाच्या पासष्टीत ’डॉक्टरेट’ची पदवी मिळवलीय आणि ’राजमाता जिजाबाई भोसले’ यांच्यावर सर्वात प्रथम संशोधनात्मक ग्रंथ लिहिलाय.

अलीकडच्या काळात हुकमी गाजणारा ’मराठा आरक्षण’चा विषय राज्यव्यापी करण्याचं काम ताईंच्याच २०१३-१४ मधील भाषणांच्या मोहिमेनं केलंय.

ह्या सर्वात वरताण म्हणजे, सत्तेच्या राजकारणात पुरुषांच्या तोडीस तोड ठराव्यात, अशा त्या महाराष्ट्रातल्या सरस महिला धाडसी-धोरणी राजकारणी आहेत.

इतका लौकिक असूनही २०१० मध्ये (  Sugar factory in Maharashtra )’जरंडेश्वर’चा लिलाव झाला, तेव्हा तो व्यवहार शालिनीताईंनी मनाला लावून घेतला नाही.

कारण कारखाना लिलावापर्यंत येण्याची वेळ त्यांच्याच कारभारामुळे आली होती. त्यापूर्वी सहकारातल्या

अनेक महारथींच्या कारखान्यांचे लिलाव झाले होते किंवा होणार होते. त्या रांगेत तेव्हा ’राष्ट्रपती’ असलेल्या प्रतिभाताई पाटील

यांचा जळगावचा ’संत मुक्ताबाई सहकारी साखर कारखाना’ही होता. त्यामुळे (  Sugar factory in Maharashtra )’जरंडेश्वर’चा लिलाव शालिनीताईंनी फारसा मनाला लावून घेतला नसावा.

हा कारखाना २०१० मधील लिलावात ’गुरु कमोडीटी सर्व्हिसेस प्रा.लि.’ने ६५ कोटी ७५ लाख रुपयांत खरेदी केला.

तो ’बीव्हीजी कंपनी’ने भाड्याने चालवण्यास घेतला. ’बीव्हीजी’ म्हणजे हणमंत गायकवाड यांचा ’भारत विकास ग्रुप’!

पण तोटा येत असल्याने त्यांनी एक वर्षातच कारखान्यातून अंग काढून घेतलं. म्हणून हा कारखाना ’गुरु’ने

’जरंडेश्वर शुगर मिल प्रा.लि.’ला भाड्याने चालवण्यास दिला. ह्या ’शुगर मिल’मध्ये ’स्पार्कलिंग ऑईल प्रा.लि.’ ह्या कंपनीची भागीदारी आहे.

’स्पार्कलिंग’मध्ये अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा मोठा हिस्सा आहे. ’जरंडेश्वर शुगर मिल’ला कारखाना

चालवण्यासाठी ’पुणे जिल्हा सहकारी बँक’ने ४०० कोटी रुपयांचं कर्ज दिलं. त्यासाठी ’गुरु कमोडिटी सर्व्हिसेस’च्या मालकीची

कारखान्यासह २१४ एकर जमीन तारण ठेवली. त्यावेळीही अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि

जिल्हा सहकारी बँकांची शिखर संस्था असलेल्या ’महाराष्ट्र राज्य सहकारी बँक’चे संचालकही होते.

त्या संचालक मंडळात ’भाजप’चे माजी मंत्री, ’शिवसेना’चे माजी खासदार आणि ’काँग्रेस’चे बडे नेतेही होते. यातून ’मोडस ऑपरेंडी’ स्पष्ट होते.

आधी कारखाना कर्जबाजारी करायचा; मग तो लिलावात काढायचा; त्याचे ’व्हॅल्यूएशन’ कवडी किंमतीचे करायचे

आणि ते आपल्याच लोकांना पुढे करून, विकत घेऊन ताब्यात आणायचे! २०१४ मध्ये देशात ’मोदी सरकार’ आणि

राज्यात ’फडणवीस सरकार’ आल्यावर; ”२००५ ते २०१५ ह्या वर्षांत ’जरंडेश्वर’ पद्धतीने ४३ सहकारी साखर कारखाने विकण्यात आले,

’’ असा आरोप करीत शालिनीताई पाटील, कॉम्रेड माणिकराव जाधव आणि अण्णा हजारे हे एकत्रितपणे

कोर्टापासून ’सीबीआय- ईडी’पर्यंत १० हजार पानांच्या पुराव्यांसह चकरा मारू लागले. पण त्यातून फारसं काही निष्पन्न झालं नाही.

अखेरीस अण्णा हजारे केंद्र व राज्य सरकारच्या नाकदुर्या काढायला लागले. तेव्हा मुख्यमंत्री पदावर असणार्या

देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार, ’’महाराष्ट्र राज्य सहकारी बँक’मध्ये २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा’’ झाल्याचा

गुन्हा ’मुंबई आर्थिक गुन्हा शाखा’ने २२ऑगस्ट २०१९ रोजी दाखल केला. त्यात लाचलुचपत प्रतिबंधक

कायद्याची १३(१)(ब) आणि १३(१)(क) ही कलमंही लावण्यात आली होती. ह्या कलमांची तरतूद चौकशी-तपास ’ईडी’कडे

जाण्यासाठी करण्यात आली होती. त्यामुळे अजित पवार यांच्यासह ६९जणांना ’राज्य सहकारी बँक’ कथित गैरव्यवहाराबाबत

’आर्थिक गुन्हे शाखा’ने ’क्लीन चीट’ देऊन, ७२हजार पानांचा ’तपास बंद’ करण्याचा अहवाल देताच, ’ईडी’ने अतिदक्षतेने

’जरंडेश्वर’च्या मालमत्तेवर जप्ती आणली आणि ’महाराष्ट्र राज्य बँक घोटाळा’ प्रकरण पुन्हा ’ओपन’ केलं.

ह्या कारवाईला शालिनीताई ’देवाची काठी’ म्हणत ’ईडी’ला विरोधकांसाठी वापरणारा सत्तेचा हात दडवत आहेत.

कारण एव्हाना, त्यांच्यासह जाधव-हजारे हे ’महाविकास आघाडी’ला सत्तेवरून उतरवण्यासाठी उतावीळ झालेल्या

नरेंद्र-देवेंद्र जोडीचे हत्यार झाले आहेत. २०१५ पासून ताई- अण्णा- कॉम्रेड हे अ‍ॅड. तळेकर यांच्या माध्यमातून कोर्टाप्रमाणे

’ईडी’च्याही वार्या करीत होते. तेव्हापासून गेली सात वर्षं ’ईडी’वाले ह्या घोटाळ्याचा अभ्यास करीत होते का? ’आर्थिक गुन्हा शाखा’ने

’तपास बंद’चा अहवाल देताच, ’ईडी’चा अभ्यास पूर्ण झाला आणि कारवाई झाली. ह्याला ’देवाची काठी वाजणे’ म्हणायचे तर;

देवाची काठीही ’ईडी’सारखीच मोदी-शहांच्या हुकुमात आहे, असंच म्हटलं पाहिजे.

या वादाच्या निमित्ताने ’भाजप’चे राज्य प्रदेशाध्यक्ष व नेते चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलंय.

त्या पत्रात चंद्रकांतदादांनी संशयास्पद किंवा कथित गैरपद्धतीने विकलेल्या सहकारी साखर कारखान्यांची यादी दिलीय. ती अपूर्ण आहे.

’जरंडेश्वर’ कारखान्याच्या बाबतीत जसं घडलंय; तसंच सर्वच कारखान्यांच्या लिलाव व हस्तांतरणाबाबत घडलं आहे.

ह्याला नितीन गडकरी यांचे वर्धा येथील ‘महात्मा’ आणि भंडारा येथील ‘वैनगंगा’ हे साखर कारखाने अपवाद नाही.

जळगावचा ’संत मुक्ताबाई’ हा खाजगी साखर कारखाना शिवाजी जाधव यांनी ४९ कोटी रुपयांना विकत घेतला होता.

नंतर त्यात एकनाथ खडसे यांच्या कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे भागीदार झाल्या. या कारखान्याला जिल्हा बँकेने ५१ कोटी रुपये कर्ज दिले,

म्हणून ’मुक्ताईनगर’चे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी जानेवारी २०२०मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती.

’हमामखाने मे सब नंगे’ असाच प्रकार सहकारी कारखाने लिलावात घेणार्‍या खाजगी व्यक्ती आणि संस्थांनी केला आहे.

म्हणूनच (  Sugar factory in Maharashtra ) ’जरंडेश्वर’ची जप्ती हा गैरव्यवहारावर टाकलेला घाव नाही; तर तो ’महाविकास आघाडी’च्या सत्तेला हादरा देणारा डाव ठरला आहे.

कारण तो पवारांशी संबंधित आहे. राणे- नाईक- मोहिते आदि ’भाजप’वासी झाले नसते, तर त्यांच्यावर ’ईडी’ने कशाप्रकारे झडप घातली असती,

ह्याचा अंदाज ’जरंडेश्वर’ जप्तीने करता येऊ शकतो. अजित पवार हे ’पहाटेचा खेळ’ पुन्हा खेळण्यास तयार नाहीत,

ह्याची पक्की खात्री झाल्यामुळेच जप्तीसाठी ’जरंडेश्वर’ची निवड करण्यात आलीय. ती सहकारातल्या बाकीच्या घोटाळेश्वरांना

हादरवून ’भाजप’वासी करण्याच्या शुद्धीकरण मोहिमेसाठी योग्यच आहे. ’जरंडेश्वर’च्या प्रकरणात ’ईडी’ नेमकी कोणत्या कारणानी आली, त्याची ’स्टोरी’ही गमतीशीर आहे.

 

दादांचे मामा, येती कामा

राज्यातील ४३ सहकारी साखर कारखान्यांचा लिलाव हा त्यांनी ’राज्य सहकारी बँक’चे कर्ज थकवल्याने झाला होता.

उच्च न्यायालयाने आदेश दिल्याने हे कारखाने लिलावात काढले. रीतसर निविदा मागवून कारखान्यांचे लिलाव झाले.

ही लिलावाची प्रक्रिया आताही आणि ’फडणवीस सरकार’च्या कार्यकाळातही सुरू होती. कायद्याची परिभाषा आणि पद्धतीनुसार

विश्लेषण करायचे तर ’जरंडेश्वर’ लिलाव आणि पुढच्या मालकी-चालकी व्यवहारात काहीही अयोग्य झालेले नाही.

जे झाले ते कायद्याच्या अधीन राहूनच झाले आहे. स्पष्टच सांगायचं तर, ती सहकाराच्या खाजगीकरणाची खुलेआम प्रक्रिया होती.

त्याविरोधात ताई-अण्णा- कॉम्रेडची रड नाही की, फडणवीस-चंद्रकांतदादांची ओरड नाही. कारण ’मोदी सरकार’ नफ्यात चालणार्‍या

सरकारी कंपन्या उद्योगपती मित्रांसाठी मोडीत काढीत आहेत.

असो. अशा परिस्थितीत ’’राजकारण्यांनी कवडीमोल किमतीत कारखाने विकत घेतले,’’ असा दावा करीत उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली.

पोलिसांत फिर्याद झाली. यातील काही प्रकरणांचा निकाल लागायचा असताना ’ईडी’ने ’जरंडेश्वर’ जप्तीची कारवाई केली.

त्यासाठी ’भाजप’ने एकीकडे अजित पवार यांच्याविरोधात ’सीबीआय- ईडी’ चौकशी करण्याची मागणी केली.

दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जाऊन गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि त्यानंतर लगेच ’जरंडेश्वर कारखाना

’ जप्तीची कारवाई होते, हे एखाद्या चित्रपटाच्या ’स्क्रिप्ट’प्रमाणे झाल्यासारखे दिसते.

मुळात ज्या कंपनीने ’जरंडेश्वर’ कारखाना चालवायला घेतला होता, तिच्याकडून दुसर्‍याच कंपनीने तो चालवायला घेतला आणि

तिलाही तो चालविता न आल्याने तिसर्‍या कंपनीने तो चालवायला घेतला. लिलाव प्रक्रियेत तो कारखाना ज्यांनी चालवायला घेतला,

त्यांचा आता ह्या कारखान्याशी दुरान्वयानेही संबंध नाही, हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे. ’ईडी’ला कारवाईच करायची होती,

तर ती संबंधित कंपन्यांची मालमत्ता जप्त करून करायला हवी होती. ते न करता ज्या कारखान्यांचा व्यवहाराशी संबंध नाही,

तो कारखाना जप्त केल्यामुळे आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

’’हा कारखाना ’मेसर्स गुरु कमोडीटी सर्व्हिसेस प्रा.लि.’ यांनी चालवायला घेतला होता. या कंपनीशी आपला काहीही संबंध नाही,’’

हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं असून, त्यांनी आपली चौकशी करण्याचं खुलं आव्हान दिलं आहे.

’गुरु कमोडीटी’ला कारखाना चालविता आला नाही. त्यामुळे हा कारखाना ’बीव्हीजी’ ग्रुपच्या हणमंतराव गायकवाड यांनी चालवायला घेतला होता.

ते जरी अजित पवार यांचे निकटवर्तीय असले, तरी व्यवसायात ते राजकारण आणीत नाहीत. त्यांनाही हा कारखाना चालविता आला नाही.

व्यवसायात तोटा सहन करण्यात उद्योजकता नसते, हे बाळकडू त्यांनी अनेक उद्योगांतून सिद्ध केलंय.

त्यामुळे तोटा झाल्याने त्यांनी कारखान्यांतून अंग काढून घेतले. त्यानंतर हा कारखाना ( Sugar factory in Maharashtra ) ’जरंडेश्वर शुगर मिल प्रा. लिमिटेड’ला भाड्याने देण्यात आला आहे.

ह्या कंपनीत ’स्पार्कलिंग सॉईल प्रा. लिमिटेड कंपनी’ भागीदार कंपनी आहे.

’ईडी’च्या तपासानुसार, ’स्पार्कलिंग कंपनी’ ही अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित आहे.

राजेंद्र घाडगे हे अजित पवार यांचे मामा आहेत. त्यांनी कारखाना चालवायला घेतल्यानंतर त्यात ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून

’इथेनॉल’सह अन्य प्रकल्पांची उभारणी केलीय. साखर कारखान्यामुळे शेतकर्‍यांचा ऊस गाळप होत होता.

आता कारखानाच जप्त केल्याने कोरेगाव तालुक्यातील अर्थचक्र ठप्प होणार आहे. हे सारे ’ईडी’च्या कारवाईमुळे घडलंय.

’जरंडेश्वर’च्या लिलावाची प्रक्रिया सुरू असताना तेव्हा सातार्याचे लोकसभा सदस्य असलेल्या उदयनराजे भोसले यांनी कडक भूमिका घेतलेली होती.

‘हा कारखाना शेतकर्यांचा असून तो शेतकर्यांकडेच राहिला पाहिजे, दुसर्या कोणाला तो मी घेऊ देणार नाही.

अजितदादा हा कारखाना घेणार असून त्याला आपला विरोध राहील,’ असे ते बोलायचे. अजितदादांशी त्यांचं पूर्ण वैर होतं

आणि त्या वैराचं मुख्य कारण काय, हेही जगजाहीर होतं. हा कारखाना अजित पवार यांनी घेत नाहीत, हे स्पष्ट होताच,

’गुरु कमोडिटीज’चं नाव घेऊन, ”त्यांनाही ’जरंडेेश्वर’चा ताबा घेऊ देणार नाही,” असं बोलू लगले. या कंपनीचे मालक कोण,

हे न पाहाताच वक्तव्य केल्याने ’’छत्रपतींचा वारस दलितांना विरोध कसा करू शकतो?’’ अशी टीका उदयनराजे यांच्यावर होऊ लागली होती.

’गुरु कमोडीटीज’चे मालक गँगस्टर छोटा राजनचा धाकटा भाऊ दीपक निकाळजे हे होते. आताही उदयनराजे

’भाजप’चे राज्यसभा खासदार असल्याने ताई-अण्णांच्या सुरात सूर मिसळवतील. पण त्यापलिकडे काही करणार नाहीत. ते छत्रपतींचे ’तेरावे’ वंशज आहेत ना!

जप्तीची स्क्रिप्ट, पहा नीट

’राज्य सहकारी बँक’ आणि सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांना अडकविता येत नाही, ही आता ’भाजप’ची व्यथा आहे.

ह्या दोन्ही प्रकरणांत ८० तासांच्या सत्तेसाठी अजित पवार यांना ’क्लीन चिट’ देणार्‍या ’भाजप’ने आता ’मी बोडकी तर, तुला करीन रंडकी’,

ह्या राक्षसी सत्ताकांक्षेने; अजित पवार यांच्या ’सीबीआय-ईडी’ चौकशीची मागणी केली आहे. ‘राज्य सहकारी बँक’ व

सिंचन गैरव्यवहाराच्या आरोपातून काही साध्य होत नाही, असे वाटल्याने आता ’जरंडेश्वर’ आणि

सचिन वाझे प्रकरणावरून त्यांची कोंडी करण्याची व्यूहनीती रचली आहे.

’राज्य सहकारी बँक’मधील कथित घोटाळ्याचा ’क्लोजर रिपोर्ट’ सादर झालाय. त्यातील तक्रारदारानेच माघार घेतली आहे.

अशा परिस्थितीत ’जरंडेश्वर’चे प्रकरण पुढे आलं आहे. हा कारखाना शालिनीताई पाटील यांना कारखाना चालविता आला नाही,

म्हणून तोट्यात आणि लिलावात गेला. ह्या प्रक्रियेच्या वेळी अजित पवार हे ’राज्य सहकारी बँक’चे संचालक होते.

शालिनीताई आणि अजित पवार यांचं वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे अजितदादांनीच ’जरंडेश्वर कारखाना’ लिलावात काढला, असा ताईंचा आरोप आहे.

तो वस्तुस्थितीला धरून नाही.

त्यातच ’’२००९ च्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवालाही पवारच हेच जबाबदार आहेत,’’ असा शालिनीताईंचा ग्रह झाल्याने,

त्या १९९९ ते २००९ अशी १० वर्षं ’राष्ट्रवादी काँग्रेस’च्या आमदार राहूनही पवार यांच्या कडव्या टीकाकार झाल्यात.

’’पवार यांच्या नातेवाईकांनी ’जरंडेश्वर’ कमी किमतीत विकत घेतला,’’ ह्या त्यांच्या आरोपात पूर्ण सत्य नाही.

त्याचे कारण कारखाना एकाने विकत घेतला, दुसर्‍याने चालवायला घेतला आणि नंतर तिसर्‍याने तो भाडेपट्ट्याने घेतला.

लिलाव घेणारे पवार यांचे नातेवाईक नाहीत. त्यामुळे ’त्यांना कवडीमोल भावात कारखाना विकला,’ असे थेट म्हणता येत नाही.

या सगळ्या प्रकरणात प्रचंड आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप शालिनीताईंनी केला होता. मुंबई ’आर्थिक गुन्हे शाखा’च्या

पोलिसांनी या प्रकरणी नि:पक्षपणे चौकशी केली नसल्याचा आरोप करत तक्रारदार शालिनीताई पाटील यांच्यासह इतर

तीन जणांनी पोलिसांच्या ’क्लोजर रिपोर्ट’ विरोधात विशेष न्यायालयात याचिका याआधीच दाखल केली आहे.

या याचिकेवर अद्याप निकाल लागलेला नाही. त्यामुळे गुन्हा सिद्ध होण्याअगोदर एखाद्याला आरोपी ठरवणे योग्य नाही.

अजित पवार यांनी म्हटल्याप्रमाणे, ’’जरंडेश्वर इतक्याच क्षमतेचा मराठवाड्यातील कारखाना अवघ्या चार कोटी रुपयांत विकला गेला असेल

आणि ’जरंडेश्वर’ची किंमत त्यापेक्षा कितीतरी जास्त असेल, तर निव्वळ आरोप करण्यात अर्थ नाही!’’ शिवाय,

४३ कारखान्यांच्या विक्रीचा आरोप होता; तर ’ईडी’ने एकाच वेळी ४३ कारखान्यांची मालमत्ता जप्त करायला हवी होती.

परंतु ’ईडी’ने तसं केलं नाही. याचा अर्थ ’ईडी’च्या दिलेल्या ’स्क्रिप्ट’मध्ये तसं लिहिलेलं नव्हतं.

ताईंची चुकलेली हनुमान उडी

सातारा शहराच्या पूर्वेला २८ किलोमीटरवरील चिमणगाव (ता.कोरेगाव) येथे हा ’जरंडेश्वर साखर कारखाना’ आहे.

ह्या कारखान्याची निर्मिती मोठी ’सुरस आणि चमत्कारिक घटनांंनी भरलेली आहे. कोरेगाव हे शालिनीताईंचे ’माहेर’गाव.

१९८० मध्ये १८पक्षांनी एकत्र येऊन केलेल्या ’जनता पक्षा’चे ३] महिन्यांचे ’मोरारजी देसाई सरकार’ ’भाजप’ पूर्वावतारी

’जनसंघ’च्या दुहेरी (रा.स्व.संघ संबंध) मुद्यावर कोसळले! लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका जाहीर झाल्या. तेव्हा ’जनता पक्ष’

आतून विस्कळीत झाला होता. तशीच ’काँग्रेस’ही इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांच्यात दुभंगली होती.

सातारा-कराड हा यशवंतरावांचा हुकमी यशाचा मतदारसंघ. पण त्यांना तिथेच अडकवून ठेवण्यासाठी ’इंदिरा काँगेस’तर्फे

निवडणुकीत शालिनीताईंना ‘माहेरवाशीण’ म्हणून उभे केले होते. ती निवडणूक ताईंनी यशवंतरावांच्या विरोधात अद्वातद्वा बोलून गाजवली.

तरीही त्या पराभूत झाल्या. ह्या निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी शेतकर्‍यांच्या मागणीनुसार, कोरेगावात सहकारी

साखर कारखाना उभा करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर राज्यात झालेल्या (१९८० च्या) विधानसभा निवडणुकीतही ’इंदिरा काँगेस’चीच सत्ता आली.

अंतुले मुख्यमंत्री झाले. त्याने नाराज झालेल्या वसंतदादांची समजूत काढण्यासाठी शालिनीताईंना महसूलमंत्री करण्यात आले. ताई मंत्री होताच

त्यांनी ताबडतोबीने ’कोरेगाव तालुक्यात सहकारी साखर कारखाना’ स्थापन करण्याच्या कामाला लागल्या. ह्या कामात कोठेही अडवणूक होऊ नये,

यासाठी त्यांनी आपल्या प्रस्तावित सहकारी संस्थेचं नाव ’जवाहरलाल नेहरू सहकारी साखर कारखाना लिमिटेड’ असं ठेवलं.

साखर संचालकांकडून तो अर्ज मंत्रालयात आला. तोपर्यंत अंतुलेंच्या जागी बाबासाहेब भोसले हे मुख्यमंत्री झाले होते.

त्यांनी मग शालिनीताईंना शह द्यायचं ठरवलं.

त्यावेळी विधानसभेचे अध्यक्ष कोरेगावचे आमदार शंकरराव जगताप होते. त्यांना बाबासाहेबांनी सहकारी

साखर कारखाना स्थापन करण्यासाठी अर्ज करायला सांगितलं. त्यावेळी इंदिरा गांधी प्रधानमंत्री होत्या. तेव्हा साहजिकच

’शालिनीताईंच्या नेहरूंच्या नावाच्या प्रस्तावाला त्या मान्यता देतील,’ असं जगताप बाबासाहेबांना म्हणाले.

यावर नव्या नावाने बाबासाहेबांनी तोड काढली आणि इंदिरा गांधींच्या आईंच्या म्हणजे, ’कमला नेहरू

सहकारी साखर कारखाना या नावाने अर्ज करा,’ असं जगताप यांना सांगितलं.

त्यानुसार जगताप यांनी तयार केलेला अर्ज झटापट सर्व टप्पे ओलांडून मंत्रालयात आला.

शालिनीताईंच्या अर्जाआधी जगतापांचा अर्ज दिल्लीला पोहोचणं जरुरीचं होतं. ’तो स्वतः घेऊन दिल्लीला जावं,’ असं जगताप यांना सांगण्यात आलं.

’राज्य सरकार’कडून शिफारस झालेला तो अर्ज घेण्यासाठी सहकार खात्याच्या जावक कारकुनाच्या टेबलासमोर

विधानसभेचे त्यावेळचे हे अध्यक्ष बराच काळ तिष्ठत उभे होते.

ह्या शहाला काटशह देण्यासाठी शालिनीताईंनी न्यायालयीन लढाई सुरू केली. एवढ्यात वसंतदादा पाटील पुन्हा मुख्यमंत्री झाले.

या सर्वांचा परिणाम म्हणून शालिनीताईंचा अर्ज दिल्लीच्या ’क्यू’मध्ये दाखल झाला. पुढे यथावकाश ’केंद्र सरकार’कडून इरादा पत्र मिळाले.

यानंतर राज्य सरकारकडून शेअर भांडवल उपलब्ध होणं आणि दीर्घ मुदतीच्या कर्जांना सरकारची हमी या गोष्टी पुर्या व्हायच्या होत्या. त्यात बरीच वर्षं गमवावी लागली.

अशा प्रकारे दिवस जात असताना दिल्लीतील राजकीय समीकरणं बदलली. नेहरू-गांधी घराण्याची सद्दी संपलेला तो काळ होता.

मग औद्योगिक परवाना मिळणार कसा? शालिनीताईंनी आपल्या नियोजित सहकारी संस्थेचं नाव बदलून

ते ’श्री जरंडेेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड’ असं ठेवलं. हनुमान द्रोणागिरी पर्वत उचलून नेताना त्याचा काही भाग

चिमणगावच्या पश्चिमेला पडला. तो जरंडेेश्वर पर्वत झाला, अशी आख्यायिका आहे. जरंडेेश्वर म्हणजे हनुमान!

अखेर हा कारखाना लिलावात गेल्यामुळे शालिनीताईंना सहकारात ’हनुमान उडी’ मारता आली नाही.

पण त्याचं ‘लक्षवेधी उड्या’ मारणं वयाच्या नव्वदीतही सुरूच आहे. या कामी पूर्वी त्यांना ब.म. पुरंदरे यांनी बरीच साथ दिली. आता ’गेला बाजार’ अण्णा हजारे साथीला आहेत!

Also Visit : https://www.postboxindia.com

Also Visit : https://www.postboxlive.com

Subscribe and be a part of the movement to make wisdom go viral :

https://www.youtube.com/channel/UCto0

Subscribe our YouTube Channel :

https://www.youtube.com/channel/UCto0

Postbox India Under rule 18 of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021.

Ministry of Information & Broadcasting, Government of India. Postbox India is a News, Advertisement & Content Development Company.

Postbox India & Postbox live web Portal’s is Postbox India’s Leading Online Platform which is a best when it comes to Editorial, Blogs, Advertisement,

News Online. We Provide the best Authentic, Most Relevant Blogs and News for viewers who Always wants to read News Around the World.

Postbox India Services in to Media Sector, Government, Financial, Investment, Business Corporate Industry for News, Multimedia Content, National-International Advertising Products.

Website : https://www.postboxindia.com

Website : https://www.postboxlive.com

Facebook : https://www.facebook.com/indiapostbox

Instagram : http://www.Instagram.com/indiapostbox

LinkedIn : https://www.linkedin.com/in/postboxindia

Tumbler : https://postboxindia.tumblr.com/

Twitter : https://twitter.com/IndiaPostbox

Telegram : t.me/postboxindia

ज्ञानेश महाराव

Leave a Reply

error: Content is protected !!