Mastodon
My page - topic 1, topic 2, topic 3

🅿𝔬𝔰𝔱𝔟𝔬𝔵 ℑ𝔫𝔡𝔦𝔞

Also Visit for Trending News & Article  Postbox Live

NewsPostbox Marathi

survival of the fittest mpsc वास्तव आणि अभ्यास

1 Mins read

survival of the fittest वास्तव आणि अभ्यास

एम पी एस सी तील विलंबाला कंटाळून मृत्यू जवळ करणाऱ्या

स्वप्नील लोणकर विषयी

कौस्तुभ दिवेगावकर (आय ए एस, जिल्हाधिकारी उस्मानाबाद )

अधिकाऱ्याने व्यक्त केलेलं survival of the fittest

आपण सर्वांनी लक्षात घ्यावं असे मनोगत.

 

 

मी माझा upsc चा निकाल लागल्यापासून एक तत्व पाळत आलोय. शक्यतो भाषणबाजी करायची नाही.

अभ्यासाबद्दल बोलायचे. विद्यार्थ्यांना वास्तवाचे भान असले पाहिजे. IAS होणे एक मोठी संधी आहे.

पण ती संधी सर्वोच्च नाही. आपण कोणीही Hero नाहीत. आणि १ टक्क्यांहून कमी निकाल असणाऱ्या

परीक्षेत नव्व्यांनवांचे काय हा प्रश्न कायम विचारण्याचा माझा आग्रह आहे. स्वतःच्या प्रेमात पडून आपला

प्रवास पुन्हा सांगण्यासाठी लिहीत नाही. पण एका विद्यार्थ्याच्या मृत्यूने अस्वस्थ झाल्याने लिहीत आहे.

SBI क्लर्क, LIC ऑफिसर पासून जमतील त्या सर्व परीक्षा मी दिल्या आहेत. शिकवण्या घेतल्या आहेत.

स्वतःच्या पायावर उभे राहण्याची धडपड आपल्याला चुकलेली नाही.

मुळात काही तात्विक कारणांमुळे शेवटच्या वर्षाला इंजिनीअरिंग सोडल्यानंतर समोर अंधारच होता.

मराठी साहित्याच्या आवडीतून मुक्त विद्यापीठातून BA ची मिळवलेली डिग्री तेवढी होती.

एक परीक्षा पास झालो म्हणून ठीक आहे. पण मराठी साहित्य आवडते म्हणून त्याचे शिक्षण घेणाऱ्या

विद्यार्थ्याचे भविष्य नक्की काय आहे ?

आज एका शासकीय पदावर कार्यरत असताना हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे की खासगी

क्षेत्रापेक्षा शासकीय सेवेत पगार कमी आहेत. जबाबदारी अधिक आहे. व्यवस्था एक दोन लोकांनी बनत नाही.

ती असंख्य लोक, विचार, नियम, संस्था यातून आकाराला येते. तिला चेहरा म्हटलं तर असतो, म्हटलं तर नसतो.

यामुळे आपण ज्या व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी येऊ पाहतो त्या सोबत काही मर्यादाही आपल्याला

समजून घ्याव्या लागतील. पगारात भागवणे तर आहेच, त्याशिवाय अनेक प्रकारची आव्हाने,

टीका टिपण्या यांना तोंड देणे शिकत राहावे लागते. सातत्य आणि संयमाची परीक्षा कोणालाही चुकलेली नाही.

पण शासकीय नोकरीच्या पलीकडेही एक जग असते. आपल्या मागे आपले घर असते.

प्रत्येकाचा संघर्ष तितकाच महत्वाचा असतो. पण तो आपल्या जवळच्या लोकांपेक्षा महत्वाचा खरंच नाही.

निराशेच्या एका क्षणी त्यांचा विचार केला पाहिजे.

आपल्या आजूबाजूला स्पर्धा परीक्षांच्या लांब, थकवणाऱ्या प्रक्रियेत संधीची वाट पाहत असणारी

अनेक तरुण मंडळी दिसतील. त्यांच्याशी संवाद साधत राहावे लागेल.

आपल्याकडे आजकाल भाषा आणि सामाजिक शास्त्रातही १०० % गुण मिळतात.

काही महाविद्यालयांचे प्रवेशाचे मेरिट ९९% असते. मग पुढे चालून त्यातले काही थोडे मेडिकल

इंजिनीअरिंग च्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतात. इतर मागे पडतात. यशस्वी लोकांमधून अजून थोडे

यशस्वी उरतात. सतत पुढे जाण्याच्या स्पर्धेत शेवटी जीवन नावाच्या चाकोरीच्या मर्यादेचे भान विद्यार्थ्यांना

आणून देण्यात आपण कमी पडतो आहोत. यशाच्या व्याख्या बदलाव्या लागतील. चांगला माणूस म्हणून जगणे,

कष्ट करणे आणि कष्टाचा एकेक रुपया हे सामाजिक यश मानणारा समाज आपण निर्माण करणार आहोत का ?

Survival of the fittest कडून सर्वोदयाकडे जाण्याचा मार्ग सोपा नाही. पण समाज म्हणून

आपल्याला कधी ना कधी तो स्वीकारावा लागेल..

त्या तरुण मित्रास आदरांजली.

 

– कौस्तुभ दिवेगावकर( जिल्हाधिकारी उस्मानाबाद )

Leave a Reply

error: Content is protected !!