इंग्रजी सत्तेचे स्वागत असो – आङ्ग्लाधिराज्यस्वागतम् |

Dr. Swati Dravid

 

  संस्कृत साहित्य म्हटले की सामान्य वाचकाला – रसिकाला म्हणजे भासाची  कालिदासाची नाटके किंवा काव्ये आठवतात. कोणाला महाभारत आठवते, कोणाला भगवद्गीता देखील आठवते. आणखी कोणी पंचतंत्राच्या गोष्टी आठवू लागतात. परंतु, संस्कृत भाषेत यापेक्षा कितीतरी वेगळ्या कलाकृती आहेत. त्यांत अनेक आगळे विषय हाताळलेले दिसतात.

अशा कृतींपैकी एक म्हणजे ‘आङ्ग्लाधिराज्यस्वागतम्’!  हे उण्यापुऱ्या १२३ श्लोकांचे हे छोटेखानी काव्य आहे.१८९६ साली आर्ष प्रेस, विझागपट्टम (विशाखापट्टण) येथून श्री. एस.पी.एस. जगन्नाथस्वामी यांनी प्रसिद्ध केले आहे. या काव्याचे कर्ते परवस्तु वेंकटरंगाचार्य आहेत.या लेखक महाशयांचा उल्लेख महामहोपाध्याय असा केला आहे, यावरून वेंकटरंगाचार्य आपल्या विद्वत्तेसाठी जनमान्य होते हे दिसून येते. तसेच, या काव्याच्या शेवटी – आर्यवरगुरोः कृतिषु, असा स्पष्ट उल्लेख आढळतो यावरून त्यांनी इतरही काही कलाकृती रचल्या असाव्यात असे वाटते.

 

www.postboxindia.com
#victoriacoronation

मंगलाचरणाने काव्याची सुरवात केली की संपूर्ण काव्य निर्विघ्नपणे पूर्ण होते असा विश्वास संस्कृत साहित्यात प्रचलित होता. तीच परिपाठी या काव्यात देखील जपलेली दिसून येते. येथे, काव्याची सुरुवात करताना, वेंकटरंगाचार्यांनी थेट परब्रह्माची आळवणी केली आहे. ते म्हणतात –

अस्ति स्वस्तिप्रदं वस्तु परमानन्दचिन्मयम् |  

अनन्तशक्तिं लोकानां आदिकारणमव्ययम् || 

सर्व जगताचे कल्याण करणारी, सर्वोच्च आनंदाचे निधान असणारी, अव्यय अशी ब्रह्म नावाची सर्वश्रेष्ठ वस्तू जगताचे आदिकारण आहे; या तत्त्वाची देवता म्हणून स्तुती लेखकाने केली आहे. या एकमेवाद्वितीय तत्त्वापासून या जगतात दिसून येणारे विविधत्त्व उभे राहिले आहे, त्याच्यापासूनच सारी स्थावर – जंगम सृष्टी निर्माण झाली आहे व त्याचपासून मनुष्याच्या जीवनातील आनंद,दुःख ,ममता, लोभ इत्यादी निर्माण झाले आहेत. सृष्टी निर्माण झाल्यानंतर मानवाचा हळूहळू विकास होऊ लागला, जीवनात अधिकाधिक आनंद प्राप्त करणे व दुःखाचा परिहार करणे या भावना त्याच्या मनात देखील प्रबळ होऊ लागल्या.

www.postboxindia.com
#victoriacoronation

Also Read : https://postboxindia.com/shokanashak-ashoka-most-valuable-tree-in-india-from-ancient-time-dr-swati-dravid/

जी गोष्ट आपल्याला आवडते तीच इतर कोणाला आवडू लागली की हक्काची, मत्सराची, ईर्ष्येची भावना मनात रेंगाळू लागते, त्यातूनच मग पुढे भांडणे, सामर्थ्यप्रदर्शन इत्यादी दुर्गुण प्रामुख्याने पुढे येऊ लागतात. आचार्य वेंकटरंगाचार्य, हाच मुद्दा पुढे नेताना सांगतात की या अशा परिस्थितीत न्यायाची बाजू प्रबळ राहावी, वातावरणात शांतता टिकावी यासाठी उपाय म्हणून दंड या संकल्पनेची निर्मिती करण्यात आली व राजा या संकल्पनेचा प्रमुख झाला. दंड म्हणजे शिस्त, नियम किंवा कायदा. समाजात राजा नियम तयार करतो, लागू करतो म्हणून तोच या कल्पनेचा महत्त्वाचा पैलू होता. आचार्य पुढे सांगतात, ह्याच कल्पनेवर मनुने आपल्या ग्रंथाचा सातवा अध्याय रचला (मनुस्मृती – सातवा अध्याय). कोणे एके काळी जेव्हा पृथ्वीतलावर निर्नायकी पसरली होती,सर्वत्र अंदाधुंदीचे वातावरण पसरले होते तेव्हा प्रजेच्या रक्षणासाठी ईश्वराने राजाची निर्मिती केली. समाजाचा सांभाळ करायला त्याच्या हाती कायदा, सुव्यवस्थेचे साधन दिले, पण या कायद्याचे पालन करत असताना जर एखादा राजा ढिला पडला तर त्या समाजात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होते, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात राहत नाही, सर्वत्र बळी तो कान पिळी असे वातावरण पसरते व बलवन्तांची जिथे तिथे सरशी होऊन दुर्बलाचे हाल कुत्रा खाईनासे होतात. हे सारे वातावरण आपल्या राज्यात नको असेल तर राजाने दक्ष, शिस्तप्रिय असले पाहिजे. कायद्याचे राज्य आपल्याकडे राहील याची त्याने काळजी घेतली पाहिजे. राज्यात असे यथायोग्य वातावरण राहावे यासाठीच प्रजाजन राजाला कर देत असतात.

www.postboxindia.com
#victoria

या जमलेल्या करातून राजा आपल्या प्रजेतील दिनदुबळ्यांची काळजी घेतो, प्रजेचे सर्वतोपरी रक्षण व्हावे म्हणून निरनिराळ्या संस्था /विभाग स्थापन करतो, त्या विभागांना बळकटी मिळावी म्हणून या जमलेल्या कराचा उपयोग होत असतो. म्हणूनच राजा हा चांगल्यांसाठी चांगला तर वाईट, दुष्ट लोकांसाठी अत्यंत वाईट असतो. देवादिकांनी सामान्य,मर्त्य माणसासाठी जी कामे करावयाची ती सारी कामे या भूतलावर राजाच करीत असतो म्हणून राजाला पृथ्वीवरील देवांचा अंश म्हटले जाते. त्याच्याठायी यम, वरूण,सूर्य, इंद्र, वायू,चंद्र इत्यदी साऱ्या देवतांची वैशिष्ट्ये एकवटली आहेत असे याकरिताच म्हटले जाते. अशा प्रकारे, मनुस्मृतीतून राजनीतीशास्त्राचे जे वर्णन केले आहे त्यातील यथायोग्य विचार आचार्यांनी आपल्या शब्दांत पुन्हा मांडले आहेत.

www.postboxindia.com
#victoria

त्यानंतर आचार्य पुढे सांगतात , अशा प्रकारे गुणवैशिष्ट्ये ज्यांच्या अंगी आहेत असे अनेक राजे या भारतवर्षात प्राचीन समयी होऊन गेले.  या सर्व नृपश्रेष्ठांनी आपल्या गुणांनी स्वतःच्या राज्याचाच नव्हे तर भारतभूमीचा गौरव वाढविला. आचार्य परवस्तु वेंकटरंगाचार्यांनी पुढे भारतमातेच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचे वर्णन करणारे काही श्लोक रचले आहेत. त्यापुढे ते म्हणतात, प्राचीन काळी भारतवर्षात विविध विद्या,कला आणि शास्त्रे यांचा खूप अभ्यास होत असे. लोखंडाची कामे करणारे कारागीर केवळ त्या काळी नव्हे तर नंतरही आपले नैपुण्य टिकवून होते. अस्त्रे, शस्त्रे निर्माण करणे, ती चालविण्याबाबत प्रशिक्षण देणे याबाबतीत आपला देश पुढारलेला होता. ते पुढे असेही सूचित करतात की हरिश्चंद्र, नल इत्यादी सद्गुणी राजे आपल्या देशावर राज्य करीत होते, त्यांच्या चारित्र्यावर जणू संपूर्ण युग तोलून धरले गेले. परंतु, काळाचं चक्र फिरलं,समाजातले अवगुण हळूहळू वाढीस लागले, राजांचाही धर्म दुर्बल झाला. प्रजेच्या हिताऐवजी स्वतःचे युद्धकौशल्य आजमाविण्यासाठी, आपल्याकडील सेनेच्या पराक्रमाचे नगारे सर्वत्र निनादावेत यासाठी युद्धे ‘खेळली’ जाऊ लागली. राजेमंडळींनी आपापसात लढून आपले सामर्थ्य कमी करून घेतले.

 

Also Read : https://postboxindia.com/meaning-of-margashirsha/

या युद्धांचे परिणाम भयानक होते त्यामुळे विचार करून त्यानंतरच्या राजांनी लढाया करणे टाळले. मात्र त्यामुळे समाजात कमालीचे शैथिल्य पसरले आणि अशा वातावरणात कोणालाच आपली ठरलेली कामे नीट करता येईनात. त्यामुळे समाजात दुर्गुणांचे प्राबल्य वाढू लागले. अशा परिस्थितीत देवानेच चांगल्या, चौकस, हुशार माणसांना इतर देशात जन्माला आणले. त्या मंडळींनी निरनिराळे विध्वंसक शस्त्रास्त्रांचे शोध लावले, स्वतःच्या देशाचे, समाजाचे नाव उज्ज्वल व्हावे यासाठी ही मंडळी झटू लागली. म्हणजेच या नव्या शास्त्रांच्या वापरासाठी नवी भूमी शोधू लागली.  त्यातूनच आपल्या देशावर परकीयांची आक्रमणे होऊ लागली. या सर्व गोंधळातून एतद्देशीयांना वाचविण्यासाठी ईश्वराने न्यायी, गुणशील अशा इंग्रजी लोकांची योजना केली. त्यांच्या त्यांच्या राज्यकर्त्यांकडून प्रेरणा घेऊन हे वीर समुद्रमार्गाने आपल्या देशात आले. त्यांनी या देशात योग्य असा अंमल प्रस्थापित केला. आचार्यांच्या मते ‘आता या संपूर्ण देशावर राज्ञी व्हिक्टोरिया राज्य करते आहे, हे खरोखर परमेश्वराचे आभारच आहेत’ , शिवाय त्यांच्या मते कुठे इंग्लंड आणि कुठे आपला देश, तरीसुद्धा त्यांनी आधिपत्यासाठी आपल्याला निवडले यात दैवी योजना मानली पाहिजे. यानंतर आचार्यांनी इंग्रजाच्या प्रगाढ अशा नौकानयन- तंत्राबद्दल कौतुकाचे शब्द काढले आहेत. खगोलशास्त्र व यंत्रशास्त्र यांत केलेल्या प्रगतीमुळेच इंग्रजांना अथांग अशा समुद्रावर प्रभुत्व मिळविणे शक्य झाले, हे ते मुद्दाम नमूद करतात    –

अम्बुमार्गे निरालम्बे देशकालविभागयोः |

ज्योतिर्यन्त्रादिविद्याभिर्विज्ञानं साधु साधितम् || ६६ ||

 

www.postboxindia.com
#victoriacoin

शिवाय त्यांनी लोखंडापासून तयार केलेल्या दिशेचे ज्ञान करून देणाऱ्या होकायंत्राची तसेच लांबच्या गोष्टी जवळ दाखविणाऱ्या दुर्बिणीची सुद्धा दखल घेतली आहे. समुद्राच्या तळाशी गेलेल्या आणि त्यामुळेच सापडणे कठीण झालेल्या वस्तू पुन्हा प्राप्त करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या घंटायंत्राचा – Divers’ Bell चा उल्लेख देखील त्यांनी केला आहे. या जगात असणाऱ्या वेगवेगळ्या देशांचे, शहरांचे अचूक  भौगोलिक स्थान सांगणाऱ्या अक्षांश-रेखांश पद्धतीचा उल्लेख करत त्यांनी  भूगोलाविद्येत घडून आलेल्या सुधारणांना नावाजलं आहे. तापमापक, वाफेवर चालणारी यंत्रे यांचा उल्लेख करत, या अशा शास्त्रांच्या प्रगतीमुळे माणसाचे ज्ञान वाढले, त्याची कूपमंडूक वृत्ती नाहीशी झाली, असे निरीक्षण आचार्यांनी नोंदविले आहे. याच यंत्रांमुळे इंग्रजांनी समुद्राला एखाद्या आरशाप्रमाणे सहजप्राप्य करून टाकले हे सांगत यांमुळेच इंग्रज सहजतेने स्वतःच्या देशापासून ते आपल्या देशापर्यंत लीलया ये-जा करू शकतात असे नमूद केले आहे. इंग्रजांनी केलेल्या अशाच सुधारणांमुळे आपल्याकडील यात्रेकरू वनप्रदेशातील- दुर्गम भागांतील यात्रा सुखाने करू शकतात, हे त्यांनी आवर्जून सांगितले आहे –

पुण्यक्षेत्रादियात्रासु प्रस्थिता श्रद्धया पुरा |

जनावनाद्रिमार्गेषु श्वापदैः कति नाशिताः ||७५||

चांगले व सुरक्षित रस्ते, नदीनाल्यांवर बांधलेले उत्तम पूल, चांगल्या पद्धतीने विकसित केलेली संदेशवहन यंत्रणा यांनी माणसाचे आयुर्मान वाढले, त्याच्या आयुष्यातल्या चिंता, काळज्या नाहीशा झाल्या याचे श्रेय ते इंग्रज सरकारला देतात. नद्यांवर बांध बांधल्यामुळे, कालवे काढल्यामुळे देखील माणसाचे आयुष्य सोपे झाले, या कालव्यांत उद्वहन करून मोठमोठ्या नावा पुढे समुद्रात किंवा नद्यांत नेऊन ठेवायची सोय विकसित झाल्याने त्या नावांचे पर्यायाने माणसांचे, सामानाचे दळणवळण वाढले, कालव्याच्या पाण्याने जमिनी लागवडीखाली आणता आल्या. रेल्वे किंवा आगगाडीने तर लांबचे अंतर थोड्या वेळात कापायची मोठी सोय निर्माण झाली. बिनतारी संदेश यंत्रणा, छायाचित्रण या सुविधांचा उल्लेखही इंग्रजांनी भारतात आणलेल्या सुविधांच्या या यादीत होताना दिसतो. शिवाय, इंग्रजांनी छपाईच्या कलेला प्रोत्साहन देऊन पारंपरिक शिक्षण पद्धतीला मदतच केल्याचे आचार्य म्हणतात. या सरकारच्या उदार धोरणांमुळे देवळांतून जतन केलेली हस्तलिखिते टिकवता आली, हेही त्यांनी आवर्जून सांगितले आहे.

www.postboxindia.com
#victoriacrown

 या सर्व शोधांना, औद्योगिक सुधारणांना पाठींबा देणाऱ्या राणी व्हिक्टोरियेला समस्त जगताची साम्राज्ञीच म्हटले पाहिजे असे आग्रहाचे मागणे त्यांनी केले आहे. राणीच्या चक्रवर्ति पदावर दिल्लीदरबारी शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती त्यांनी पुढे दिली आहे. या निमित्ताने, आचार्यांनी पूर्ण भारतवर्षाकडून राणीचे अभिनंदन केले आहे, इंगजी साम्राज्यावर  कोणत्याही प्रकारची बाधा येता कामा नये, या राष्ट्राची कायम भरभराट होवो अशी सदिच्छा व्यक्त करून हे काव्य संपले आहे.

www.postboxindia.com
#victoriacoin

आचार्य वेंकटरंगाचार्य (१८२२- १९००) यांनी हे काव्य राणी व्हिक्टोरिया हिचा राज्यारोहणप्रसंग साजरा करण्यासाठी इ.स. १८७७ च्या सुमारास लिहिले, होते,असे दिसते. हे काम त्यांच्याकडून स्थानिक -प्रादेशिक सरकारांनी करून घेतले असेल  दिल्ली दरबारी अशा प्रशस्तीपर काव्यांची यथायोग्य संभावना होईल, त्यानिमित्ताने प्रादेशिक सरकारे, गव्हर्नर इत्यादी मंडळींना आपली निष्ठा दाखविता येईल,असा  विचार यामागे असेल.किंवा, आचार्यांनी स्वतःच हा उपक्रम हाती घेतला असेल. हे काव्य रचल्याबद्दल कदाचित त्यांच्यावर इंग्रज सरकारची कृपा देखील झाली असेल. आचार्य वेंकटरंगाचार्य हे अतिशय विद्वान असे वैष्णव परंपरेतील लेखक होते. त्यांनी अनेक ग्रंथ रचल्याचे तेलुगु साहित्य इतिहास सांगतो. लेखक म्हणून त्यांनी  काव्ये, नाटके, खंडकाव्ये असे अनेक प्रकार हाताळले आहेत.यावरून त्यांची उत्तम प्रतिभा लक्षात येते, पारंपरिक ज्ञानाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी स्वतःचा छापखाना – आर्ष प्रेस, देखील त्यांनी काढला होता. प्रस्तुत काव्य त्याच छापखान्यात छापले गेले आहे. म्हणजे त्यांनी हे काव्य स्वतः रचले तसेच  छापून प्रसिद्धही केले.

 

 

Also Read : https://postboxindia.com/sanskrit-literature/

परकीय सत्तेची भलामण करणारं हे काव्य वाचकाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतं. आचार्यांनी हे काव्य का लिहिलं असावं, कोणत्या परिस्थितीत लिहिलं याचा नेमका उलगडा आता होऊ शकणार नाही. मात्र, त्यांनी केलेली भारताच्या वैभवशाली भूतकाळाची वर्णने वाचकाच्या मनात आनंद,अभिमान निर्माण करता. तर आपल्या देशाच्या ह्रासाची त्यांनी केलेली कारणमीमांसा आपल्याला अंतर्मुख करते. आपला गौरवशाली इतिहास आठवत असतानाच विविध क्षेत्रांत इंग्लंडने साधलेली औद्योगिक प्रगती वर्णन करताना त्यांची लेखणी अगदी गुंगून गेली आहे. यावरून, या सर्व सुधारणांचे केवढे अप्रूप  सर्वसामान्य माणसाला वाटत असेल याचा अंदाजही येतो. कोणत्याही देशाचा बौद्धिक वारसा म्हणजे त्या देशात निर्माण झालेली हस्तलिखिते. त्यांचे संवर्धन इंग्रज सरकार अधिक चांगल्या पद्धतीने करते, हा शेरा पुरातन वस्तूंच्या रक्षणाबाबत भारतीयांची उदासीनता दाखविणारा आहे,किंबहुना, ही परिस्थिती आजही फारशी बदललेली नाही, हे दुर्दैव आहे. सहज सोपी भाषा हे या काव्याचं वैशिष्ट्यं आहे. इंग्रजी आमदानीतल्या सुधारणा वर्णन करत असताना सुद्धा त्यांनी काव्य रूक्ष होऊ दिलेले नाही. आचार्य परवस्तूंचा प्राचीन भारतीय साहित्य व शास्त्रे यांचा अभ्यास देखील या काव्यातून जाणवत राहतो.

www.postboxindia.com
#victoriamemorialkolkata

गेल्या शतकात रचल्या गेलेल्या या काव्याकडे भारतीय साहित्याच्या इतिहास-लेखनाचा एक लक्षणीय पैलू म्हणून विचारात घ्यायला हवे.

 

 

 

 

परकीय सत्तेची भलामण करणारे हे काव्य कोणत्याही परिस्थीतीत समर्थनीय ठरू शकत नाही, याची लेखकाला नम्र जाणीव आहे. वाचकांनीही या लेखाकडे जुन्या, दुर्मिळ साहित्यकृतींचा परिचय करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणूनच पहावे, ही विनंती.
या लेखात व्यक्त झालेली मते सर्वस्वी मूळ लेखकाची आहेत, याची नोंद घ्यावी.

 

 

Dr. Swati Dravid 

Postbox India 

Sanskriti dhara 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here