Durgabai - दुर्गाबाई भागवत
Durgabai - दुर्गाबाई भागवत
Durgabai - दुर्गाबाई भागवत

Durgabai – ‘दुर्गा’ नावाची सरस्वती

Durgabai - 'दुर्गा' नावाची सरस्वती - भारतकुमार राऊत

Durgabai – ‘दुर्गा’ नावाची सरस्वती

 

 

Durgabai – ‘दुर्गा’ नावाची सरस्वती – भारतकुमार राऊत


468x60 Dedicated Server Banners

ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक अशा शब्दांत केलेले ज्यांचे वर्णन केवळ अर्धवटच ठरेल, अशी एक अचाट

महिला Durgabai दुर्गाबाई भागवत यांचा आज स्मृतीदिन.

दुर्गाबाइंर्च्या निकट सहवासात राहून त्यांच्या अफाट अनुभवाबरोबरच त्यांच्या विलक्षण मनस्वी स्वभावाचे

दर्शन घेण्याचे भाग्य मला लाभले. त्यातील काही क्षण ‘स्मरण’ या स्मृतिचित्रसंग्रहात टिपले. तेच आज सादर:

‘दुर्गा’ नावाची सरस्वती

मुंबईत गिल्डर लेनच्या मुंबई महापालिकेच्या कर्मचारी वसाहती शेजारच्या गल्लीतून नऊवारी इरकली साडी,

खाली कॅनव्हासचे लाल बूट, खांद्याला शबनम झोळी, बगलेत छत्री आणि दुसऱ्या हातात पुस्तकांचा गठ्ठा अशा

अवस्थेत लगबगीने चालणारी एक महिला सकाळी हमखास दिसायची. पण गडबडीत चालतानासुद्धा रस्त्यावर

अस्ताव्यस्त विखुरलेली लाल पांगाऱ्याची फुले आपल्या पायदळी तुडवली जाऊ नयेत, याची काळजी ही

महिला घेताना दिसायची. वाटेत कोणी नमस्कार केला, तर अंमळ थांबून सुहास्य वदनाने पाहायची. पुन्हा

आपल्याच विचारात पुढे चालायला लागायची. हे असे कित्येक वर्षे चालले होते. आपल्याला दररोज दिसणाऱ्या

या Durgabai बाई आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या विचारवंत व ज्ञानतपस्विनी आहेत, हे गिल्डर लेनवासियांना

अभावानेच जाणवले असेल.

468x60 Dedicated Server Banners

या महिलेचे नाव दुर्गा भागवत.

न हि ज्ञानेन सदृशं
पवित्रमिह विद्यते।
तत् स्वयं योगसंसिद्ध:
कालेनात्मनि विन्दन्ति।।
वीर अर्जुनाला गीतेच्या चौथ्या अध्यायातील ज्ञानसंन्यास योगात भगवान श्रीकृष्णांनी केलेला उपदेश प्रत्यक्ष

आचरणात आणण्याचे जणू आजन्म व्रत घेतलेल्या दुर्गाबाई भागवत यांची ईहलोकीची यात्रा २००२ मध्ये

आजच्या दिवशी संपवली. पण महाभारताचे व्यासपर्व वाचताना, शिशिरातील पानगळ पाहताना किंवा

वसंतातली पोपटी, हिरवी नवपालवी पाहताना त्यांची आठवण आली नाही, असे कधी होतच नाही. ‘…जीवन

अखंड असते. मरण नवनवी अस्तित्त्वे घडवून जीवनाचे चिरंतनत्व अबाधीत राखते,’ असे साक्षात मृत्यूचेही

आश्वासक तत्त्वज्ञान आत्मसात करुन ते `पैस’मधून आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवणाऱ्या Durgabai दुर्गाबाई’

नव्वदीचे दीर्घ आयुष्य यथेच्छ जगल्या, हे विशेष.


468x60 Dedicated Server Banners

Also Read : https://postboxindia.com/chatak-and-monsoon-sunil-tambe/

मृत्यूच्या काही वर्षे आधीपासून त्यांना वार्धक्यामुळे येणाऱ्या कैक व्याधींनी ग्रासले व सार्वजनिक जीवनापासून

दूर सारले हे खरे. पण दुर्गाबाइंर्ना त्याची क्षिती नव्हती. ‘I have played my innings’ असे त्या डोळे मिचकावत

म्हणत आणि स्वत:शीच मनमुराद हसत. जीवनाची तृप्ती त्यांनी अनुभवली, तशीच त्याच्या शेवटाची सुरुवात झाली आहे,

हेही त्यांनी मान्य केले. त्यामुळेच खोकल्याची जोरदार उबळ आली, तरी त्या कधी दु:खी झाल्याचे जाणवले नाही.

त्यांच्या या अखेरच्या कालखंडात एका संध्याकाळी त्यांना भेटायला गेलो, तर त्या क्षीण आवाजात दिवसभरच्या

बातम्यांची चौकशी करत होत्या. अखेर त्यांना खोकल्याची वारंवार उबळ येऊ लागली, तेव्हा त्यांनी मला

जायला सांगितले. ‘हे माझे भोग आहेत, त्यांचा उपभोग मला एकटीलाच घेऊ देत. त्यात प्रेक्षकांचा वाटा

नको’, असे म्हणत त्यांनी कुस बदलली. पण ज्या काळात त्या चालत्या-बोलत्या होत्या, त्या काळात

Durgabai दुर्गाबाईंनी आपल्या चतुरस्त्र व्यासंगाने, अफाट ज्ञानाने, सिद्धहस्त लेखणीने आणि


468x60 Dedicated Server Banners

स्फष्टवक्तेपणाने अवघ्या महाराष्ट्राला मोहित व अचंबित केले होते.

महाराष्ट्र ही तर ज्ञानमहर्षींची खाण. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, महामहोपाध्याय पां. वा. काणे,

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. रा. ना. दांडेकर या सारख्या प्रकांड पंडितांची व वाचस्पतींची फळीच गेल्या

शतकात महाराष्ट्राने उभी केली. दुर्गाबाई याच आघाडीवरील बिनीच्या शिलेदार. अर्थात Durgabai दुर्गाबाईंचं

वैशिष्ट्य हे की त्या केवळ पुस्तकी पंडित, व्यासंगी वा विदुषी नव्हत्या. त्यांच्या ज्ञानाला महर्षी व्यासांना

अभिप्रेत असलेल्या कर्मयोगाचा पोत आणि आणि सृजनशीलतेची भरजरी किनार होती. त्यामुळेच

त्यांचे पांडित्य केवळ ग्रंथ लिखाणापुरते मर्यादित व तत्त्वज्ञानापाशी अवगुंठित न होता ते दैनंदिन

जीवनाशी नाते सांगू शकले.


468x60 Dedicated Server Banners

‘ऋतुचक्र’ लिहिताना दुर्गाबाई वाचकालाही आपल्यासमवेत घेऊन निघतात. वसंत आणि वर्षा ऋतूंना

तर निसर्गाने भरभरून दिलेच. त्यांचे वर्णन त्या करतातच, पण माघात येणाऱ्या शिशिराच्या पतझडीतही

दुर्गाबाईंर्ना निसर्गाची अदाकारी आणि सौंदर्य दिसत राहते. ‘युगायुगातून सतत वाहात असणारे वात्सल्य

त्या पाखरांच्या अत्युकृष्ट क्षणातही त्यांना या काट्याकुट्यांना सतत जखडून टाकीत असते. वरून हा सुके

निष्पर्णतेचे कवच धारण करणारा माघ अमोघ सृजनशीलतेने भारलेला आहे’, हे वर्णन केवळ कवीच करू

शकतो. दुर्गाबाइंर्नी अशा तरल मनाचे व शब्दप्रतिभेचेच दर्शन आपल्या लिखाणातून वारंवार घडवले.

Also Read : https://postboxindia.com/basic-education-is-strictly-compulsory-in-maharashtra-shahu-maharaj/

‘व्यासपर्व’ हे खरे तर महाभारतातील विविध व्यिक्तरेखांवरील तात्त्विक भाष्य. या कठीण विषयावरील

तितक्याच गहन लिखाणातही दुर्गाबाइंर्मधील भावुकता कायम डोकावत राहते.


468x60 Dedicated Server Banners

युधिष्ठिराच्या अंतकाळाचे वर्णन त्यांनी अशाच भावुकतेने केले आहे. ‘… आणि वाटसराप्रमाणे आपल्याच त्या

अरुंद पाऊलवाटेने सतत चालत राहिला. अखेरची वाट फार निरुंद होती. चढणीची होती. कारुण्य प्राणांना

भिडते तेव्हाच धर्माचा आढळ होतो. शांती आपोआप दावू लागते. त्याच शांतीचा घुटका घेत हा पथिकही

मुक्त झाला’. अशी अनेक वर्णने त्यांच्या लिखाणात वारंवार भेटत राहतात आणि डोळ्याच्या कडा नकळत

ओलावतात. द्रौपदीच्या निषेधार्ह व गर्हणीय वस्त्रहरणाचा प्रसंग असो वा पांडवांच्या अज्ञातवासाच्या कालखंडातील

बृहन्नडेच्या मानसिकतेचा. अभिमन्यूच्या मृत्यूनंतर पांडवांच्या छावण्यांमधील राणीवशातील आक्रोशाचा प्रसंग

असो वा रथचक्र चिखलातून बाहेर काढताना ‘माझ्यावर शरसंधान करू नकोस रे’ अशी विनवणी वीर

अर्जुनाकडे करणाऱ्या महारथी कर्णाची मनाची घालमेल; दुर्गाबाइंर्च्या समर्थ पण नाजुक शब्दकळेने सारे

काही असे टिपले की, ते थेट काळजाला जाऊनच भिडते. दुर्गाबाई ज्ञानाच्या उपासक तर खऱ्याच.

पण केवळ जे ज्ञान समोर आले, ते तसेच न स्वीकारता त्या नव्या ज्ञानाच्या शोधात सतत भटकत राहिल्या.

अवगत असलेल्या ज्ञानाला


468x60 Dedicated Server Banners

आव्हानही देत राहिल्या. कधी या भटकंतीत त्यांनी मैलोन्मैल कडेकपारीतून पायपीट केली. तापी नदीपासून

महानदीपर्यंतचा जंगलमाळ त्यांनी तुडवला. कधी त्यांनी बौद्धिक भटकंती केली.

मठस्थ बौद्ध भिख्खू आणि भिक्षुणीच्या आचार-नियमांनी त्यांना मोहित केले होते. त्यांचा सखोल

अभ्यास करण्यासाठी त्या पाली भाषा शिकल्या. आपले ज्ञान केवळ ग्रंथांच्या पानांमध्ये कैद न होता, ज्यांना वाचणे शक्य होत नाही, अशापर्यंतही पोहोचावे, म्हणून सार्वजनिक जीवनात सदैव सक्रिय राहिल्या. प्रकृती साथ देत होती, तोवर त्या राज्यातील शहरांपासून गाव-खेड्यांपर्यंत व्याख्यानमालांमध्ये सहभागी होत होत्या. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवांमध्ये भाषणे देत होत्या. या कामाला त्या ‘यज्ञकर्म’ मानीत व त्यात नित्य समिधा वाहण्यासाठी जीवनाचे रान करीत. त्या चालत्या-फिरत्या होत्या, त्या काळात त्या फोर्टमधील एशियाटिक लायब्ररीत हमखास दिसत. त्यांची बसण्याची जागाही ठरलेली होती. सोबत अशोक शहाणे असत. तिकडे दुर्गाबाईंना भेटणे हा एक अलौकिक आनंद होता. अनेक ज्ञानसाधक तिथे दुर्गाबाइंर्शी बोलून आपल्या शंकांचे निरसन करून घेत. त्यांना काही प्रश्नही विचारत. महात्मा गांधींपासून अॅरिस्टॉटल, गौतम बुद्धापासून मानवेंद्रनाथ रॉय आणि डार्विनपासून भीष्माचार्यांपर्यंत दुर्गाबाई सहजपणे जे बोलत त्यात गहन अर्थ दडलेला असे. फालतू विषय अवघड आणि अवजड करुन श्रोते, वाचकांना बुचकळ्यात पाडणारे तथाकथित विद्वान व पढत पंडित भरपूर असतात. दुर्गाबाईंची जातकुळी वेगळी होती. त्या कठीण आणि गुंतागुंतीचा विषय सामान्यातल्या सामान्याला समजेल, उमजेल आणि आवडेल, इतका सोपा करुन सांगत व लिहीत.


468x60 Dedicated Server Banners

१९७५ मध्ये आणीबाणी आली आणि Durgabai दुर्गाबाईंच्या आयुष्यातील आणखी एक धडाडीचे आणि धगधगते पर्व सुरू झाले. आविष्कार स्वातंत्र्याची आणीबाणीतली गळचेपी त्यांना सहन होणे शक्यच नव्हते. त्याच वर्षी कराडला झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यावेळी त्यांनी जो अवतार धारण केला, तो साक्षात दुर्गामातेचा होता. समोर यशवंतराव चव्हाण होते. संमेलन त्यांच्याच गावात होते. त्यांच्या साक्षीने दुर्गाबाई कडाडल्या, ‘अमुक एक गोष्ट तू लिही, असेच विचार मांड, परिस्थितीचे असेच वर्णन कर, असं लेखकाला सांगणं बरोबर नाही. पीनल कोडप्रमाणे साहित्याला नियमबद्ध करणं नुसतं हास्यास्पद नाही, तर धोकादायकदेखील आहे.’ शेकडो साहित्यिक आणि करोडो वाचक यांच्या मनातली खदखद त्यांनी निर्भयपणे भर वेशीवर टांगली. दुर्गाबाईंच्या या दणक्याने आणीबाणीत ठप्प झालेल्या समाजात निषेधाची प्रेरणा जागी झालीच, शिवाय यशवंतराव व त्यांच्यासारखे संवेदनशील राज्यकर्तेही मनोमन हादरले. इतकेच करून दुर्गाबाई गप्प बसल्या नाहीत. १९७७ च्या लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या, तेव्हा दुर्गाबाई स्वत: प्रचाराच्या रिंगणात उतरल्या. साहित्यिकांनी सक्रिय राजकारणात उतरावे का? हा वाद काहींनी उकरून काढला. दुर्गाबाईंनी या आक्षेपाला चोख उत्तर दिले. त्यांच्या मते लेखकांना राजकारण वर्ज्य असण्याचे कारण नव्हते. ‘राजकारणातील नीती शिकवण्याचे काम साहित्यिक व विचारवंतांचेच असते’, हेही त्यांनी ठासून सांगितले. `जेव्हा स्वत्त्वालाच आव्हान दिले जाते, तेव्हा मी कोण व मी काय काम करतो, हे प्रश्न गौण ठरतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आला, तर तो घालणाऱ्याला शत्रू मानून युद्धाच्या रिंगणातच उतरायला हवे,’ असे त्या जाहीर प्रचार सभांतून सांगत राहिल्या. निवडणुका संपल्या. काँग्रेसचा पराभव झाला आणि आणीबाणीही उठली. तरीही दुर्गाबाईंचा ‘सरकार’ या संवेदनाशून्य यंत्रणेविरुद्धचा लढा चालूच राहिला. तेव्हाचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी साहित्यिकांबद्दल काही विधाने केली. ती दुर्गाबाइंर्ना पटली नाहीत. त्या पुन्हा चवताळून उठल्या. या वक्तव्याचा निषेध म्हणून साहित्यिकांनी सरकारी पुरस्कार घेऊ नयेत, असे आवाहन त्यांनी केले. साहित्यिकांना जनतेकडून पुरस्कार मिळावेत, म्हणून त्यांनी ‘वन्दे मातरम्’ निधीची स्थापनाही केली..

महाराष्ट्र शासनाचा एक लाख रुपयांचा `महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार त्यांनी ठामपणे नाकारला. दुर्दैव हे की, मराठी साहित्य विश्वाने दुर्गाबाईंना साथ दिली नाही. दहा-वीस हजारांचे सरकारी पुरस्काराचा मोह साहित्यिकांना आवरता आला नाही आणि पुढे ती चळवळही अस्तंगत झाली.


468x60 Dedicated Server Banners

दुर्गामातेने आपल्या अष्टभुजांमधील सर्व शस्त्रे वापरावीत, त्याच आवेषाने व शक्तीने दुर्गाबाई तुटून पडत. त्यात कुणाचाही मुलाहिजा नसे, कारण त्या मुळात वृत्तीने ‘बंडखोर’ होत्या. त्यांच्या ‘आठवले तसे’ या आठवणीपर पुस्तकात याच वृत्तीची प्रचिती येते. या लिखाणामुळे समाजात वावटळे निर्माण झाली; दुर्गाबाईंना प्रसिद्धी खूप मिळाली, तसेच शत्रूही खूप मिळाले. पण अशा शत्रूत्वाच्या परिणामांची तमा त्यांनी कधी बाळगली नाही. आपल्या म्हणण्यासाठी कोणत्याही टोकाला जाऊन लढा देण्याची त्यांची तयारी होती. `ही शक्ती तुम्हाला कशी मिळाली?’, मी एकदा त्यांना विचारले. त्या तशाच मंद हसल्या आणि उत्तरल्या, `मला गांधीजींच्या शिकवणुकीने हे सामर्थ्य दिले. ते म्हणाले होते, निर्भय बनो! मी तशीच निर्भय झाली आहे.’

Also Read : https://postboxindia.com/i-love-my-mumbai-bharatkumar-raut/

खरेच, समाजातील अत्यंत नाजुक विषयांवरही त्या बेधडकपणे आपली मते मांडत. `हुतात्मा कोणाला म्हणावे, हा वाद निर्माण झाला, त्याला कारण त्या स्वत:च. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात गर्दीत चुकून गोळी लागून मरण पावलेल्यांना `हुतात्मा’ म्हणावे काय? असा सवाल त्यांनी जाहीररित्या केला आणि स्वत:भोवती वादाचे मोहोळ उठवून घेतले. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे यांच्याबरोबरही त्यांनी जाहीर वाद घातला होता. एकदा त्यांना विचारले, `तुम्ही वाद का ओढवून
घेता?’, तर क्षणाचाही विलंब न लावता, त्या म्हणाल्या, `मी कशाला वाद ओढवून घेऊ? वादच माझ्या प्रेमात पडतात आणि माझ्या मागे लागतात.’

अशा Durgabai दुर्गाबाई.


468x60 Dedicated Server Banners

त्यांच्या व्यिक्तमत्त्वाला अनेक पैलू आणि पदर होते. बाहेर एशियाटिक लायब्ररीत अभ्यासक आणि पंडिता म्हणून वावरणाऱ्या दुर्गाबाई व्यासपीठावर फर्ड्या वक्त्या असायच्या. तिथून घरी येताना ग्रँट रोडच्या बाजारात त्या भाजी विकत घेऊन पिशवीत कोंबायच्या आणि भाजीवाल्याशी भावाबद्दल यथेच्छ घासाघीस करायच्या. घरी पोहोचल्या की, त्यांचे अगदी वेगळेच रुप. आता त्या मावशी, आजी, बहिण बनलेल्या असायच्या. घरातल्या स्वयंपाकघरात पदर कमरेला खोचून स्वयंपाक करण्यात गुंगलेल्या दुर्गाबाईंचे दर्शन मनोज्ञ असायचे.

त्यांना वेगवेगळ्या पाककृती करण्याची आणि ते सर्वांना आग्रहाने खाऊ घालण्याची खूप हौस. कधी मूडमध्ये असल्या की त्या नवनव्या पाककृती स्वत:च तयार करायच्या आणि त्या जमल्या की, त्यांची रेसिपी तिथल्या तिथे लिहून काढायच्या. अशाच त्यांच्या स्वत:च्या रेसिपींचे `खमंग’ हे सदर त्यांनी `महाराष्ट्र टाइम्स’मध्ये वर्षभर चालवले. त्याला भरपूर प्रतिसादही मिळाला. त्या पाककृतींची चव वाचकांच्या जिभेवर अनेक वर्षे रेंगाळत राहिली असणार, कारण त्या गेल्या तेव्हाही त्यांच्या पाककृतींबाबतची पसंतीपत्रे येतच होती. `तुम्हाला या पाककृती कशा जमतात?’ `मी कोणतेही पाककृतीचे शिक्षण घेतलेले नाही. पाककृती मीठ, साखरेमुळे रुचकर होत नाहीत. त्यासाठी त्यात प्रेम आणि जीव ओतावा लागतो’ हे त्यांचे मार्मिक उत्तर.

मृत्यू या संकल्पनेबद्दलही दुर्गाबाई तल्लिनतेने बोलत राहात आणि वारंवार लिहीतसुद्धा. अर्थात मृत्यूची संकल्पना स्पष्ट करतानाही त्यांची भूमिका अलिप्ततावादाचीच असे. मृत्यूबद्दलच त्यांनी १९७३ मध्ये `मुंबई आकाशवाणी’वर `काळाची भैरवी ऐकताना’ या शीर्षकाखाली भाषण सादर केले. मरणाऱ्याच्या मनाची तगमग आणि घालमेल त्यांनी शब्दबद्ध केली. `मरणात खरोखर जग जगते’ या कविवर्य भा. रा. तांबे यांच्या विचारांशी त्या सहमत नव्हत्या. त्या आपल्या भाषणात म्हणतात की, ` मरण मधूर वाटते कारण ज्या प्रियजनांच्या सहवासात आपल्याला जायचे असते, ती तिथे आहेत, नि आपली वाट पाहात आहेत, असा आभास आपणच निर्माण करतो. . मरणापेक्षा जीवन कितीतरी मोठे आणि समृद्ध आहे, कारण जीवनात अतर्क्य गती आहे. गती आहे म्हणून अमाप सौंदर्य आहे; शोध आहे, वेध आहे; जीवन अटीतटींनी भरलेले आहे.’ जीवनावरची त्यांची श्रद्धा अशी अपरंपार आणि असीम होती. जीवनाच्या विविध अंगांचे अनुभव घेण्याची त्यांची उत्कट इच्छा त्यांच्या लिखाणातून वारंवार व्यक्त होत राहते. हा अनुभव गाठीशी लावण्यासाठीच की काय, त्यांनी बाणभट्टांची `कादंबरी’ संस्कृतमधून मराठीत आणली. त्यासाठी त्या तब्बल नऊ वर्षे अभ्यास करत राहिल्या. याच ध्यासापायी त्यांनी भारतीय लोककथांची भाषांतरे केली आणि ५४४ जातक कथा मराठी वाचकांना बहाल केल्या. हे काम मोठे होते.


468x60 Dedicated Server Banners

पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमलाबाई सोहोनी या दुर्गाबाइंर्च्या भगिनी. पण त्यांचा गाजावाजा त्यांनी केला नाही. ती त्यांची प्रवृत्ती नव्हती. या दोन बहिणींनी दोन वेगवेगळ्या क्षेत्रांवर स्वत:चा ठसा उमटवला. पण इतके करूनही संदेश देण्या-घेण्याचा त्यांना कंटाळावाजा तिटकारा होता. कोणी संदेश मागायला गेलेच, तर त्या संत तुकारामांनी शिवाजी महाराजांना पाठवलेल्या संदेशाचा दाखला देत. महाराजांनी तुकारामांसाठी पालखी पाठवली, तेव्हा तुकाराम उत्तरले होते,
तुम्हापाशीं येऊनियां काय।
वृथा सीण आहे चालण्याचा।।

Durgabai दुर्गाबाई गेल्याला आता एक दशक उलटून गेले. त्यांच्या जाण्यामुळे कधीही भरून न येणारी पोकळी मराठी समाजात निर्माण झाली आहे, हे खरे असले, तरी तसे मानणे दुर्गाबाइंर्ना आवडणारे नाही. कारण असले वांझोटेपणाचे शेरे मानव्याच्या कुसव्यावर मारू नयेत, असे त्यांनीच कायम मानले.

इतके मात्र खरे की, त्यांच्या जाण्यामुळे एशियाटिक लायब्ररीतली `ती’ खुर्ची कायमची पोरकी झाली आणि त्यांच्या स्वयंपाक घरातला विविध खाद्यपदार्थांचा दरवळणारा सुगंध आणि जीभेवर रेंगाळणारा स्वादही कायमचा नाहीसा झाला.


468x60 Dedicated Server Banners

 

– भारतकुमार राऊत

(`स्मरण’ या स्मरणचित्र संग्रहातून)

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisement

More Stories
tanaji malusare
tanaji malusare – शूर वीर तानाजी मालुसरे
error: Content is protected !!
%d bloggers like this: